छंद

छंद

( लेखांक ९)

मराठीत संस्कृत वृत्तांपेक्षा वेगळी अशी स्वतंत्र छंदरचना प्राचीन काळापासून विकसित होत आलेली आहे. लोकजीवनातून उद्भवलेली लोकगीते, स्त्रियांच्या ओव्या इत्यादी प्रकार प्रारंभी वाङ्मयात औपचारिकरीत्या समाविष्ट नसले तरी ते परंपरेने अखंड चालत आलेले आहेत. पुढे त्याच परंपरेतून ओवी व अभंग या रचनांना साहित्यविश्वात मान्यता मिळाली. याच धर्तीवर भक्तिपर परंपरेत आरत्या रचल्या गेल्या; ‘आर्त’ म्हणजे पीडित अंतःकरणाने केलेली ईश्वराची स्तुती, हाक किंवा विनवणी—त्या भावनेतून आरतीचा जन्म झाला. तसेच दिंडी आणि साकी हेही पूर्णपणे मराठी परंपरेत विकसित झालेले छंदप्रकार आहेत. ‘आर्या’ हा छंद जरी संस्कृतातून मराठीत आला असला, तरी त्याची खरी लोकप्रियता मराठी वाङ्मयातच अधिक दिसून येते.

या निव्वळ मराठी वृत्तांपैकी ओवी व अभंग यांत अक्षरांचे साधारण नियमन आढळते, तर आर्या, दिंडी व साकी यांत मात्रांचे नियमन आढळते. लोकपरंपरेतून आलेली आरंभीची गीते, स्त्रियांच्या ओव्या तसेच ज्ञानेश्वर-तुकारामांसारख्या संतकवींनी रचलेले ओवी-अभंग हे प्रकार गणवृत्तांच्या चौकटीत बसवण्याचा प्रयत्न झाला असला, तरी त्यांच्या रचनेतील स्वाभाविक शिथिलता आणि अक्षर-गणांचा अचूक मेळ सर्वत्र जुळत नसल्यामुळे त्यांना कठोर अक्षरवृत्तांच्या चौकटीत बांधणे योग्य ठरत नाही.

याशिवाय या रचनांचा गानस्वरूपाशी असलेला निकट संबंध लक्षात घेतल्यास, अक्षरांचे उच्चार बहुधा लांबट व गेय स्वरूपाचे होत असतात. म्हणूनच छन्दशास्त्रकारांनी या रचनांना पारंपरिक वृत्तांपासून वेगळा असा स्वतंत्र प्रकार मानून त्यांना ‘छंद’ अशी विशिष्ट संज्ञा दिली आहे. अशा प्रकारे मराठी काव्यपरंपरेत लोकजीवनातून जन्मलेले आणि भक्तिभावाने संपन्न झालेले हे छंद मराठी काव्यवैभवाचा स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण भाग ठरतात.

आता काही गमतीदार छन्द-प्रकार पाहू. असे प्रकार मराठीच्या आरंभापासून उत्पन्न झालेले असावेत. यात १ ते १५ अक्षरांच्या चरणापर्यंत गीते सापडतात.

उदा. 

एकाक्षरी

गा | ई

ये । ग

दू | दू

दे  | ग


द्विक्षरी

आला । बोका

दूधा । धोका

बघा । मोका

आणी । ठोका


त्र्यक्षरी

मंजुळे । कोकिळे

पी पाणी । गा गाणी


चतुरक्षरी

काळा काळा । भट्ट्या आला

नीज बाळा । लाव डोळा || १ ||


पंचाक्षरी (अ)

आई येईल । बाळा घेईल

दूदू देईल। भूर नेईल || १ || ( मायदेव )


(आ)

ताई गुणाची । माझी छकुली

झोका दे दादा । म्हणू लागली || १ ||  

- (दत्तात्रेय कोंडो घाटे )


षडाक्षरी

(अ)

नदीच्या शेजारी । गडाच्या खिंडारी

झाडांच्या ओळीत । वेळूच्या जाळीत  || १ ||

-  ( भा. रा. तांबे)


(आ) 

वाघाची मावशी । आहे का माहीत

चला या दावीते । आमुच्या घरांत || १ ||  

- ( मायदेव = वासुदेव गोविंद मायदेव = वनमाळी? )


 ****


१. ओवी

हा पद्यप्रकार महानुभावकालीन  आहे. अगदी आरंभीची मराठी पद्यरचना ओवी-वृत्तांतच झाली. ज्ञानेश्वरांनी तिला अलंकारादिकांनी नटवून व अर्थाने गौरवून पूर्णतेस आणले. म्हणून 'ओवी ज्ञानेशांची' असे म्हणण्याचा प्रघात पडला आहे.

छन्दःशास्त्राकडे दुर्लक्ष असल्यामुळे ओवीच्या अक्षरांची संख्या मोरोपंतांशिवाय अन्य कोणत्याही प्राचीन संत कवींनी कडक रीतीने पाळलेली आढळून येत नाही .  

मोरोपंतानी रुक्मिणीगीत, सावित्रीगीत, सीतागीत ह्या ओव्या करून दिल्या त्या षडक्षरी अभंगाप्रमाणे वाटत असल्या तरी त्या ओव्याच आहेत.

स्त्रीगीतात्मक ओवी आणि वाङ्मयीन ओवी असे ओवीचे मुख्य दोन प्रकार आहेत. वाङ्मयीन ओवीच्या पहिल्या तीन चरणांत ६ ते १८ अक्षरें व चौथ्या चरणांत ४ ते १२ अक्षरे असू शकतील.

ह्या ओवीचे ज्ञानेश्वरी ओवी व एकनाथी ओवी असे प्रकार पडतात आणि परंपरागत स्त्रीगीतांमधील ओवीचे झोपाळयावरील ओवी व अंगाई-गीत ओवी असे प्रकार पडतात. 

ज्ञानेश्वरी ओवी

ह्या ओवीत पहिल्या तीन चरणात सामान्यतः आठ व शेवटच्या चरणात चार अक्षरे असतात; (परंतु हा नियम पाळला जात मात्र नाही ). पहिल्या तीन चरणांच्या अंती यमक असते . एकनाथी ओवीपेक्षा ही आखूड असते. उदा. --

(१) जो सर्वां भूतांचे ठायी । द्वेषातें नेणेचि कांहीं

      आप पर जया नाहीं । चैतन्या जैसें ||

- (ज्ञानेश्वरी) 


(२) आतां वंदूं कवीश्वर | जे शब्दसृष्टीचे ईश्वर

   नातरी हे परमेश्वर  | वंदावे ते ||

- ( रामदास स्वामी ) 


एकनाथी ओवी

ही ओवी चरणाक्षरसंख्येने ज्ञानेश्वरी ओवीपेक्षा लांबट असते, आणि पहिले तीन चरण व चौथ्या चरणाचे अर्धक यांच्या शेवटी यमक असते .

उदा--(१)

पडतां वानरांचें अनुमोदन | स्वयं पुसे रघुनंदन

शिष्ट पाठवावा कोण । तें निवडोन, सांगा मज.

- (संत एकनाथ) 


(२)

करी वीणा घेवोनि ब्रह्मसुत । शिवाजवळीं आला अकस्मात

म्हणे हे विश्वंभर विश्वनाथ । तुझें भक्त देखिले.

- (श्रीधर स्वामी) 


झोपाळ्यावरील ओवी

(१) पहिले तीन चरण षडक्षरी व शेवटचा चतुरक्षरी; चरण २ व ३ शेवटीं यमक असते.

(अ)

यज्ञासाठीं भूमि । मांगरितां धन्या

सापडली कन्या । सीतादेवी  

-(मोरोपंत - सीतागीत)


(आ) 

संतांपासूनीया । संता भय झालें

ऐसें कानां आलें । नाहीं कधीं 

- (मोरोपंत - सावित्रीगीत)


(२) पहिले तीन चरण सप्ताक्षरी व शेवटचा चतुरक्षरी

पहीली माझी ओवी । पहीला माझा नेम

तुळशीखालीं राम । पोथी वाची

- (जुने स्त्रीगीत)


(३) पहिले तीन अष्टाक्षरी व शेवटचा चतुरक्षरी

फूल फूल घोसाचिये । फूल गेलें घोसांत

तुझे सासर देशांत । अंबूबाई

- (जुने स्त्रीगीत)


(४) सर्व चरण अष्टाक्षरी; दुसऱ्या व चौथ्या चरणान्तीं यमक.

माझ्या छकुलीचे डोळे । दुध्या कवडीचे डाव ।

बाई कमळ कमळ | गोड चिडीचे ग नाव

- (वि. भि. कोलते)


 'अंगाईगीत' ओवी

त्रिचरणी  :

वरच्या ओव्यांतील शेवटचा चौथा चरण गाळून टाकिला म्हणजे ह्या प्रकारची ओवी होते. मात्र तीन चरण झाल्याबरोबर अपूर्ण वाटू नये म्हणून म्हणण्याची चाल निराळी असते. ती मधुर असल्यामुळे त्या ओवीचा प्रसार तुलनेने जास्त आहे. 'अनिलां' च्या अंगाई ह्या पद्यावरून हें नाव दिले गेले आहे.

(१) बहीण आपल्या भावास निजवताना म्हणते-

आकाशींच्या अंतराळीं। तारकांना तेज चढे

                                  --तुझी माझी प्रीति जडे || १ ||

परसांतल्या फुलांचा । वास कोनाकोनी खुले

                                 तुझा माझा श्वास मिळे ||२||

रातकीडे गीत गाती । 'अंगाई' फुलांना लागे

                             - आतां तू मी, नको जागे  || ३ ||


(२) 

बाळ जातो दूर देशा, मन गेले वेडावून

                             आज सकाळपासून,

हात लागेना कामाला, वृत्ती होय वेड्यावाणी

                                  डोळ्याचे ना खळे पाणी

आज दूध जिनसा नव्या, आणा ताजा भाजीपाला

                                    माझ्या लाडक्या लेकाला... 

                                     -- आज सकाळपासून

-(गोपीनाथ = गोपीनाथ गणेश तळवलकर) 

( २ ) अभंग

ओवी व अभंग ह्यांमध्ये बरेच साम्य आढळते. सर्व अभंगांमध्ये तुकारामांचे अभंग सरस असल्यामुळे 'अभंगवाणो प्रसिद्ध तुकयाची' ही उक्ती सर्वश्रुतच आहे. अभंगांत द्विचरणी व चतुर्चरणी असे मुख्य दोन प्रकार असून, अक्षर-भेद व यमक-भेद यांमुळे आणखी पुष्कळ उपप्रकार पडले आहेत.

द्विचरणी अभंग

(१) यात पहिल्या चरणात ६ आणि दुसर्‍या चरणात ८  अक्षरे असतात व चरणान्ती यमक असते.

महारासी शिवे । कोपे ब्राह्मण तो नव्हे

नातळे चांडाळ । त्याचा अंतरीं विटाळ

ज्याचा संग चित्तीं । तुका म्हणे तो त्या याती

(२) यांत प्रत्येक चरणांत ८ अक्षरें असतात व यमक चरणांती असते. 

कई वहावें जीवन । कई पलंगी शयन  .... १

जैशो जैशी वेळ पडे। तैसें तैसें होणें घडे......... २

- ( संत तुकाराम)

जन्मवरी शीण केला। अंतकाळीं व्यर्थ गेला...... १

काया स्मशानीं घातली । कन्या-पुत्र मुरडलीं  .... २

- (रामदास स्वामी )

(३) यांत प्रथम चरणात ८ व द्वितीय चरणात सामान्यतः  ७ अक्षरे असतात. परंतु यमक मात्र प्रथम चरणाचे शेवटी व द्वितीय चरणाच्या मध्ये असते .

ब्रह्मरस घेई काढा । तेणें पीडा, वारेल ... १

पथ्य नाम विठोबाचें। आणिक वाचे न सेवीं..... २

तेथे पंक्तिभेद नाहीं । मोठे कांहीं, लहान ........... ३

 - (संत तुकाराम)

चतुश्चरणी अभंग

(१) यात पहिल्या तीन चरणात प्रत्येकी ६ अक्षरे व चौथ्या चरणात ४ अक्षरे असतात. यमक दुसऱ्या व तिसऱ्या चरणांच्या अंती असते. (हे अभंग षडक्षरी ओवीशी पूर्ण मिळते जुळते आहेत).

[अ ]

नाहीं संतपण । मिळत तें हाटी

हिंडतां कपाटीं । रानीं वनीं

नये मोल देतां । धनाचिया राशी

नाहीं तें आकाशीं । पाताळीं तें

[ आ ] 

ऊठि गोपालजी। जाय धेन कडे

पाहती सौंगडे । वाट तूझी १

- (भूपाळी - कृष्णकेशव)

याप्रमाणे काही भूपाळ्याही अशाच प्रकारच्या असतात.

(२) यांत प्रत्येक चरणात आठ अक्षरे असून साडेतीन चरणांती यमक असते. (एकनाथी ओवीशी याचे साम्य आहे).

उदा. 

मन करा रे प्रसन्न । सर्व सिद्धीचें कारण ।

मोक्ष अथवा बंधन । सुख समाधान इच्छा ते ॥१॥ 

मनें प्रतिमा स्थापिली । मनें मना पूजा केली ।

मनें इच्छा पुरविली । मन माउली सकळांची ॥२॥  

-(संत तुकाराम)

(३) यात चारही चरण अष्टाक्षरी असतात व १/२, ३/४ या चरणांती यमक असते. (काही वेळा पहिली १-२ अक्षरे गाळतात).

उदा. 

रूप पाहतां लोचनी । सुख झालें वो साजणी

तो हा विठ्ठल बरवा । तो हा माधव बरवा ।

- ( संत ज्ञानेश्वर )

सर्वां भूती द्यावें अन्न । वस्त्र पात्र विचारून

उपतिष्ठे कारण । तेथे बीज पेरिजे

- (संत तुकाराम)

ओवी व अभंग यांतील फरक :

ओवी व अभंग यांचे सामान्य स्वरूप एकच आहे. म्हणजे बहुतेक चतुश्चरणी ओव्या व अभंग यांतील पहिल्या तीन चरणांत ६ किंवा ८ अक्षरे असतात आणि चौथ्या चरणांत सामान्यतः चार अक्षरे असतात; परंतु ओवीच्या बाबतीत हा निर्णय बहुतेक झुगारल्यासारखाच दिसतो.

[ ३ ] घनाक्षरी

ओवी व घनाक्षरी ह्यात वस्तुतः फरक नाही. चार ओव्यांचा एकत्र समुच्चय म्हणजे घनाक्षरी. एक ओवी म्हणजे घनाक्षरीचा एक चरण आणि अशा चारी चरणांच्या अंती मात्र एकच यमक पाहिजे.

अवो कैकेयी हे काय । केलें तुवां हाय हाय !

न म्हणवे तुज माय । जन्मोजन्मीं वैरिणी

सर्व-जग दभिराम । वना धाडिला तो राम

केलें विख्यात कुनाम । कीं हे पति-मारिणी

तुझ्या वर्षे न अधर्म । तुज मारावें हा धर्म

परी निंदील हें कर्म । राम, पाप-कारिणी

नाहीं तरी प्राण-आज्य । तुझे घालोनिया प्राज्य

जाळोनिया सामराज्य । दाखवितों करणी

- (वामन पंडित) 

४. सप्ताक्षरचरणी [ दीनवत्सल ] अक्षरे ७।७

या प्रकारात काही धावे, आरत्या अशा रचना येतात.

(१)

धाव रे रामराया । किती अंत पहासी ?

प्राणान्त मांडियेला । न ये करुणा कैशी ?

( - समर्थ रामदास स्वामी ) 

(२)

आरती ज्ञानराजा । महा कैवल्य-तेजा

सेविती साधु-संत । मनु वेधला माझा

५. द्वादशाक्षरचरणी (अक्षरे १२)

यांमध्ये काही आरत्या येतात ; परंतु त्यांची रचना अत्यंत शिथिल असते.

उदा. 

युगीं अठ्ठाविसी, विटेवरी उभा ।

वामांगी रखुमाई, दिसे दिव्य शोभा ||

पुंडलिकाचे भेटी, परब्रह्म आले गा।

चरणी वाहे भीमा, उद्धरी जगा ||

- (संत नामदेव)

******

या लेखाद्वारे आपल्या मराठी महान काव्यपरंपरेतील समृद्ध दालनातल्या वैभवाचं, ओझरतं का होईना, दर्शन घडलं असेल तरी मला धन्यता वाटेल.


 अरुण सौदागर,

 मराठी भाषावैभव. 

२४/०२/२०२६.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शब्दालंकार

मराठी भाषा वैभव - काव्यगुण

काव्यविचार