सम-जातिवृत्ते
सम-जातिवृत्ते
[ लेखांक 11]
जाति-वृत्तांच्या विश्वात सम-जातिवृत्ते हा एक देखणा आणि संतुलित प्रकार मानला जातो. लय, मात्रा आणि चरणरचनेतील समत्व यांमुळे या वृत्तांना विशेष माधुर्य लाभते. कवीच्या भावनांना सुबक चौकट देत, काव्याला शिस्तबद्ध गती देण्याचे कार्य ही सम-जातिवृत्ते करीत असतात. या प्रकाराचे स्वरूप, वैशिष्ट्ये आणि उदाहरणांच्या साहाय्याने त्यांची ओळख करून देण्याचा हा अल्प प्रयत्न आहे.
तालाच्या दृष्टीने अष्टमात्रिक तालीय म्हणजे आठ आठ मात्रांच्या एकेका गटानंतर टाळी येणारी व षण्मात्रिक तालीय म्हणजे सहा सहा मात्रांच्या एकेका गटानंतर टाळी येणारी अशी जाति-वृत्ते असतात.
सम-जाति वृत्ते
(अष्टमात्रिक)
यांत आठ आठ मात्रांचा एक एक गट अशीं अनेक आवर्तने असतात. कमी पडलेल्या मात्रा जरूर तेथे आलापांनी भरून काढतात.
[ १ ] बालानंद
[अचलगति] (मात्रा १४)
यात एकेका चरणात ८ व ६ मात्रांचे दोन गट असतात. कधीकधी अंतरा पद्माचा असतो तर कधी नसतो. बालकवींच्या पुढील पद्यावरून हे नाव देण्यात आले आहे.
१)
आनंदी आनंद गडे । इकडे तिकडे, चोहिकडे
वरतीं खाली, मोद भरें । वायूसंगें मोद फिरे
नभांत भरला
दिशांत फिरला
जगांत उरला
मोद विहरतो, चोहिकडे । आनंदी आनंद गडे
२)
'ये ये ताई, पहा पहा। गंमत नामी, किती अहा'
- (गोखले)
३)
'या चिमण्यांनो, या गया। अंगणि माझ्या, नाचाया'
- (मायदेव)
[ २ ] उद्धव - (मात्रा १४)
(२+८+४) = १४ मात्रांचे गट एकेका चरणांत असतात. अशा दोन चरणांनी मिळून ध्रुवपद होते. अंतराही उद्धवाचाच असतो. शेवटीं ध्रुवपदाशी जुळणारा १४ मात्रांचा एकच चरण घालून मेळ जुळवला जातो. ' मध्वमुनी' च्या खालील सुप्रसिद्ध पद्यावरून हे नाव पडले आहे.
१)
उद्धवा शांतवन, कर जा। त्या गोकुलवासि जनांचें ॥ध्रु।।
बा, नंद-यशोदा, माता । मज,साठी त्यजितिल, प्राण
त्या,गुनी प्रपंचा फिरती। मेनि, उदास रानो,रान
अन्न-पाणि त्यजिलें, रडती। अति, दुःखित झाले, दीन
जन्मले तैंहुनी, झटले
मज, लागी तिळतिळ, तूटले
कटि, खांद वाहतां, घटले
आ,टलें रक्त दे,हाचें ।। ध्रु ।।
२)
हा कोण इथे पडलेला । कादरखां काबुलवाला
- ( केशवकुमार)
३) नाकेला अन् गुल्जार। सावळा नि सुंदर भासे
- (साधुदास)
४) न्ह्यारिचा वकुत होईल। मैतरणी बिगिबिगी चाल - ( यशवंत = यशवंत दिनकर पेंढारकर )
५) हे कोण बोलले बोला। राजहंस माझा निजला !
- ( गोविंदाग्रज = राम गणेश गडकरी )
[ ३ ] पादाकुलक - (मात्रा १६)
यांत प्रत्येक चरणांत ८।८ मात्रांचे दोन गट अशी चरण-युग्मके येतात.
१)
हिरवे हिरवे, गार गालिचे हरित तृणांच्या, मखमालीचे
त्या सुंदर मख,मालीवरती फुलराणी ही, खेळत होती
- (बालकवि = त्र्यंबक बापूजी ठोंबरे )
२) अशी तुतारी, था मज आणुनि '.
............. (केशवसुत = कृष्णाजी केशव दामले)
३) हौद चिमकुला, होता सुंदर'
(म. का. कारखानीस)
टीप - पादाकुलकाचे तीन चरण व चौथा त्रोटक १० मात्रांचा असल्यास 'अंजनीगीत' होते .
उदा.
जेथे हिरवळ फार विलसते । लता द्रुमांची शोभा दिसते
तेथे फुलपांखरूं पहा हे। सुंदर बागडतें
- (केशवसुत)
[ ४ ] कटिबंध, 'कटाव' (मात्रा १६)
पादाकुलकाचे सोळा मात्रांचे अनेक चरण मिळून कटिबंध होतो. त्यांच्या शेवटी एक यमक साधलेले असते. असे १६ मात्रांचे किती गट असावेत याचा निश्चित नियम नाही. अशाच पुढच्या काही गटांमध्ये वेगळे यमक साधलेले असते. ही जाति शीघ्रकवित्वास सोयिस्कर मानली जाते. काही कटिबंधात उद्वव जातीचे ध्रुवपद आरंभी असते. 'अमृतराया' चे कटाव फार प्रसिद्ध आहेत.
उदा.
सुरलोकाहुनि, गंगा आली । भूमीवर येण्यास निघाली
शर्व-जटी ती, उडीच घाली । देव-मंडळी, पाहूं आली
फिरति विमानें दाटी झाली । मुनि-जन-संतति, सर्व मिळाली
जयोस्तु म्हणुनी, स्तवनें करिती। सुरांगना ओवाळिति आरति
किन्नर टाकिति, पुष्पें वरती । हा हा हू हू, तूंबरू गाती
[ ५ ] मंजरी [ लीलारति ] - (मात्रा २१)
यांत (२+८+८+३) २१ याप्रमाणे मात्रांचे गट असतात. केव्हा केव्हा ध्रुपदांतील दुसरी पंक्ति भिन्न प्रकारची १६ मात्रांची असते.
उदा.
१)
ही, मोट भरे भर, भरा चढे कर, कर।
बिहि,रींत बघा वा,कुनी जरा वा,कुनी
पाण्यांत लई भों,वरे फेस गर, गरे
हे , काम राहिलें, करा; कसा कं,बर
- ( ना. घ. देशपांडे )
२) 'वा,जते, फटाफट, गोफण माच्या,वरी'
- (मायदेव)
३) 'जा,ईन कधीं मी, आतां माझ्या, घरीं'
- (ग. ल. ठोकळ)
टीप - याच जातीच्या पाच चरणांचा मिळून 'कर्काणका' हा प्रकार गोपीनाथ तळवलकर यांनीं मराठींत आणला आहे.
[ ६ ] गुणी [ स्वरगति ] - (मात्रा २०)
यात प्रथम भाग ६ मात्रांचा व दुसरा भाग १४ मात्रांचा बालानंद जातीच असतो. अंतरा कधी पद्माच्या जातीचा ८ मात्रांच्या तीन ओळींचा असतो.
उदा.
बाळ कुणी - संध्याकाळीं, रमे गुणी
खेळतसे - बाळ अंगणीं, हवेंतसें
बागेत मौजेनें झो,के घेत
तों दिसली- सुंदरशी त्या,ला वेली
देठ कोवळे ,
हिरवे पिवळे, नाजुक सगळे,
ती वेली - हिरवा शालू, पांघरली
- (राम गणेश गडकरी )
[ ७ ] भूपतिवैभव (मात्रा २२)
यांतील प्रत्येक चरणांत (२+८+८+४) २२ असे मात्रांचे गट असतात; आणि (१४+५) - १९ मात्रांचा अंतरा असतो. त्यास भूपतिवैभवाचा अंतरा बसें म्हणतात. खालील पद्यावरून हे नाव पडले आहे.
१)
भू,पती खरे ते, वैभव-सुख से,वीती
बहु, दास सेवनी, दक्ष सदा रा,हाती ॥ ध्रु ॥
म्हणुनि कां त्यांसि सेवावें ? - सांग तूं
धनचि कां अधिक मानावें ? - सांग तू
गुण त्यांचे कां न बघावें ? - सांग तू
संपत्ति-बळाच्या, मदें धूंद ते, होती
स्व,च्छन्द वागती, नाहि तयां नय, रीती
- (देवल)
२)
'कर, करत खालतीं, मोट हळूहळू, जाई.'
- (इंदुभूषण)
[ ८ ] पन्ना [रेवती] - (मात्रा २४)
यांत (६ + ७ + ६ + ५) २४ याप्रमाणे मात्रांचे गट येतात.
उदा.
१)
देशाची, भक्ति पूर्वी, जरि नव्हती, भारती
उत्कर्षै, स्वामि-निष्ठा, होती सा,चार ती
रक्षाया, स्वामिवंशा, पुत्राची, आहुती
पन्ना दे, कथा तीची, राहो दी,र्घायु ती
- (किर्लोस्कर)
२)
'श्रीहरिच्या, वेणुनादें, मन माझें, मोहिले'
३)
'रुचती का, तीर्थयात्रा, या समयी, त्यास ती'
( विनायक)
[ ९ ] मोहिनी [ महाराष्ट्र-लक्ष्मी ] -
यांत (६+८+६+४) २४ याप्रमाणें मात्रांचे गट असतात.
उदा.
१)
महाराष्ट्र, लक्ष्मी मातें, जगीं धन्य, वाटे ।। ध्रु० ॥
यशोगीत, तीचें गातां, मनीं हर्ष, दाटे
पुनः पुन्हा, परचक्रानें, ताडिली बि-चारी
दीर्घकाल, खचली होती, पारतंत्र्य, भारी
द्वादशाब्द, दुष्काळानें, जाहली भि,कारी
संकटांत, तीच म्हणोनी, करी उंच मायें
- (विनायक)
२)
'सोड सोड, आतां आपुल्या, गोड मोहि,नीला'
- ( गिरीश = शंकर केशव कानेटकर )
[ १० ] चंद्रकांत [ पतितपावन ] -
(मात्रा २६)
यांत (८+८+८+२) २६ असे मात्रांचे गट असतात. अंतरा कधी कधी मंजरी-लीलारति- (२१ + ५) २६ मात्रांचा असतो. ( देवलांच्या झुंजारराव नाटकांतील 'चंद्रकांत राजाची कन्या ' ह्या सुपसिद्ध पद्यावरून पडले.)
उदा.
१)
घुमव घुमव ए,कदां फिरुनि तो, गोड तुझा पा,वा
सोनें झालें, शेत पिकुनि हे , गातें मीं वा, वा
मोत्यांचे दाणे भरले कणसांत या - रे सख्या
लवलीं हीं खाली कितितरि भारें तया - रे सख्या
आनंदे डुलतिल पावा परिसोनिया - रे सख्या
होति विलक्षण, वृत्ति मनाच्या भुलति दुष्ट भा,वा
फुंकाऱ्यासह जाति उडोनी , क्रोध लोभ हेवा
- (भा. रा. तांबे )
२)
'लहान सुंदर, गोजिरवाणी, दिसे कशी ही, खार
- (म. का. कारखानीस)
३)
पिवळे तांबूस, ऊन कोवळे, पसरे चौफेर'
- ( भा.रा.तांबे)
[ ११ ] सूर्यकांत [ समुदितमदना ]
(मात्रा २७)
यात ८ मात्रांचे तीन गट व अंती गुरुपूर्व एक लघु अशा तीन मात्रा असतात.
चंद्रकान्ताचे एक उपांत्यलघु अक्षर वाढवले की ही जाति सिद्ध होते.
१)
सृष्टीचा लडिवाळ बाळ वेल्हाळ कवी धाकटा
अफाट जग-हा,टांत पाहिला, हिरमुसला ए,कटा
कळवळली कन,वाळु मनीं अस, माय माय-मा,वली
बाजारांतुन, काढुनि माया, पांखर वर घा,तली
चंद्र-सूर्य खे,ळणीं दिली खेळाया तेजा, गळीं
कुरवाळी हळु,वारपणे पण, न फुले कवि-मन-कळी [२]
- (कवी बी = नारायण मुरलीधर गुप्ते)
२)
असतिल तेथे, जिकडे तिकडे, विखरुन पडली, फुले'
- (ग. ल. ठोकळ)
[ १२ ] साकी [लवंगलता]
(मात्रा २८).
चंद्रकांताच्या शेवटी आणखी एक गुरु अक्षर वाढवले की (८+८+८+४) = २८ ही जाति सिद्ध होते..
उदा.
जेथे नित्य फु,लूनीऽतरू, त्यांवरि गुंगति, भुंगे
नित्य डोलती, विकसुनि नलिनी, कलहंसाच्या संगे .... १ नित्य नाचतो, मोर उभारुनि, सुंदर थोर पि,सारे
प्रकाशूनिया, नित्य चंद्रही, उजळी प्रदेश, सारे .... २
- (कृष्णशास्त्री चिपळूणकर)
[ १३ ] भवानी (मात्रा ३०)
साकीच्या आरंभी दोन मात्रा वाढवल्यास (२+८+८+८+४) ३० ही जाति होते. यात ध्रुवपद उद्धवाचे (१४ मात्रांचे) आहे.
उदा.
कुस्करूं नका हीं सुभनें ।॥ ध्रु० ।।
जरि, वास नसे तिळ, यांस तरी तुम्हांस अर्पिली, सु-मनें
मधु, जरी नसे तिळ, भरी अंतरी, तरी करीं हीं, धरणे
[ १४ ] स्वर्गंगा [ हरिभागिनी]
( फटका. मात्रा ३०)
भवानीच्या आरंभीच्या दोन मात्रा कमी करून शेवटच्या अक्षरापूर्वी आणखी दोन मात्रा वाढवल्यास (८+८+८+६ = ३०) ही जाति होते. कधीकधी बालानंद जातीचा १४ मात्रांचा अंतरा असतो.
१)
बिकट वाट वहि,वाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको
संसारामधि, ऐस आपला उगाच भटकत फिरू नको ॥ ध्रु० ॥
मायबापांवर रुसू नको
दूर एकला बसू नको
व्यवहारामधि फसू नको
परी उलाढाली भलभलत्या, पोटासाठी करूं नको |
- (अनंतफंदी = अनंत भवानीबाबा घोलप )
२)
'सूर्य किती हा, वरती आला, शाळा भरली, मघांच ती'
(कारखानीस)
३)
'फेरीवाला, दारीं आला, लोटित अपुल्या, गाडीला'
- (पुराणिक)
४)
'आनंदाचा, कंद हरि हा देवकिनंदन, पाहिला'
[ १५ ] सुंदरा [ मदनतल्वार]
(मात्रा ३८)
भवानीत ८ मात्रांचे तीन गट असतात, त्यांऐवजी चार गट केले म्हणजे ही जाति (२+८+८+८+८+४) = ३८ होते. रामजोशी यांच्या 'सुंदरा मनामधि भरलि' ह्या उत्कृष्ट लावणीतील पहिल्या शब्दावरून हे नांव दिले गेले आहे.
उदा.
श्रो,मंत प्रतापि बलवंत कीर्ति आ.नंत बाळाजी, पंत पेशवे, थोर
भू,पती वाकती, किती चरण ल,क्षिती शब्द झे,लिती तयांचा, जोर ॥ ध्रु०॥
चा,लले अश्व फे.किले गजहि दौ,डिले वीर खौ,ळले जातिचे, शूर
मर्दना रिपू-कं,दना देश - तारणा कराया, रणा डोळघांवर्, धूर.
षण्मात्रिक
[ १ ] दिंडी -
(मात्रा १९)
यात चार चरण असून, तिचे (३ + ६ ) = ९ व (६ + ४) = १० ह्याप्रमाणे मात्रांचे गट पडतात; यति ९ व्या मात्रेनंतर व शेवटी असतो. १/२ व ३/४ ह्या चरणांचे किंवा चारी चरणांचे यमक असते.
उदा.
कथा बोलू हे, मधुर सुधाधारा । होय शृंगारा, करुण रसा थारा
निषधराजा नळ, नामधेय होता। वीरसेनाचा, तनय महा-होता
- ( रघुनाथ पंडित )
[ २ ] धवलचंद्रिका (मात्रा २०)
यात (६+६+६+२) = २० असे मात्रांचे गट असतात. (देवलांची 'धवलचंद्रिकाच काय पूर्ण सांचली या पद्यावरून हे नाव पडले आहे).
उदा.
१)
बहु असोत सुंदर सं,पन्न ही म,हा
प्रिय अमुचा, एक महा,राष्ट्र-देश, हा ।। ध्रु० ॥
विक्रम-वै,राग्य एक, जागि नां,दती
जरिपटका, भगवा झेंडाहि डोल, ती
धर्म-राज, कारण सम,वेंत चाल, ती
शक्ति-युक्ति, एकवटुनि, कार्य साधि,ती
पसरे यत्,-कीर्ति अशी, विस्मयाव हा ।।
- (श्रीपाद कृष्ण कोल्हटकर)
[ ३ ] दासी
यात ६।६ मात्रांचे गट असतात. यति चरणांती असल्याने ते अक्षर गुरु असावे.
उदा.
१)
दासि ऐसें, मानुनिया, कार्य मला, सांगतसे
सुदिन काय, उगवलाऽ, आज मनी, वाटतसे ।। ध्रु० ॥
मधुर जाति, सुमनांचा, वास यास, येत असे
उत्सवनर, म्हणुनि याचा, खास अजुनि पूर्ण असे
यांतील १ ल्या व ४ थ्या चरणांत एकेक मात्रा वाढत होती, त्यांचे उच्चार कवीने ऱ्हस्व करून ६ मात्रांचा गट केला. तसेच दुसर्या चरणात एक मात्र पडत होती, ती कवीने एका मात्रेच्या आलापाने भरून काढली आहे.
२)
'डोळे हे, जुल्मि गडे, रोखुनि मज, पाहुं नका '
- (तांबे)
[ ४ ] आर्या
(मात्रा १२, १८, १२ व १५)
मोरोपंतांनी 'गीति' हे वृत्त मराठीत प्रचलित केले, यालाच आर्या म्हणतात. परंतु मुळात दोहोंमध्ये फरक आहे. आर्येत १२, १८ व १२, १५ ह्याप्रमाणे क्रमाने चरणातील मात्रा असतात.
उदा.
ती तातास म्हणे कच, गुरुभक्त साधु कुलीन कार्यकर
परि त्यासि सोडिले जळ, जळ सोडू मजहि आर्यकर.
- (मोरोपंत)
[ ५ ] गीति -
(मात्रा १२, १८, १२ व १८)
उदा.
शल्य म्हणे राधेया, जेव्हां तुझिया स्मरोनि कर्मांतें
अर्जुन तीव शरांनी, समरी भेदील सर्व मर्मांते
- ( मोरोपंत)
***
या लेखाद्वारे आपल्या मराठी महान काव्यपरंपरेतील समृद्ध दालनातल्या वैभवाचं, ओझरतं का होईना, दर्शन घडलं असेल तरी मला धन्यता वाटेल.
अरुण सौदागर,
मराठी भाषावैभव.
9422660621.
25/02/2026.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा