मात्रा-वृत्ते (जाति)
मात्रा-वृत्ते (जाति)
लेखांक [ १० ]
मराठीत सामान्यतः ज्यांना आपण 'पदे असे म्हणतो , त्यांचा समावेश मात्रावृत्तात किंवा जाति-वृत्तात होतो. गाण्याच्या वेगवेगळ्या चालींवर व तालांवर त्यांची रचना असल्यामुळे, पदे विविध प्रकारची होऊ शकतात.
प्रामुख्याने एकनाथांच्या वेळेपासून ही पदरचना झालेली दिसत असली तरी त्यांचे शास्त्रशुद्ध वर्गीकरण करण्याचा मान प्रा. माधवराव पटवर्धन ह्यांच्याकडे जातो. त्यांच्या 'छन्दोरचने' च्या आधारे इथे विवेचन केले आहे. (पुढे खुणेने दर्शविलेल्या संज्ञा त्यांनीच दिलेल्या आहेत).
मात्रा-वृत्तात किंवा जाति-वृत्तात केवळ पदेच असतात असे नाही. त्यात निरनिराळे रस असणारी किंवा प्रासंगिक कवनेही असतात. वर्णनात्मक गीतांमध्ये 'कटाव', उपदेशपर गीतांसाठी 'फटके', शृंगार-रसासाठी 'लावण्या', वीररसासाठी 'पोवाडे' यांचा समावेश होतो. तर
अंगाईगीत, उखाणे, पाळणे, भूपाळी, भजने, आरत्या हे प्रकार प्रासंगिक गीते म्हणून ओळखले जातात.
जाति-वृत्तांमध्ये एकाच मात्रावलीची चरणयुग्मे, दोन वेगवेगळ्या मात्रावलीची चरणयुग्मे आणि. निरनिराळ्या मात्रावलींचे वेगवेगळे चरण असे प्रकार पडतात. यांपैकी काहींमध्ये ध्रुवपद व अंतरा हे घटक असतात.
कडव्याच्या ओळी हा जाति-वृत्ताचा गाभा मानला जातो. एखाद्या कडव्याच्या चरणाच्या मात्रा, गट आणि यती यावरून जाति ठरवता येते. कडव्यांमधले अंतरे पुढील प्रकारचे आढळतात.
[ १ ] पद्म - ( मात्रा ८)
हीं निःश्वसितें
कोण सोडिलें ?
मम हृदयीं तें
- ( टिळक - 'कवीची विनवणी' )
[ २ ] प्रविसूर्यकान्त - मात्रा १३.
किति विशाल तटा हा अहा
प्रिय सखे, उभी तूं रहा
क्षण येथिल शोभा पहा
- (माधवानुज - कृष्णा-कोयना--संगम)
[ ३ ] शारदा -
(मात्रा ५ व ८, ८, ८ असे तीन चरण.)
मावळे,
जयांनी दिले,
आपले गळे
देश-रक्षणीं
[ ४ ] बालानन्द - मात्रा ( ८ + ६ ) १४.
मुकी बिचारी कुणी हाका!
अशी मेंढरे बनू नका ।
गेल्या गोष्टी स्मरू नका,
गत काळाचा शोक फुका ॥.
- (ह. ना. आपटे - असारजीवित केवळ माया)
[ ५ ] उद्धव - मात्रा ( २ + ८ + ४ ) १४.
नयनांच्या शिपांमधुनी
अश्रूंचे मौक्तिक-सुमणी
मीं दिले तया काढोनी
- (राम गणेश गडकरी - राजहंस माझा निजला)
[ ६ ] पादाकुलक - मात्रा (८+ ८) १६
अवघड गड, अस्मानी डोले
वरतीं बघतां, फिरतिल डोळे
खालीं पाता-ळांतिल इमले
- ( दिनकर गंगाधर केळकर = अज्ञातवासी - 'सरदार धन्य एवढा)
[ ७ ] भूपतिवैभव-(मालिबाला) - मात्रा (१४ + ५) = १९.
म्हणुनि कां त्यासि सेवावे ? - सांग तूं
धनिच कां अधिक मानावें? - सांग तूं
गुण त्यांचें कां न बघावे ?- सांग तूं
- ( मृच्छकटिक - 'भूपती खरे ते)
[ ८ ] मंजरी लीलारति- मात्रा २१.
मोत्यांचे राणे भरले, कणसांत या
लवली ही खाली कितितरि भारें तया
आनंदें डुलतिल पावा, परिसोनिया
- (भा. रा. तांबे - पावा)
*****
या लेखाद्वारे आपल्या मराठी महान काव्यपरंपरेतील समृद्ध दालनातल्या वैभवाचं, ओझरतं का होईना, कुणाला दर्शन घडत असेल तरी मी स्वतःला धन्य समजेन.
अरुण सौदागर,
मराठी भाषावैभव
२४/०२/२०२६.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा