परभाषेतून आलेले काव्यप्रकार
भाषावैभव
[ लेखांक 14 ]
परकीय वाङ्मयांतून आलेली वृत्ते
मराठी भाषेचा स्वभावच असा आहे की ती परकीयतेला दूर लोटत नाही, तर तिचे स्वागत करून तिला आपल्या संस्कारांचा स्पर्श देते. विविध भाषांच्या काव्यपरंपरांतून उमललेले काही काव्यप्रकार मराठीच्या अंगणात येऊन स्थिरावले आणि तिच्या काव्यसंपदेचा भाग बनले. उर्दूची नजाकत लाभलेली गझल, चिंतनाचा गूढ ठसा उमटवणारी रुबाई, पाश्चात्त्य काव्यपरंपरेतून आलेले सुनीत, तसेच हिंदी परंपरेतील लयबद्ध दोहा — या सर्वांनी मराठी काव्याला नवे रंग, नवी लय आणि नवे अभिव्यक्तीविश्व दिले.
परभाषेच्या मातीत उमललेली ही काव्यफुले मराठीच्या बागेत येऊन फुलली तेव्हा त्यांच्या सुगंधाने मायमराठीचे काव्यवैभव अधिक समृद्ध झाले. त्या विविध काव्यप्रकारांचा परिचय करून देणारा हा लेख म्हणजे मराठी वाङ्मयाच्या या बहुरंगी काव्यपरंपरेचा एक ललित प्रवास आहे.
मराठीत प्रामुख्याने गझल व सुनीत हे दोन परकीय काव्य-प्रकार विशेषत्वाने रूढ झालेले दिसतात.
[ १ ] गझल किंवा रसना
गझल हे मूळचे अरबी वृत्त असून, यातील चरणांच्या जोड्या पाच ते सात असतात. यातील सर्व समचरणांच्या जोड्या एक-यमकी असतात. आरंभीचे चरणयुग्म ध्रुवपद म्हणून वापरले जाते. हे वृत्त मराठीत प्रथम आणण्याचे श्रेय मोरोपंतांना आहे. त्यांनी 'गज्जलांजली 'मध्ये गझलांचे पुष्कळच भेद-उपभेद दिले आहेत. त्यांपैकी २ ते ८ चे प्रथमचे चरण पुढीलप्रमाणे. (मराठीत ही वृत्तरचना शिथिल आढळते.)
उदा.
१)
रसने न राघवाच्या । थोडी यशांत गोडी ॥ध्रु. ॥
निंदा स्तुती जनांच्या । वार्ता वधू-धनाच्या ।।
खोट्या व्यथा मनाच्या। कांहीं न यांत जोडी ।। १
साधूचिया सदातें । सुख देतसें सदा ते ।।
श्रवणीं सुधा, मदातें । सोडोनि, हात जोडी ॥ २ ॥
..... (मोरोपंत)
२)
'आनंद-कंद ऐसा । हा हिंददेश माझा'
..... (आनंदराव कृष्णाजी टेकाडे)
३)
' आहे हुषार भारी । माझी मनी गुणाची'
...... (श्रीकांत)
४)
'झालों जरी स्वतंत्र । सोडूं न ताळतंत्र '
...... (बेहेरे)
५)
'हिंदपुत्रांनो स्वतांला लेखितां कां बापडे - भ्रांत तुम्हां कां पडे?
.... (माधव ज्युलियन = माधव त्रिंबक पटवर्धन )
६)
'कोठें तरि जाऊं बसुनी शीघ्र विमानी - तेथे चल राणी'
....... (माधव ज्युलियन)
७)
'भवानी आमुची आई । शिवाजी आमुचा राणा ।
मराठी आमुची बोली । गनीमी आमुचा बाणा ॥'
(माधव ज्युलियन)
[ २ ] सुनीत
इंग्रजी साॅनेट ( Sonet ) च्या धर्तीवर हा पद्यप्रकार मराठीत रूढ झाला.
याचे प्रकार दोन - इटालियन व इंग्लिश.
इटालियन सुनीतात ८ व ६ अशा ओळींचे आणि इंग्लिश सुनीत १२ व २ अशा ओळींचे दोन भाग असतात. तसेच १ व ४ ; ५ व ८; २ व ३ ; ६ व ७ आणि बाकीच्या चार ओळींत इच्छेनुसार यमक योजलेले असते.
इंग्रजी सुनीतांत १ व ३ ; २ व ४; ५ व ७ ; ६ व ८ ; ९ व ११ आणि १० व १२ याप्रमाणे यमक असतात.
इटालियन सुनीतात पहिल्या ८ ओळीत एक भावना व पुढल्या ६ ओळीत पहिल्या भावनेला कलाटणी देऊन निर्माण केलेली दुसरी भावना असते.
इंग्रजी सुनीतात पहिल्या बारा ओळीत एक भावना व बाकीच्या दोन ओळीत एखादे तत्त्व प्रतिपादित केलेले असते.
कोणत्याही प्रकारच्या सुनीतात विचारांची उदात्तता व गांभीर्य ही कायम टिकून राहणे आवश्यक असते.
या दोन प्रकारांना अनुक्रमे पद्म व गोपाल असे म्हणतात.
आम्ही कोण?
आम्ही कोण म्हणुनि काय पुससी?
आम्ही असू लाडके।
देवाचे दिधले असे जग तये आम्हांस खेळावया।
विश्वी या प्रतिभाबले विचरतो चोहीकडे लीलया,
दिक्कालांतुनि आरपार अमुची दृष्टी पहाया शके!
सारेही बडिवार येथिल पहा! आम्हांपुढे ते फिके;
पाणिस्पर्शच आमुचा शकतसे वस्तूंप्रती द्यावया-
सौंदर्यातिशया, अशी वसतसे जादू करांमाजि या;
फोले पाखडिता तुम्ही, निवडितो ते सत्त्व आम्ही निके!
शून्यामाजी वसाहती वसविल्या कोणी सुरांच्या बरे?
पृथ्वीला सुरलोक साम्य झटती आणावया कोण ते?
ते आम्हीच, सुधा कृतींमधुनीया ज्यांच्या सदा पाझरे;
ते आम्हीच शरण्य, मंगल तुम्हां ज्यांपासुनी लाभते!
आम्हांला वगळा — गतप्रभ झणी होतील तारांगणे;
आम्हांला वगळा — विकेल कवडीमोलावरी हे जिणे!
.... ( केशवसुत )
[ ३ ] दोहा
यांत पहिला व तिसरा चरण १३।१३ मात्रांचा असून, दुसरा व चौथा चरण ११/११ मात्रांचा असतो. दुसऱ्या व चौथ्या चरणांचे उपान्त्याक्षर ऱ्हस्व हवे , एवढेच.
हिंदीतून हा काव्यप्रकार मराठीत आला आहे. मराठीतील तीन उदाहरणे पुढे दिली आहेत. पण त्यांची रचना निर्दोष नाही.
१)
"कनक कनक तें सौगुनी । मादकता अधि काय ।।
वह खाये बौरात है। यह पाये बौराय " ॥१॥
२) श्रीरामाच्या । भक्त जनीं ऽऽ । हंसच जणुं बगळयांत् ।।
त्याच्या तुलसी । दाऽस तो ऽऽ । नांदो हार गळयांत् ||
...... (माधव ज्युलियन )
३)
'जोर मनगटांतला पुरा । घाल घाल खर्ची'
..... (केशवसुत)
४)
उंच उंच डोंगर भंवतीं। चढले नील नभांत '
...... (गोपीनाथ)
[ ४ ] रुबाई
हे फारसी वृत्त मराठीत रूढ आहे. त्यांत बरेच वेळा तीन चरण एक-यमकी, क्वचित् चारही चरण एक-यमकी असतात. तसेच एकच कल्पना किंवा एकच विचार त्यात गुंफलेला असतो.
उदा.
म्हणति "हुरसिंह उद्यां महोत्सव गोड
मी म्हणतों अजि हा द्राक्षासव गोड घे
ही रोकड उधार ती सोडुन दे
गमे दुरुनीच की दुंदुभि-रव गोड "
(माधवराव पटवर्धन)
अर्थ- " लोक मला सांगतात की , मृत्यूनंतर स्वर्गात अप्सरांबरोबर (हुरसिंह क्रीडा करणे हे अत्यंत सुखकर आहे; पण मी म्हणतो , मृत्यूनंतर का? आताच - द्राक्षासव (दारू) प्राशन करशील, तर ते अधिक सुखावह आहे. यासाठी आता येथे रोख मिळणारी वस्तु (रोकड) घे; व हात आखडून मृत्यूनंतर स्वर्गात मिळणाऱ्या सुखाच्या नादी लागू नको; कारण ढोलाचा आवाज पुढूनच ऐकल्यास तो वाटतो. "
*******************************************
या लेखाद्वारे आपल्या मराठी महान काव्यपरंपरेतील समृद्ध दालनातल्या वैभवाचं, ओझरतं का होईना, दर्शन घडलं असेल तरी मला धन्यता वाटेल.
मराठी भाषावैभव
(अरुण सौदागर).
9422660621
25/02/2026.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा