शब्दालंकार

भाषालंकार 

[ लेखांक क्रमांक ४ ] 


आपली मायमराठी भाषा मुळात सुंदरतेची एक मूर्तीच आहे.  त्यात जर तिला वेगवेगळ्या भाषाप्रभूंनी अलंकृत करून सजवलं तर  तिचं शालीन सौंदर्य अधिकच खुलून दिसेल, नाही का?

कवींच्या प्रतिभेतून चमत्कृतियुक्त आल्हाददायक अशी एक शब्दकृती निर्माण होते. भाषेचे सौंदर्य वाढवणारी शोभा देणारी ही शब्दरचना म्हणजेच भाषेचे "अलंकार". 

उदा. 

वेडिवाकडी घेउनि वळणे । नागिण धावे जणुं रोषानें 

वाफा टाकित धापापरि ही, गाडी धडधडते..... १

वरती भिडली घन घनमाला। धूम धावते दिग्भागाला

रथचक्रांच्या घर्घपरी, गगनीं गडगडतें. ......... २

  - ( मायदेव )

याठिकाणी केवळ 'आगगाडी जात आहे' असे न म्हणता, तिला 'जणू काही त्वेषाने नागीण धावत आहे' असे म्हटले आहे. तसेच आकाशात ढग गडगडत आहेत' असे न म्हणता 'रथचक्रांच्या घर्घरीप्रमाणे आकाशात गडगडते' असे म्हटले आहे.  त्याचप्रमाणे 'वाफा टाकित धापापरि, 'वरती भिडली घन घनमाला, धडधडते, गडगडते ' अशा प्रकारची शब्दयोजना केल्यामुळे भाषा साध्या वाक्यापेक्षा वेगळी व आकर्षक वाटते. 

भाषेचे सौंदर्य शब्दांच्या किंवा अर्थाच्या चमत्कृतींमुळे वाढते आणि यामुळेच भाषालंकाराचे शब्दालंकार व अर्थालंकार असे दोन प्रकार पडतात.


 [ १ ] शब्दालंकार

यमक, अनुप्रास, श्लेष व चित्र असे शब्दालंकाराचे चार प्रकार आहेत. 

१ ) यमक

पद्याच्या एकाच चरणांत किंवा भिन्न चरणांत एकदा ज्या क्रमाने अक्षरे आली त्याच क्रमाने पुनः तीच अक्षरे आल्यास यमक हा अलंकार होतो. 

 १ ) एकाक्षरी यमक

एक्या पदें भूमि भरोनि थोडी

दुज्या पदें अड-कटाह फोड


२) द्व्यक्षरी यमक

दे तीसरा पाद म्हणे बळीला

म्हणोनि पाशीं दृढ आकळीला ||


३) चतुरक्षरी यमक

बाई म्यांं उगवताच रवीला |

दाट घालुनि दही चरवीला ||

त्यात गे फिरविताच रवीला |

सार काढुनि हरी चरवीला ||

(हे चार-अक्षरी यमक आहे. यात च, र, वी आणि ला ही अक्षरे एकाच क्रमाने परंतु भिन्न भिन्न अर्थाने आली आहेत.) 

४) अनेकाक्षरी यमक 

कुरु-सैन्यांत गमे ज्यापरि रंभा काननांत वारा हो ।

त्या विजय-श्री देउनि, परिरंभा कां न नातवा राहो ?

( इथे तर तब्बल अकरा अक्षरी यमक आहे.) 

२ ) अन्त्य व आदि चरण यमक

एका चरणाचा अंत्य आणि दुसऱ्याचा आरंभ यातील यमक.

सेवुनि संतत पाला संत तपाला यदर्थ करितात |

तो प्रिय या स्तवना की, यास्तव नाकीहि तेच वरितात ||

- ( मोरोपंत )


३ ) दामयमक

दावं विणावं तसं एकाचा अंत्य आणि दुसऱ्याचा आरंभ याप्रमाणे अनेक चरणांचे यमक.

उदा. :-

श्रीपति झाला दशरथसुत राम दशाननासि माराया |

मारा या जनकाची होय सुता त्रिजगदाधि साराया ||

सारा या प्रभुची हे लीला गाती सदैवही सु-कवी|

सुकवी ; भवजलनिधिते, निरुपमसुख रसिकजनमनी पिकवी ||

-(मोरोपंत )

(इथे पहिल्या ओळीत शेवटी आलेली 'माराया' ही तीन अक्षरे पुढच्या ओळीत आरंभी आलेली आहेत. अशीच शब्दयोजना दुसर्‍या व तिसर्‍या, तसेच तिसऱ्या व चौथ्या ओळीतही केलेली दिसते.) 

 ४ ) पुष्पयमक

एकेका चरणात यतीच्या ठिकाणी फुलांच्या पाकळ्यांप्रमाणे अनेकवेळा येणारे यमक.

उदा. :-

सुसंगति सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो |

कलंक मतिचा झडो, विषय सर्वथा नावडो ||

सदंघ्रिकमळी दडो, मुरडिता हटाने अडो |

वियोग घडता रडो, मन भवच्चरित्री जडो ||

- ( मोरोपंत )

इथे पहिल्या ओळीत यतीच्या ठिकाणी (स्वल्पविराम दिला आहे तिथे) आणि ओळीच्या शेवटी 'डो'  अशी योजना केलेली आहे. 


५ ) अश्वधाटी यमक

अश्वाच्या विवक्षित गतीप्रमाणे असणारे यमक.

उदा. :-

वाजत गाजत साजत आज तया जतन करुनि आणा हो |

मज मागे मत्स्यांचा हा रिपु-शशि-राहु-बाहु राणा हो ||

-(मोरोपंत )

(येथे रिपु-शशि- राहु-बाहु म्हणजे शत्रुरूपी चंद्राला राहूप्रमाणे ग्रासणारा बाहू ज्याचा तो. ) 

याठिकाणी 'ज त' हे पहिल्या ओळीत पाच वेळा गुंफले आहेत. 

६ ) युग्मक यमक

पहिला व दुसरा आणि तिसरा व चौथा या सबंध चरणाचे साधलेले यमक.

उदा. :-

पाया नमी देइन वंश सारा |

पा या न मी दे इनवंशसारा ||

न या वयामाजि भला जना दे |

न यावया 'मा' जिभ लाज ना दे ||

- ( आनंदतनय  = गोपाळपंत आनंदराव अरणीकर) 

(अर्थ - दशरथ महाराज महर्षी विश्वामित्रांना म्हणतात, "मी पाया पडतो, सारा वंश देईन, पण सूर्यकुलभूषण अशा या रामाला मी देणार नाही.  सर्वसामान्य माणूस ह्या वयात आपला मुलगा दुसर्‍याला कसा देईल? 'नाही ' असे मुखाने म्हणायला माझ्या जिभेला काही लाज वाटत नाही." )


७ ) समुद्गक यमक

पद्याची एक संपूर्ण पंक्ती व दुसरी संपूर्ण पंक्ती यात साधलेले यमक

अनलसमीहित साधी राया, वारा महिवरा कामा |

अनलस मीहि तसा धीरा यावा रामहि वराका मा||

- ( मोरोपंत )

(अर्थ -  " हे पृथ्वीपते धर्मा, वारा जसं अग्नीचे कार्य साधतो, तसं तुझं साह्य करण्यास मी सदैव तत्पर आहे. हे धीरा, हवं तर बलरामही येतील. मग वराका (विचारी) मा (रुक्मिणी)  तुझ्या साह्याला का बरे येणार नाही? खचितच येईल.)


[ २ ] अनुप्रास

गद्यात किंवा पद्यात अक्षराच्या होणाऱ्या पुनरावृत्तींमुळे अनुप्रास साधतो.

उदा. :-

१)

देवि दयावति दवडिसि दासाची दुःख दुर्दशा दूर |

पापाते पळवितसे परम पवित्रे तुझा पयःपूर ||

(गंगास्तुती - मोरोपंत.)

यात द आणि प यांची पुनरावृत्ती आहे.

२)

[ वृत्त - शार्दूलविक्रीडित ]

जो धैर्ये धर-सा सहस्रकर-सा तेजें तमा दूर-सा 

जो रत्नाकर-सा गभीर, शिरसा भूपां यशोहार-सा

ज्ञाता जो सरसावला, नव-रसांमाझारि शृंगार-सा 

शोभे तामरसाक्ष तो नळ रसा-नाथ स्तनूं फारसा ।।


३ ] श्लेष

एखाद्या शब्दाची द्व्यर्थी योजना केल्यास श्लेष अलंकार होतो.

उदा. :-

ती शीतलोपचारी जागी झाली हळूच मग बोले, |

"औषध नलगे मजला", परिसुनि माता 'बरे' म्हणुनि डोले||

-( मोरोपंत ) 

अर्थ - प्रेमज्वराने पीडित दमयंतीवर शीतल उपचार चालू असूनही तिचा ताप कमी होईना. तेव्हा ती आपल्या आईला म्हणाली, 'मला औषध नल गे' (नलराजा हेच माझं औषध. अन्य औषध मला नलगे - लाभदायी ठरणार नाही).

नलराजकथा सुधाचि साजे |

दमयंती वरवर्णिनी विराजे ||

मिळणी उभयांशि होय जेथे |

अधिकारी अधिकानुराग तेथे ||

- ( रघुनाथ पंडित)

स्पष्टीकरण -

सुधा = अमृत / चुना

वरवर्णिनी = सौंदर्यवती / हळद

अधिकानुराग = अधिक प्रीती /अधिक लालिमा.

नलराजकथा अमृतासमान असून दमयंतीही सौंदर्यवती आहे. या उभयतांच्या मिलनाने प्रीतिभाव अधिकच खुलून दिसेल.

चुना व हळद यांच्या मिश्रणातून लालवर्णच उत्पन्न होतो असाही अर्थ. 


[ ४ ] चित्र यमक

जिथे पद्म , खड्ग, चक्र यांसारख्या आकृतिबंधात किंवा विवक्षित अक्षरे ठराविक ठिकाणीच आणण्याची रचना करून वैचित्र्य साधलेले असते, तेथे हा चित्रालंकार होतो.

विठ्‌ठल कवि व मोरोपंत यांची या प्रकारची बरीच रचना आढळते. 

मोरोपंतांची मंत्र, दीर्घ , लघु, परंतु, निरोष्ठ इत्यादी रामायणे चित्रकाव्यांतच मोडतात.  

उदा -

मंत्र 

श्रीमान् राजशिरोमणि दशरथ जो निज-यशें  वरा महिंत ।

द्विजसेवक यज्ञ-निरत जनभयहर्ता, घरा निकाममहित ।।

(यातील पहिल्या ओळीचे पहिले, चौथे, आठवे, सोळावे, सतरावे, विसावे आणि एकविसावे ही अक्षरे तसेच दुसर्‍या ओळीतील दुसरे, सहावे, अकरावे, चौदावे, अठरावे व एकविसावे ही अक्षरे वाचत गेल्यास 'श्रीराम जय राम जय जय राम' हा मंत्र उच्चारला जातो. 

दीर्घ (गुरु)

श्रीराम स्वामी दे सर्वांला सर्व अर्थ साधुनी 

त्यातें गावें भावें केला हा सूपदेश साधूंनीं 

( यात फक्त अकरावे व तेरावे तेवढेच अक्षर लघु आणि उर्वरित सर्व अक्षरे दीर्घ आहेत.) 


लघु 

दशमुखवधमति विधिसुरनुतपद जगदधिप अजित वरद हरी ।

परम करुण म्हणउनि दशरथनरवरतनुज मनुजपणहि धरी ।। 

( यांत तर केवळ अंत्याक्षरेच तेवढी दीर्घ म्हणजे गुरु आहेत. बाकी सर्वच्या सर्व लघुच आहेत. ) 


परंतु

श्रीरामचरित करितें मुक्त, सकृत् किमपि सेवितां भावें 

पार न लागे दशशत-वदनांहि परंतु वाटते गावें ।।


निरोष्ठ 

( ओष्ठ्य वर्ण म्हणजे प, फ, ब, भ, म अथवा या अक्षरांची बाराखडी पूर्णपणे वगळून रचलेले काव्य ) 

श्रीहरि दशरथनंदन झाला दशकंठ-सक्षय कराया । 

दर शेष चक्रही जनिं घेतो जगदखिल संकट हराया ।


वरील रचनेतील वैशिष्ट्ये स्पष्टच आहेत.


पद्मबंध

चरणांच्या शेवटची व आरंभीची तीन अक्षरे कमलाकृतीत (किंवा अन्य चित्राकृतीत) बसवलेली असतात. 

कमलाकृतीच्या मध्यभागी एक अक्षर ठेवून उर्वरित दोनदोन अक्षरे कमळाच्या आठ पाकळ्यांमध्ये रेखलेली असतात. ही मध्यभागी असलेल्या अक्षरापासून क्रमवार पाकळ्यांतील अक्षरे एकदा उलट व एकदा सुलट वाचत गेले असता संपूर्ण चरण लक्षात येतो. 

उदा. १)

या कमळाच्या आकृतीत मध्यभागी 'हा' हे अक्षर आणि आठ पाकळ्यांमध्ये अनुक्रमे 'यका, चिम, गेला, तान, यगे, जन, लाका, रार्थ' अशी अक्षर योजना आहे. हे चित्रकाव्य वाचताना मध्यापासून आरंभ केला व क्रमाने वरील अक्षरे विशिष्ट पद्धतीने वाचली तर पुढे दिल्यानुसार सरळ रचना आढळेल. 

हाय कामचि हा गेला । 

लागे हाता न गेय हा ।

हाय गे न जहाला का ।

कालाऽहारार्थ काय हा ?

(काही तांत्रिक कारणास्तव वरील पद्मबंध  प्रत्यक्ष चित्ररूपात  द्यायला उशीर झाल्याबद्दल खेद आहे.)

( पुढच्या भागात अर्थालंकार. )


भाषावैभव, 

अरुण सौदागर.

9422660621. 

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मराठी भाषा वैभव - काव्यगुण

काव्यविचार