समारोप

मराठी भाषावैभव 

लेखांक १५

समारोप 

मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून आरंभलेली “भाषावैभव” ही लेखमाला म्हणजे माझ्यासाठी मायमराठीतील शब्दसंपदेच्या, भावसंपदेच्या आणि काव्यपरंपरेच्या वैभवाचे एक ललित दर्शन घडविणारी यात्रा ठरली. खरं सांगायचं तर एक मिरवणूकच म्हणावं लागेल या प्रवासाला!  काव्याच्या या शोभायात्रेसोबत असताना कधी नादमय शब्दांची लय ऐकू आली, कधी अर्थांच्या गूढ छटा खुलल्या, तर कधी ध्वनीच्या सूचकतेतून काव्याचे गहिरे सौंदर्य अनुभवता आले.
प्रसाद, माधुर्य आणि ओज या काव्यगुणांच्या माध्यमातून कवितेच्या अभिव्यक्तीतील निर्मळता, गोडवा आणि तेजस्विता यांचे दर्शन झाले; तर नवरसांच्या रंगमंचावरून मानवी भावविश्वाचे विविध आविष्कार समोर आले. शब्दालंकार व अर्थालंकार यांच्या साजशृंगाराने भाषेला जणू दीप्तिमान आभूषणेच लाभली, आणि काव्यप्रभा अधिकच तेजस्वी झाली.
काव्यातील सौंदर्य पाहताना त्यातील दोषांचीही चर्चा करणे ओघाने क्रमप्राप्त ठरलं. मात्र हे दोष भाषेच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी केलेल्या अट्टाहासापायीच उद्भवले होते हे ध्यानात घेतलं की रसिकांना त्याविषयी वावगे वाटत नाही. तरीही च्युतसंस्कृती, शब्ददोष व छंदोदोष यांचे अस्तित्व काव्यरचनेतील शुद्धतेला हानिकारक ठरते, हेही तेवढंच खरं, नाही का? 
भाषेच्या कलेचा विलास अनुभवताना सुभाषितांमागचा सद्हेतू, कोटी-विनोदांमधून डोकावणारा खोडकर, व्रात्य मिस्किलपणा, विडंबनातील चिमटा, तसेच वाक्प्रचार आणि म्हणींमधून प्रकटणारे लोकजीवनाचे तात्पर्य यांचेही दर्शन घडले.
यानंतर काव्यवृत्तांच्या विश्वात प्रवेश करताना समवृत्ते, अर्धसम-वृत्ते, विषम-जातिवृत्ते आणि मात्रावृत्ते यांची लयबद्ध परंपरा समोर आली. संतकवी आणि पंतकवी यांच्या उदाहरणांमधून मराठी काव्यपरंपरेची समृद्ध परंपरा अधिकच उजळून दिसली.
इतकेच नव्हे तर अन्य भाषांमधून मराठी वाङ्मयात आलेल्या गझल, रुबाई, सुनीत किंवा दोहा यांसारख्या काव्यप्रकारांनीही मराठी भाषेच्या स्वीकारशीलतेची आणि व्यापकतेची साक्ष दिली.
या सर्व चर्चांमधून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते—मराठी ही केवळ संवादाची भाषा नाही; ती विचारांची, भावनांची, संस्कृतीची आणि काव्याची समृद्ध अभिव्यक्ती आहे. तिच्या शब्दांत इतिहासाचे भान आहे, तिच्या लयींत परंपरेचा नाद आहे आणि तिच्या अर्थछटांमध्ये भविष्यात भरारी घेण्याची आकांक्षा दडलेली आहे.
म्हणूनच या लेखमालेचा समारोप करताना एकच भावना मनात दाटून येते—
आजवरच्या संत-कवींनी, पंत-कवींनी दिव्य प्रतिभेने मायमराठीभोवती तेजोवलये निर्माण केली, अगणित अलंकारांनी तिला सजवलं, तिच्या वैभवात एवढी भर घातली की साक्षात कुबेरही तिच्यासमोर लज्जित व्हावा.
या दिग्गजांनी तिला पालखीतून मिरवलं, तो सोहळा, ते भांडार आपण अनुभवू शकलो.
भोई म्हणून नव्हे तर या भोयांचेही सेवक म्हणून! हे असं मिरवता येणं यापरतं भाग्य नाही. 
मायमराठीचे हे वैभव जतन करणे, वाढवणे आणि पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणे हीच खरी तिच्याप्रती कृतज्ञता. तिच्या शब्दांचे सौंदर्य, तिच्या काव्याची लय आणि तिच्या संस्कृतीचे तेज अखंड निनादत राहो—हीच देवी शारदामातेच्या चरणी प्रार्थना.
🙏
मराठी भाषावैभव, 
अरुण सौदागर.
9422660621. 
१६ मार्च २०२६. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शब्दालंकार

मराठी भाषा वैभव - काव्यगुण

काव्यविचार