विषम जाति-वृत्ते.

 भाषावैभव

विषम जाति-वृत्ते

[ लेखांक १३ ] 

मराठी काव्यपरंपरेतील वृत्तवैविध्य अत्यंत रमणीय आहे. सम-जातिवृत्तांप्रमाणेच विषम-जातिवृत्तेही कवीच्या कल्पनाशक्तीला नवे आयाम देणारी रचना आहे. मात्रा, गती आणि लय यांचे सूक्ष्म भान ठेवून जेव्हा ओळींची रचना एकसारखी न राहता कलात्मकरीत्या बदलत जाते, तेव्हा काव्याला एक वेगळीच चाल आणि मोहकता प्राप्त होते. लयीतील ही विविधता काव्याला नवे चैतन्य देते. अशा या रसपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण विषम-जातिवृत्तांचा परिचय करून घेण्याचा हा प्रयत्न. ✨

[ १ ]  गोविंद [ विवशा ]  

(मात्रा २५ व २६)

यात ध्रुवपद (१० + १५) = २५ मात्रांचे असून, कडवे चंद्रकांत जातीचे (८+८+८+२) = २६ मात्रांचें असते. 

उदा. 

(१)

क्षुधित वनीं गोविंद्-बाइगे, क्षुधित वनीं गोविंद्  ।। ध्रु ।।

रवितनयातटि शिशुंसह हा व्रज चारित गोधन-वृंद् ।।

...... ( संत एकनाथ ). 

(२)

'आली दिपवाळी गड्यांनो - आली दिपवाळी'

........ ( माधवानुज = काशिनाथ हरी मोडक). 

(३)

 'कृष्ण गडी अपुला - राजा मथुरेचा झाला' 


[ २ ] महती

(मात्रा २० व २८)

यात (८+८+४) = २० भूपतिवैभवाच्या प्रारंभीच्या दोन मात्रा कमी अशा मात्रांचे काही चरण व शेवटी (८ + ४ व ४+१२)  = २८ मात्रांचा मेळाचा चरण असतो.

उदा. 

महत्त्व भारी, आहे या पृ,थ्वीचें

त्याहून अतिशय, या सगळया वि,श्वाचें

परि तुजमध्यें, महतीचें जें, बीज

त्याहून कांहीं, मोठी नाहीं, चीज

ठसव  मनीं हें , साचें ; बापा, हें वच बहु मोलाचें

...... (केशवसुत) 


[ ३ ] श्यामाराणी

(मात्रा १६ व ३०). 

यात पादाकुलकाच्या काही पंक्ति असून, शेवटची ओळ स्वर्गंगेच्या (८+८+८+६) = ३० मात्रांची असते. कधीकधी ध्रुवपद बालानंदाचे म्हणजे १४ मात्रांचे असते. केशवसुतांच्या 'श्यामाराणी गभीर रजनी ' ह्या पद्यावरून हे नांव पडले आहे.

उदा. 

१) गरिब विचारा माधुकरी । दुःख तयाला जन्मवरी ॥ध्रु. ॥

कडक उन्हानें,जीव घाबरे

कपोल सुकले, धर्मे भिजले

पायीं चटके, तापे डोकें । धापा टाकित, पळे जरी

.....  (श्रीधर बाळकृष्ण रानडे)


२)

'नवलाख दिवे हे तुझ्या घरी' .......( वि. द. घाटे) 


[ ४ ] मनी  [ सृष्टिलता ] 

(मात्रा १६  व २७)

यात ध्रुवपद व मेळ यांच्या सूर्यकांत जाति प्रमाणे (८ + ८ + ८+ ३) = २७ मात्रा आणि पादाकुलकाच्याही काही पंक्ती असतात. 

१)

गुणी आणि अवगुणी - अशी ही द्वाड आमुची मनी || ध्रु ||

अशी काय ही बाई कोणी

आली बर्फाच्या देशांतुनि

अंगाला कापूस डकवुनी

मऊ रेशमाहुनी - अशी ही द्वाड आमुची मनी

.... (अज्ञातवासी )

२)

'सोडुनिया जेजुरी, आला रे वाघ्या ओटीवरी...... (भ. पंडित)

३)

निजल्या तान्ह्यावरी, माउली दृष्टि सारखी धरे.... ( भा. रा. तांबे) 


[ ५ ] नववधू

(मात्रा १६ व १६) यात पादाकुलकाच्याच ( २+८+६)= १६ मात्रा असतात. कधीकधी शेवटची ओळ बालानंदाची १४ मात्राची असते. भा. रा. तांबे यांच्या खालील पदावरून हे नाव पडले आाहे.

उदा. 

१)

नव,वधू प्रिया मी, बावरतें

ला,जते पुढें सर,ते फिरतें ।। ध्रु।।

कळे मला तू प्राणसखा जरि

कळे तूच आ,धार सुखा जरि

तुजवांचूनि संसार. फिका जरि -

मन, जवळ यावया, गांगरतें. 


२)

किति मौज दिसे ही पहा तरी, हें विमान फिरतें अधांतरी'

 - (गोपीनाथ गणेश तळवलकर)


[ ६ ] फुलवेल  [ वधूवल्ली ]

(मात्रा १६ व २४)

यांत ध्रुवपद व मेळ ही (९+१४) = २३ मात्रांच्या गटांची असते आणि अंतरा पादाकुलकाच्या पंक्तींचा असतो.

उदा. 

१)

तुझि ग फुलवेल - त्या आंब्यावरति फुलेल

भोंवतालची, खणुनी माती

निर्मल पाणी, शिंपुन हाती.

वेल चढविशी, ही तरूवरती

रमुनि किति वेळ, त्या आंब्यावरति फुलेल

.....  (गिरीश)


(२)

'सरकसवाला, मी मौज दावितों सकलां'

.....  (ना. गं. लिमये) 


(३)

 'आईऽ आई, बोलतो कसा हा ताई'

......... (भवानीशंकर श्रीधर पंडित) 


[ ७ ] अभिसारिका [ पंचकल्याणी ]

(मात्रा १६ व २२)

यात साकीतील प्रथमार्धाच्या (४ +८ + ४) १६ मात्रांचे दोन व त्यानंतर भूपतिवैभवाच्या (२ + ८ + ८+ ४) = २२ मात्रांचे दोन चरण असतात.

उदा. 

सुटला पितृदिशेचा वारा

झाकी मेघ नभःपथ सारा

घन गर्जति तोफेपरी वर्षती गारा

कडकडाट करिती विजा येति जल-धारा ...... १.

........ (अण्णासाहेब किर्लोस्कर) 


[ ८ ] मनमोहन

(मात्रा १४ व २८)

यात ध्रुवपद व मेळ ही चंद्रकांत जातीच्या आरंभीच ( २+२६ ) मात्रा वाढवून बनलेली असतात. आणि ७ | ७ मात्रांच्या गटांचा एकेक असे काही चरण असतात. गिरीशांच्या खालील पद्यावरून हे नाव पडले आहे.

उदा. 

१)

मनमोहन वाजवुनी सारंगी, काढी मंजुळ सूर् ।। ध्रु. ।।

विश्व निजलें । शांत झालें

एक धरणी । मात्र डोले

गंभीरपणानें अंधारांतुन, छेडित जाई सूर्


२) 'हे चिमण्या चंद्रा पाहुनि तुजला, खचतो माझा धीर् '

( वा. गो. मायदेव ) 


[ ९ ] वैशाख [ कामना ]

(मात्रा २२ व २०)

अगदीं आरंभीच दोन मात्रा येतील अशी अक्षरे घालून, पुढे धवल-चंद्रिकेच्या ओळी जोडल्या की हे वृत्त होते. खालील पद्याची रचना शिथिल आहे.

उदा.

वै,शाखमासीं, वासंतिक, समय शोभ,ला

× आम्रासव, पिउनि गान, करिति कोकि,ला

या, जाइजुई, मोगरिला, बहर जो आ,ला

गुं,जारव कर,ण्यांत गुंग, मधुप जाह,ला


[ १० ] अरुण

 (मात्रा १२ व २३)

यात ध्रुवपदाच्या प्रथमार्धात ६।६ मात्रांचे तीन गट व उत्तरार्धात (६ + ५) = ११ मात्रांचा एक गट येतो. ( ६ + ६ ) अशा १२ मात्रांच्या काही ओळी अंतऱ्यात येतात. शेवटी मेळ ध्रुवपदाच्या उत्तरार्धाशी जुळणारा असतो. किर्लोस्करांच्या सौभद्रांतील खालील पद्यावरून हे नाव पडले आहे.

१)

प्रिये पहा, रात्रीचा समय सरुनि,

येत उषःकाल हा ।। ध्रु ॥

थंड गार । वात सुटत

दीप-तेज । मंद होत

दिग्वदनें । स्वच्छ करित

अरुण पसरि, निज महा

२) 

विलासिनी रमणीसह सुमनांच्या' 

........ (विनायक) 


[ ११ ] अवनी [ शुभवदना ]

(१२ व २२)

अरुण' जातीतील ध्रुवपद व मेळ यांच्यामधून फक्त उपांत्य लघु अक्षर काढून टाकले की ही जाति होते.

उदा.

१)

उघडि नयन रम्य उषा, हसत हसत आली

अरुण किरणमय वसना, अवनी हो ल्याली. ||ध्रु ||

खग कूजित । अलि रुंजित

लतिका तरु - । गण संचित

सुदति विफल । सकल गमत

तुजविण या कालीं  

....... ( ए. पां. रेंदाळकर). 

२)

हरिभजनावीण काळ चालवू नको रे '

( संत सोहिरोबा ) 

३)

भज भज भव-जलधिमाजि मनुजा शिवाला'

....( रामजोशी)


[ १२ ] बुल्बुल

 (मात्रा १२ व २०)

अवनीतील ध्रुवपद व मेळ यांतील शेवटचे एक अक्षर कमी केल्याने मेळांत फक्त (६+ २) = ८ एवढ्याच मात्रा ठेवल्याने ही जाति होते. तांब्यांच्या खालील पद्यावरून हे नांव पडले आहे.

उदा. 

उगिच काय, बुल्बुला, शिणविसी गळा ।। ध्रु ।।

उगिच कंठ । फोडिशी ऽ

हृदय मात्र । फाडिशी ऽ

रमणिवाणि । आणिशी ऽ

- स्मरणि मंजुळा  ......... १.


[ १३ ] झंपा [ वीरभद्र ]

(मात्रा २० + १७)

यात चरणांच्या प्रथमार्धात ५।५ मात्रांचे चार गट आणि उत्तरार्धात ५।५ मात्रांचे तीन गट व शेवटी गुरु अक्षर असते. अशा प्रकारची चरणयुग्मके असतात.

उदा. 

१)


डुमडुमत, डमरु ये । खणखणत, शृंग ये

शंख फुं,कीत ये । येई रुद्रा  ......... १

........ ( भा. रा. तांबे)


*******************************************

या लेखाद्वारे आपल्या मराठी महान काव्यपरंपरेतील समृद्ध दालनातल्या वैभवाचं, ओझरतं का होईना, दर्शन घडलं असेल तरी मला धन्यता वाटेल.


 अरुण सौदागर,


 मराठी भाषावैभव.

9422660621 

25/02/2026.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शब्दालंकार

मराठी भाषा वैभव - काव्यगुण

काव्यविचार