समारोप
मराठी भाषावैभव लेखांक १५ समारोप मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून आरंभलेली “भाषावैभव” ही लेखमाला म्हणजे माझ्यासाठी मायमराठीतील शब्दसंपदेच्या, भावसंपदेच्या आणि काव्यपरंपरेच्या वैभवाचे एक ललित दर्शन घडविणारी यात्रा ठरली. खरं सांगायचं तर एक मिरवणूकच म्हणावं लागेल या प्रवासाला! काव्याच्या या शोभायात्रेसोबत असताना कधी नादमय शब्दांची लय ऐकू आली, कधी अर्थांच्या गूढ छटा खुलल्या, तर कधी ध्वनीच्या सूचकतेतून काव्याचे गहिरे सौंदर्य अनुभवता आले. प्रसाद, माधुर्य आणि ओज या काव्यगुणांच्या माध्यमातून कवितेच्या अभिव्यक्तीतील निर्मळता, गोडवा आणि तेजस्विता यांचे दर्शन झाले; तर नवरसांच्या रंगमंचावरून मानवी भावविश्वाचे विविध आविष्कार समोर आले. शब्दालंकार व अर्थालंकार यांच्या साजशृंगाराने भाषेला जणू दीप्तिमान आभूषणेच लाभली, आणि काव्यप्रभा अधिकच तेजस्वी झाली. काव्यातील सौंदर्य पाहताना त्यातील दोषांचीही चर्चा करणे ओघाने क्रमप्राप्त ठरलं. मात्र हे दोष भाषेच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी केलेल्या अट्टाहासापायीच उद्भवले होते हे ध्यानात घेतलं की रसिकांना त्याविषयी वावगे वाटत नाही. तरीही च्युतसंस्क...