मराठी भाषा वैभव - काव्यगुण

 काव्यगुण 


[ लेखांक - 2 ]

प्रसाद, माधुर्य, ओज हे काव्याचे मुख्य तीन गुण आहेत.

1] प्रसाद गुण - 

सहज अर्थप्रतीति होईल अशी शब्द-योजना ज्या रचनेत असते, तिला 'प्रसाद' असे म्हणतात. (अर्थबोध सहज झाल्याने मन प्रासादिक वृत्तीने भरून जाते. अशा रचनेत सामासिक शब्द क्वचितच असतात व असलेच तर अगदी कमी शब्दांचेच.) 

उदा. १) सत्यभामा व द्रौपदी यांचे संभाषण-

सत्या कृष्णेसि म्हणे, "वदते ते तू खरेच मान सये ।

लोक म्हणोत परि पळहि माझ्या हाती न कांत-मानस ये"।।

कृष्णा हासोनि म्हणे, "भामे, मोहावयासि पतिला जे । मंत्राद्युपाय करणे, या श्रवणे बहु मदीय मति लाजे ।।

प्रेमे पति-चरणांसि न देउनि दे हात तायिताला जे ।

ते स्त्री न रुचे पतिला, की तीते आततायिता लाजे" ||

... ( मोरोपंत). 

[ सत्यभामा द्रौपदीला म्हणते, “सखे, हे म्हणणे तू खरेच मान.” लोक काहीही म्हणोत; पण माझ्या हाती (उपायांत) कृष्णाचे मन लागत नाही, ते वश होत नाही. द्रौपदी (कृष्णा) हसत म्हणते, “भामे, पतीला वश करायला जे उपाय सांगितले जातात त्या मंत्र, तंत्र, उपायांची मला खूप लाज वाटते. म्हणजेच खरे पतिप्रेम मंत्रतंत्रांनी किंवा युक्त्यांनी मिळत नाही; ते केवळ नम्रता, समर्पण आणि निष्काम प्रेमानेच लाभते. जोवर स्त्री प्रेमाने पतीच्या चरणी स्वतःला अर्पण करत नाही, तोवर ती पतीला खऱ्या अर्थाने प्रिय ठरत नाही."]

या काव्यातल्या चारचार पाचपाच अक्षरी अर्थपूर्ण यमकांच्या जोड्याही रंजक आहेत. 

२) 

या बाइ या -- बकुळिच्या झाडाखाली फुले वेचू या ॥

उन पडले - पान फुल दिसे कसे गोड गोडुले ।

गोड गोडुले - मोतियांचे दाणे कोणि खालि पाडिले ।

रान हालले -- पहाटेला शुक-देव गाणे बोलले ।

........... (बालकवि).

प्रसाद गुणाची वैशिष्ट्ये - साधीसोपी शब्दयोजना, थेट तत्त्वबोध, सरळ व सुबोध भाषा , स्पष्ट उपदेश. 


2] माधुर्य गुण 

 ज्या रचनेच्या योगे चित्तवृत्ति तल्लीन होते, त्यातील विशेषतः कोमल मधुर वर्णांच्या रचनेमुळे नाद उत्पन्न होऊन ते गुणगावेसे वाटते अशा रचनेला माधुर्य असे म्हणतात. याही रचनेत समास क्वचितच असतात आणि कधी कधी गोड वाटणारी अनुप्रासात्मक रचनाही आढळते.

उदा. -- १) प्रसंग - दमयंती हंसाला धरू पाहत आहे. 

हे मंदमंद पद सुन्दर कुन्द-दन्ती ।

चाले जसा मद-धुरंधर इंद्र-दन्ती ॥

हंसा धरू जवळि जाय कृशोदरी ते ।

निष्कंप-कंकण करासि पुढे करीते ।॥


२)  रेंदाळकारांचे पुढील पद्य या गुणात आहे

उघडि नयन रम्य उषा, हसत हसत आली

अरुण किरणमय वसना, अवनी हो ल्याली

खग कूजित । अलि रुञ्जित

लतिका तरु- । गण सञ्चित

सुदति विफल । सकल गमत

   - तुजविण या काली |

....... (ए. पां. रेंदाळकर )

माधुर्य गुणाची वैशिष्ट्ये - कोमलता, लय, गेयता, सौंदर्य,  श्रवणसुख.


३] ओज गुण 

ज्या रचनेने अन्तःकरण उद्दीपित होते, शौर्यभाव उत्पन्न होतो त्या रचनेला ओजस् किवा ओज असे  म्हणतात. दीर्घ समास, कठोर वणवा इ० गोष्टी यात आढळतात. 

उदा. -

१)

कोठे रथ ? मुशल पुरे, कवच कशाला? धनुष्य राहो द्या ।

वत्सेला निज-घर्षण-कर-खल दंडोत्सवासि पाहो द्या ॥

 ....... (मोरोपंत) 

( मुशल = गदा;  दंडोत्सव = बाहूंच्या पराक्रमाचा उत्सव, रणातील शक्तिप्रदर्शन ; निज-घर्षण-कर = स्वतःच्या हातांनी केलेले प्रहार) 

भावार्थ :

भीमाला युद्धात रथ, कवच, धनुष्य यांची काहीच गरज नाही. त्याची केवळ गदा आणि बाहूच युद्धासाठी पुरेसे आहेत. स्वतःच्या बाहुबलावर तो दुष्ट शत्रूंचा संहार करणार आहे, आणि त्या भीषण पराक्रमाचा देखावा कृष्णाला पाहायचा आहे.

यात रौद्र व वीर रसाचा उत्कट संगम दिसून येतो. 

२)

संग्रामात झाशीची राणी लक्ष्मीबाई-

आरक्त उषा ती गमली- आरक्त चंडिका गमली ॥

संतप्त भासली संध्या - संतप्त भासली काली ।

संक्षुब्ध तिच्या नेत्रात - क्रोधाची चढली लाली ।

लखलखाट मार्तंडाचा

चकचकाट पूर्णेंदुचा

दाविला खेळ तेजाचा

रक्त्ताने शरिरी न्हाली - मर्दानी झांशीवाली

 ..... ( दुर्गा आचार्य तिवारी ) 

ओज गुणाची वैशिष्ट्ये - आवेश, रौद्र–वीरभाव, आवाहन, वेग, शब्दांची धार, प्रखरता, सामर्थ्य. 

जवळजवळ साऱ्याच पंतकाव्यांमध्ये आपल्याला प्रसाद, माधुर्य आणि ओज हे गुण दिसून येतात. त्यातही प्रामुख्याने मुक्तेश्वरांची साधी, सुबोध भाषा ही त्यातील प्रसाद गुणामुळे ; वामन पंडित / रघुनाथ पंडित यांचे काव्य हे त्यातील लालित्य, मधुरता आणि गेयता या माधुर्याच्या लक्षणांमुळे आणि मोरोपंतांच्या रचना ह्या त्या काव्यातील वीर, रौद्र आणि सामर्थ्य या ओजगुण वैशिष्ट्यांमुळे सर्वाधिक लोकप्रिय ठरली आहे . 


*******************************************

या लेखाद्वारे आपल्या मराठी काव्यपरंपरेतील समृद्ध दालनातल्या वैभवाचं, ओझरतं का होईना, दर्शन घडलं असेल तरी मला धन्यता वाटेल.

 अरुण सौदागर,

 मराठी भाषावैभव


२८/०२/२०२६.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शब्दालंकार

काव्यविचार