अर्धसम-वृत्ते
अर्धसम-जातिवृत्ते.
भाषावैभव
(अरुण सौदागर)
[ लेखांक 12 ]
अर्धसम-जातिवृत्ते
मराठी काव्यपरंपरा ही छंद, लय आणि वृत्त यांच्या सुगंधी फुलांचे एक रम्य उद्यान आहे. या बागेत सम-वृत्ते जशी सममितीचे सौंदर्य प्रकट करतात, तसेच काही वृत्ते अशीही आहेत की ज्यांत समतेसोबतच विविधता बहराला येताना दिसते. लयीच्या या मनमोहक रचनांना अर्धसम-वृत्ते असे म्हणतात.
समतेचा आधार आणि वैविध्याची छटा यांचा सुंदर संगम घडवणारी ही वृत्ते काव्याला एक वेगळीच नादमाधुरी प्रदान करतात. मराठी छंदशास्त्रातील या वैशिष्ट्यपूर्ण वृत्तप्रकाराचा परिचय करून घेण्यासाठी अर्धसम-वृत्तांची रचना, वैशिष्ट्ये आणि उदाहरणे यांचा वेध घेणे निश्चितच रसिकांसाठी आनंददायी ठरेल. ✨
अर्धसम-जातिवृत्ते
(अष्टमात्रिका)
[ १ ] शशिकान्ति (मात्रा १२ व १८)
यांत साकीतील (८+ ४) = १२ मात्रांचा प्रथम भाग असून, दुसऱ्या भागांत (२ + ८ + ८) = १८ मात्रा असतात. देवलांच्या मृच्छकटिकांतील पुढील पद्यावरून हे नाव पडले आहे.
उदा.
१)
अवचित या मे,घांनी, - शशि,कान्ति चोरिली, संधि साधुनी ।। ध्रु० ॥
मालक निर्बल, पाहुनि - न्या,वेऽ तयाचें, धन बहुतांनी
तैसें या मे,घांनीं - शशि,कान्ति चोरिली, संधि साधुनी
२)
'अरसिक किति हा, शेला'
.....( अण्णासाहेब किर्लोस्कर)
[ २ ] नृपममता (मात्रा १४ व १९)
यांत उद्धवाच्या (२+८+४) १४ मात्रांचा प्रथम चरण व भूपति-वैभवाच्या अंतऱ्याप्रमाणे (, १४+ ५ )= १९ मात्रांचा द्वितीय चरण असतो. कधी कधी (५ + ८ + ८) = २१ असा शारदा जातीचा अंतरा असतो. रामराज्य-वियोगांतील खालील पद्यावरून हे नाव पडले आहे.
उदा.
नृप,ममता रामा, वरतीं - प्राणाहुनि बहु आहे ती; कसें करूं ?
सिंहासन ज्येष्ठा, हातीं - ऐशीं तीं शास्त्र रडतीं; कसें करूं ?
निर्दया
नव्हे कैकया
राघवीं दया
अमित ती करिती - तशि नाहीं अपुल्या भरती; कसें करूं ?
[ ३ ] अक्रूर - (मात्रा २० व १४)
भूपतिवैभवाच्या प्रथम विभागातील शेवटच्या २ मात्रा गाळून ( ८+ ८+ ४) = २० मात्रांचा प्रथमार्ध व उद्धवाच्या दुसऱ्या भागातील (१० + ४ )= १४ मात्रांचा उत्तरार्ध ह्या जातीत असतो. अंतराही उद्धवाचाच असतो. 'अजि अक्रूर हा नेतो श्रीकृष्णाला ' ह्या जुन्या पद्यावरून हे नाव पडले आहे.
उदा.
बा नीज गडे, नीज गडे लडि,वाळा -
निज नीज माझ्या, बाळा.
रवि गेला रे, सोडुनि आका,शाला --
धन जैसें दुर्भा,ग्याला.
खडबड हे उंदिर करिती
कण शोधायातें फिरती..... ( वि. द. घाटे)
[ ४ ] अभिमन्यु (मात्रा १९ व १५)
यात (९ + १० व ९ + ६) = १९ व १५ अशा मात्रांचे गट असतात. पण ही रचना शिथिल आढळते. एका स्त्री-गीतावरून हे नाव पडले असावे.
उदा.
१)
पडला अभिमन्यु । मन्यू वीर रणीं, शोक केला फार ।
पांडवांनीं ||
२)
'चौघडा झडतो, झडतो दुमदुमुनी"
..... (भा. रा. तांबे)
३)
हिमालय अमुचा, अमुचा उंच जगी'
...... (गोखले)
[ ५ ] माधवकरणी [प्राणसखी] (मात्रा २६ व १५)
यांत प्रथम चरण चंद्रकांत (८+८ +८+ २) = २६ मात्रांचा असून द्वितीय चरण आखूड म्हणजे १५ मात्रांचा असतो. काही वेळा उद्धवाचा अंतराही असतो.
उदा.
लोटी प्रल्हा,दास तत्पित्ता, अग्निकटाहां,त-
अद्भुत, परि माधवकर,णी ।
अबाह्य भगव,द्भक्त तारता, देवाचा हात -
वाटिका, तिथे ही माधव,नीं।
देवाचा लाडका मी न सखि, अणू अणू जळतो-
त्यांतही, समाधान वा,टे ।
एकतानता, परी भंगतां, जिव हा कळवळ,तो -
फुलाचे, मग बनतो कांटे।
म्हणून न माझी फिर्याद
न घेई बा देई दाद
फिरेन मी जड, मुक्त होउनि, नभीं अमर्या,द
घेउनी नित्य तुझा नाद
(माधव ज्युलियन)
[ ६ ] माळीण [नवतरुणी ] (मात्रा २४ व २८)
यात चंद्रकांतापेक्षा आरंभीच दोन मात्रांनी कमी, म्हणजे (१० + १४) =
२४ मात्रांचा प्रथम चरण असून, दुसरा चरण चंद्रकांतापेक्षा प्रारंभीच दोन मात्र अधिक (१८ + १०) = २८ मात्रांचा असतो. कधीकधी मंजरीचा (१६ + ५) = २१ मात्रांचा अंतरा असतो.
उदा.
१)
प्रियकर हिंदिस्तान् -आमुचा प्रियकर हिंदिस्तान्
हा अलंकार हो भूगोलाचा, यास नसे उपमान ।। ध्रु.॥
हे जन्मभूमि हें, तन-मन-धन घे तुला
तव उपकारांना, न मिळे कोठें तुला
हें फिटणें साध्य न, आम्हां अति-दुर्बलां
सुखकर तव में ध्यान् - निरंतर सुखकर तव गे ध्यान्
जो जननीचा जो जनकाचा गे, तोच तुझाही मान्.
..... (टिळक)
२)
'तरुण कुलिन गोरा, हसतमुख'
..... (देवल)
[ ७ ] केशवकरणी (मात्रा २७ व १६)
यात माघवकरणीपेक्षा उपान्त्य अक्षर एका मात्रेने अधिक असते. (८+८+८+ ३) = २७ असा प्रथम चरण व दुसराही चरण माघवकरणीपेक्षा उपान्त्य अक्षर एकाच मात्रेने अधिक म्हणजे (५+८+३) १६ असा असतो. कधी कधी मंजरी (लीलारति) चा अंतरा असतो. रामजोशांच्या खालील पद्यावरून हे नाव पडले आहे.
उदा.
१)
केशवकरणी, अद्भुतलीला, नारायण तो, कसा
-- तयाचा, सकल जनांवर, ठसा ।। ध्रु० ॥
माधवमहिमा, अगाध गोडी, गोविदाच्या, रसा-
पोत जा, जिव होइल थं,डसा......... १.
विष्णू म्हणतां, विकल्प जाती, मधुसुदनानें, कसा -
काढिला, मंथनसमयीं, जसा ......... २.
२)
'खबरदार जर, टांच मारुनी, जाल पुढे चिं,धडघा'..... (वा. भा. पाठक)
३) 'तुझी पांखरा, गोजिरवाणी, मनोहरा आ,कृती ' ... (विनायक)
[ ८ ] मुद्रिका (मात्रा २१ आणि १४ व १३)
यात मंजरी (लीलारति) चा २१ मात्रांचा प्रथम चरण आणि नंतर उद्धवाच्या १४ मात्रांना जोडून पुढे १३ मात्रांचा एक भाग असतो. 'मुद्रिके, राम टाकुन आलिस तूं कशी ?' ह्या गाण्यावरून हे नांव पडले आहे.
उदा.
१)
भंगिलं शिवधनुष्य रामें वरिलें मला
वनि आलों उभयतां बाई - कांचनी मृग देखिला ||
२)
'मी उठून सकाळीं कामाला लागतें' ..... (मायदेव)
[ ९ ] श्रीरंग (मात्रा ३० व २२)
यात प्रथम चरणात आरंभीच साकीपेक्षा दोन मात्रा अधिक असतात; आणि दुसरा चरण भूपतिवैभवाप्रमाणे असतो. अंतरा असल्यास भूपतिवैभवाचाच असतो. रामजोशांच्या 'श्रीरंग गोपिकोत्संग' या पद्यावरून हे नाव पडले आहे.
यमपाश, गळ्याशी ज्यात, लागला त्यात, मला कां देतां?
मांस विकुन ध,र्मास वाकडे, होता ।। ध्रु० ।।
पाळिलें घातलें खाया - अजवरी
बकरीत मोल बहु वाया--ज्यापरी
ही तुमचि मुलीवर माया - कां खरी ?
जगतांत, सदय सकलांत, माउली-तात, मुलीला असतां
मग तुम्हीच इतके, कठोर कां गे, होतां ?
..... (देवल)
*******
या लेखाद्वारे आपल्या मराठी महान काव्यपरंपरेतील समृद्ध दालनातल्या वैभवाचं, ओझरतं का होईना, दर्शन घडलं असेल तरी मला धन्यता वाटेल.
अरुण सौदागर,
मराठी भाषावैभव
9422660621.
२५/०२/२०२६.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा