काव्यविचार

मराठी भाषावैभव — संपादकीय भूमिका

१. या ब्लॉगवरील सर्व लेखन मराठी व्याकरण, काव्यशास्त्र, अलंकार, वृत्तविचार आणि पंतकाव्यपरंपरा यांवर आधारित असेल.

२. प्रत्येक विवेचन शास्त्रीय आधारावर व प्रामाणिक ग्रंथदाखल्यांसह मांडले जाईल.

३. काल्पनिक उदाहरणांऐवजी शक्यतो मूळ काव्यपंक्तींचा आधार घेतला जाईल.

४. छंद, गणरचना आणि अलंकार यांचा ऊहापोह करताना तांत्रिक अचूकता पाळली जाईल.

५. वाचकांच्या सूचनांचे स्वागत आहे; शास्त्रीय दुरुस्त्यांचा नम्रपणे स्वीकार केला जाईल.

*******************************************


काव्यविचार

[ लेखांक - 1]


१) वाक्यं रसात्मक काव्यम् 

२) रमणीयार्थ-प्रतिपादकः शब्दः काव्यम् 

३) गुणालङ्कार-सहितौ शब्दार्थौ दोष-वर्जितौ 

४) काव्यस्य आत्मा ध्वनिः

५) भावनोद्दीपकः शब्दः काव्यम् 

६) कल्पनारम्य आणि प्रतिभासंपन्न वाक्यरचना म्हणजे काव्य!

काव्याच्या अशा पुष्कळ व्याख्या निरनिराळ्या ठिकाणी केल्या गेल्या आहेत. त्या सर्वांचा मथितार्थ असा की प्रतिभा, आह्लाद-जनकत्व, रसोत्पत्ति, रमणीयार्थ-प्रतिपादन, ओज, माधुर्य, अलंकार, ध्वनि-सूचकता, भाषा-प्रौढता व सुबोधता, निर्दोषत्व, शब्द-चमत्कृतीपेक्षा अर्थ-चमत्कृतीला दिलेले प्राधान्य यांनी युक्त असलेली साहित्यकृती म्हणजे काव्य! 


बालकवींची 'फुलराणी' ही कविता हे अशा काव्याचे एक सुंदर उदाहरण. या फुलराणी व रविकर यांच्या विवाहाचे वर्णन करताना कवीने तर नवगीताचा अभिषेकच केला आहे वधुवरांवर.

फुलराणी - 

तेजोमय नभ-मंडप केला । लख्ख पांढरा दहा दिशांला

जिकडे तिकडे उधळित मोती । दिव्य वर्‍हाडी गगनी येती

लाल सुवर्णी झगे घालुनी । हासत हासत आले कोणी 

कुणी बांधिला गुलाबि फेटा | झकमकणारा सुंदर मोठा

आकाशी चंडोल चालला। हा वा‌ङ्निश्चय करावयाला 

हे थाटाचे लग्न कुणाचे ? । साध्या भोळया फुलराणीचे


गाउं लागले मंगलपाठ । सृष्टीचे गाणारे भाट

वाजवि सनई मारुत-राणा । कोकिळ घे तानांवर ताना

गाउं लागले भारद्वाज | वाजविती निर्झर पखवाज

नवरदेव सोनेरी रवि-कर | नवरी ही फुलराणी सुंदर

लग्न लागते सावध व्हा रे । सावध पक्षी, सावध वारे

दंवमय हा अन्तःपट फिटला | भेटे रवि-कर फुलराणीला


वधू-वरांना दिव्य रवांनी | कुणी गायिली मंगल गाणी 

त्यांत कुणीसे गुंफित होते | परस्परांचे प्रेम अहा ते

आणिक तेथिल वनदेवीही। दिव्य आपुल्या उछ्‌वासांही

लिहीत होत्या वातावरणी | फुलराणीची गोड कहाणी

गुंगत गुंगत कवि त्या ठायी | स्फूर्तीसह विहराया जाई

त्याने तर अभिषेकच केला | नव-गीतांनी फुलराणीला  

 -  ( बालकवी )


कवीला एक इवलंसं फूल दिसतं काय आणि तेवढ्यावरून तो आपल्या कल्पनाशक्तीच्या जोरावर त्या फुलराणीचं रविकराशी थेट लग्नच जुळवून मोकळा होतो काय! सारंच अजब! त्याला त्यासाठी वेगळ्या वऱ्हाड्यांची पंचाईत पडत नाही, मौल्यवान वस्त्रालंकारांची उणीव भासत नाही, वाङ्निश्चयाला कोण उभा करावा याची फिकीर पडत नाही. तो साध्याभोळ्या फुलराणीचे सुंदरशा चिमुकल्या रविकिरणाशी लग्न ठरवतो. कोकिळाला गायला लावून, भारद्वाजाकडे नर्तन  सोपवून, सृष्टीच्या भाटाकडे मंगलपाठ म्हणण्याचे कार्य सोपवून, मारुतराण्याला सनई वाजवण्याची कामगिरी देऊन, निर्झरांना पखवाजवादक बनवून कवी मोठ्या थाटामाटात हे लग्न लावून देतो. आणि दंवमय अंतरपाट दूर होताच त्या नवपरिणीतांवर स्वतः नव-गीतकाव्यपुष्पांचा अभिषेक करतो.

किती भारी कल्पना!

या काव्यात जी तालबद्धता आणि प्रतिभा सूचित होते त्यामुळे रसिकजनांना काव्यानंदाची अनुभूती आल्याशिवाय राहत नाही. 

केवळ शब्दरचना म्हणजे काव्य नव्हे.

ती नादवती, अर्थवती व ध्वनिवती असली पाहिजे.

शब्द यथोचित पाहिजेत, बाह्यार्थ सुंदर पाहिजे आणि त्या बाह्यार्थाच्या अंतरंगात असणारा अर्थ - जो रसिकाने आपल्या रसिकतेनेच काढावा लागतो तो अर्थही - फार सुंदर असावा लागतो. निव्वळ शब्दांच्या रचनेनेच काव्यनिर्मिती होत नसते.

परंतु केवळ सामान्य शब्दरचनेलाही साधारणपणे लोक काव्य समजतात. त्याहून वरच्या दर्जाचे लोक फक्त बाह्यार्थ परिपाकाचे महत्त्व समजतात. परंतु खरे रसिक आहेत ते मात्र काव्याची परीक्षा काव्याच्या शब्दरचनेतील नाद, अर्थ व ध्वनि या तिन्हींवरून करतात. या तिन्हींचे अस्तित्व ज्या कविकृतीत असेल ती कलाकृती अज्ञ, सुज्ञ व विशेषज्ञ अशा रसिकांना सारखाच मोह घालते. 

अधिक स्पष्टीकरणासाठी एकेक उदाहरण बघू.

1] नादवती --

(जाति-अवनी)

रुणुझुणु ये, रुणुझुणु ये | झणकारित वाळा ||

लुटुलुटु दुडुदुडु | ठुमकत ये बाळा ||

धुंदि अजुनि, रजनि-नयनि | सावरूनि, पदर धरुनि ||

शुभवदना, उडुरदना | देइ जांभयाला ||  

 - (भा.रा. तांबे)

[उडुरदना =  (काहीसा दमलेला, झोपेला आलेला ) आळसावलेला बाळ.]

यातील नादाची तालबद्धता व माधुर्य हे गुण सहज ध्यानात येतात. त्याचप्रमाणे प्रत्यक्ष गुणगुणताना तर त्यातील अनुप्रासांची मौजसुद्धा चांगलीच लुटता येते.

अशा रचनेला *नादवती कविता* म्हणतात. 


2] अर्थवती- 

फुलपाखरू

छान किती दिसते | फुलपाखरू ॥ ध्रु० ।।

या वेलीवर  | फुलांबरोबर ।

गोड किती हसते | फुलपाखरू ॥ १ ||

पक्ष चिमुकले | निळे जांभळे ।

हालवुनी झुलते | फुलपाखरू || २ ||

मी धरु जाता | येइ न हाता ||

दूरच ते उडते | फुलपाखरू | ३ ||

- (ग. ह.  पाटील) 


यात वर्ण्य विषयाला म्हणजे अर्थालाच प्राधान्य आहे. शिवाय तो सुंदरही आहे, मुद्दाम अनुप्रासादि अलंकार आणण्याचा अट्टाहास यात नाही  पण फुलपाखराचे मात्र अगदी यथार्थ वर्णन कवीने टिपले आहे.

अशा रचनेला *अर्थवती कविता* म्हणतात.


3] ध्वनिवती- 

ते श्वान एक तुकड्यास्तव चार नाना ।

दावी धन्यास जठरार्थ कसे पहाना ।।

दे आळवूनि जरि हस्ति-प बाप, भाई ।

घे तोच घास गजराज कशी बढाई ! ॥ 

( मोरोपंत - केकावली) 

( शब्द हस्तिप = गजशाळेतील सेवक) 

येथे केवळ पोट भरण्यासाठी कुत्रा धन्याजवळ नाना प्रकारे गोंडा घोळतो पण हत्तीने खाणे खावे यासाठी त्याला मात्र बाबापुता केले तरच तो खातो असा *बाह्यार्थ* आहे. ( क्षुद्र गोष्टीसाठी क्षुद्र लोक लाचारी दाखवतात, मानी लोक मात्र तिकडे ढुंकूनही पाहत नाहीत हा *ध्वन्यार्थ* किंवा सूचितार्थ यात आहे). 

अशा रचनेला *ध्वनिवती कविता* म्हणतात. (बऱ्याचशा अन्योक्ति या प्रकारात मोडतात.) 


*****


गद्य-काव्य

काव्य नेहमीच पद्यांमध्ये असते असं नाही. गद्यातही त्याची विपुल उदाहरणे सापडतात.

उदाहरण -

 १) विषमूर्ति भुजंग

"ओहो ! तो पाहा वितळलेल्या रुप्याचा छोटासा ओघळ जमिनीवरून चालला आहे. चालला आहे कशाचा ? वाहतो आहे. याची गति किती गमतीची ! चपल असून शांत! ही पाण्याची लाट की वाऱ्याची झुळूक ! पुनः लाट म्हणावी तर गर्जत नाही, ओघ म्हणावा तर धबधबा नाही. जणू काही टिकल्यांच्या चंद्रहारांचा सर घसरतो आहे! की सुबक बुंदक्यांचा गळपट्टा पडला आहे? काही ओळखत नाही. रेशमाहून मृदू, कदलि-गर्भाहून शीतल, पुष्पहाराहून सुखतर स्पर्श, पण या सौम्यपणाला फसू नका. दाढेत जिवंत मृत्यु उभा आहे. थोडे वाटेस जा, म्हणजे समजेल चंद्रहार की कट्यार आणि गळपट्टा की गळा उतरणारा पट्टा आहे तो! रुपेरी पाण्याचा ओघळ नव्हे, आता झाली विषाची लाट! गवताच्या गर्दीतून हा विषारी बाण सणाणतो आहे, कोधाने नुसता फणकारा चालला आहे. आता त्याला शीत नाही, उष्ण नाही. याचे मृदुत्व जाऊन पाषाणाचे कठोरपण उभे राहिले आहे. अखिल ब्रह्मांडातील क्रूरता, दुष्टपणा, हिंस्रता एकवटून तुमच्यापुढे स्वारी खडी आहे. तिचे आटोक्यात या, की मग थेट स्वर्गद्वाराचीच भेट!"

-- (म. ह. मोडक ).


२)

भंवताली सगळी डोंगरांची दाटी. एकेक शिखर उंच डोकं काढून जणू अवघ्या सृष्टीकडे  कौतुकानं बघत असलेलं. त्यांच्या पोटाशी असलेल्या घळींतल्या झाडोऱ्यावर आता सावली उतरली होती. घळीच्या माथ्यावर तेवढी उन्हे उरली होती. शिखरांच्या सावल्या तळाशी पसरलेल्या मावळात विस्तारल्या होत्या. त्या लांबत चालल्या होत्या. आकाशात काही घारी  पंख पसरून संथपणे उडत होत्या.

आवळीमधून अन् वाघाट्याच्या वेलींमधून येणारा वारा स्वारांच्या अंगावरल्या उपरण्यांची टोके उडवीत होता. या शिलेदारांच्या हालचालीपलिकडे बाकी अवघं निचळ होतं. जणू भवताली एक प्रचंड चित्र मांडलेलं होतं. चिताऱ्यानं आपल्या कलमावाटे हिरव्या, काळ्या अन् पिवळसर हिरव्या रंगांचे फराटे चहूं अंगांना माखले होते. या सगळ्या चित्रात एकदम उजळ दिसत होतं पश्चिमेकडे उतरत असलेलं सूर्यबिंब. तिथं तेवढा त्या अनोख्या चित्रकाराने भडक सोनेरी रंग वापरला होता.

- (कादंबरीमय शिवकाल - गो. नी. दांडेकर)


जुन्या क्रमिक पुस्तकांतील कृष्णशास्त्री चिपळूणकरांचा 'समुद्र' हा किंवा यासारखे लेखांश तसेच शिवरामपंतांचे पुष्कळसे लेख पाहिले तर त्यात अशीच उत्कृष्ट गद्य-काव्याची अनेक उदाहरणे आढळतील.

******

[या लेखाद्वारे आपल्या मराठी काव्यपरंपरेतील समृद्ध दालनातल्या वैभवाचं, ओझरतं का होईना, दर्शन घडलं असेल तरी मला धन्यता वाटेल.] 

— अरुण सौदागर,

 मराठी भाषावैभव

27/02/2026.

टिप्पण्या

  1. https://marathibhashavaibhav.blogspot.com/2026/02/blog-post_27.html

    https://marathibhashavaibhav.blogspot.com/2026/02/blog-post_27.html

    👆
    दुसर्‍या लेखाची लिंक

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शब्दालंकार

मराठी भाषा वैभव - काव्यगुण