नवरसात्मक काव्य

 


काव्यातील नवरस

[लेखांक 3]


'रसात्मकं काव्यम्' म्हणजे रस हा काव्याचा आत्मा आहे. काव्यात एखादी भावना उत्कर्षाला पोचवणे याला काव्यरस असे म्हणता येईल.

शृंगार, वीर, करुण, अद्भुत, हास्य, भयानक, बीभत्स, रौद्र व शांत हे मराठी साहित्यातील नव-रस मानण्यात येतात. भक्तिरस हाही आणखी एक रस मानला जातो. 

[१] शृंगार रस 

यात शृंग म्हणजे कामवासनेचा उद्भव ज्यायोगे होतो, अशा प्रकारच्या काव्यात स्त्री-पुरुषांचे सौंदर्य, राग, अनुराग, चेष्टा, इ. चे वर्णन असते.

उदा.१)

तुम्हांवर केली मी मर्जी बहाल

नका सोडून जाऊ रंगमहाल ||

पापण्यांची तोरणं बांधुन डोळ्यावरती

ही नजर उधळिते काळजातली पिरती

जवळी यावं, मला पुसावं, गुपित माझं खुशाल

नका सोडून जाऊ रंगमहाल ||

(लोकनाट्यात सादर केल्या जाणाऱ्या बऱ्याचशा लावण्या शृंगाररसप्रधान असल्या तरी उत्तान आणि अश्लीलतेकडे झुकणाऱ्या असतात.) 

शृंगार रसाची अन्य सामान्य उदाहरणे - 

दमयंतीचे सौंदर्य. 

चापेकळीपरिसही सरलत्व नाकी |

जीचा धरी अधर विद्रुम--भावना की ||

भासे मनात मज बिंबफल-भ्रमाने |

की सत्य चंचु-पुट वोढविले शुकाने ! ||

- ( नल-दमयंती आख्यान - रघुनाथ पंडित ). 

( विद्रुम = प्रवाळ. लावण्यवती दमयंतीचे नाक सुंदर आणि नाजूक आहे, ओठ प्रवाळासारखे लाल व कोमल आहेत. ते ओठ एवढे आकर्षक दिसतात की क्षणभर वाटते की जणू पोपटाने चोचीत लाल बिंबफळच धरले आहे.  हे उपमा, रूपक आणि अतिशयोक्ती या अलंकारांनी नटलेले शृंगाररसप्रधान काव्याचे उत्तम उदाहरण .) 

२) कृष्णावर रुसलेली सत्यभामा

[ एकदा नारदमुनींनी श्रीकृष्णाला स्वर्गातील पारिजातक वृक्षाचे फूल आणून दिले. ते त्याने रुक्मिणीला देऊन टाकले , असे समजल्यावरून कृष्णाची दुसरी बायको सत्यभामा ही अतिशय रागावली. हे या आख्यानात वर्णिले आहे. ] 

लता सत्या अंकी खग-गमन भक्तामर-तरू ।। 

तरू हाती तो श्री-पति भव-नदी-पार उतरू ।। 

घरी लक्षी पक्षी कर-तल-युगी पाद-युगळा ॥ 

गळां रत्न घ्याव द्रुम-गरुड-संयुक्त सगळा ॥ १ ॥

                                           ... (वृत्त - शिखरिणी) 

कृष्णासि कृष्ण-पद-भक्ति-विशारदाने ।॥

जे स्वर्ग-पुष्प दिधले मुनि-नारदाने ॥ 

ते रुक्मिणी-प्रति दिले त्रि-जगन्निवासे ।। 

ने द्वारका करि भरोनि सु-गंधि वासे ॥ २ ॥

                                             ...( वृत्त - वसंततिलका) 

असी गोष्टि दासी-जनी बायकांनी ।॥ 

विचारूनिया सांगता जाय कानी ॥ 

तईं सत्यभामा महा-क्रोध दावी ॥ 

बुझावी हरी तेचि लीळा वदावी || ३ ।।

                                             ... ( वृत्त - भुजंगप्रयात ) 

गडबडां धरणीवरि लोळते ॥

वदवती न कवीसहि लोळ ते ॥

रडत मूर्छित होय घडी घडी ॥

पवन निश्वळ, नेत्र न ऊघडी ॥ ४ ॥

अलक हार गळ्यांतिल तोडिते ॥

कुरळ केश मुखावरि सोडिते ॥

कर-युगें उर मस्तक ताडिते ॥

वसन आणिक कंचुकि फाडिते ॥ ५ ॥

                                            ... ( वृत्त - द्रुतविलंबित ) 

महा-उष्ण-श्वासें करुनि वदते शुष्क अधरा ॥ 

धरा-पृष्ठीं जोडा न शठ दुसरा या गिरि-धरा ॥ 

धराया माझा हा कर कपटि कैंचा जनमला ।। 

मला जो निंदूनी कुसुम तिस देऊनि रमला ॥ ६ ॥ 

सख्यांहो मेल्याही शवहि न शिवो हे यदु-पती ॥ 

पती नाना स्त्रींचा पतित जन ही ज्यास जपती ॥ 

नका येऊं देऊं सदनिं सवतीच्या प्रियकरा || 

करातें लावीना मज कपटि ऐसें तुम्हि करा ॥ ७ ॥

                                           ... ( वृत्त - शिखरिणी) 

रडत रडत मूर्छेमानि वृत्ती बुडाल्या ॥ 

परम विकळ; मी तूं या स्मृती ही उडाल्या ॥ 

उचलुनि सखियांहीं मंचकीं दिव्य सेजे || 

निजविलि मृत-तुल्या सत्यभामा दिसे जे ॥ ८ ॥

                                        ... ( वृत्त - मालिनी.)

 - (वामन पंडित - भामाविलास)

(सत्यभामेच्या रुसव्याच्या या वर्णनात अनुरागापोटी आलेला जो राग व्यक्त झालेला आहे तो विप्रलंभ शृंगार. )

३) श्रीकृष्ण-प्राप्तिपूर्व व्याकूळ झालेली रुक्मिणी.

आळविल्या कानीं नायके । थापटिलीया न चक्के ।

देह व्यापिले यदुनायकें । शरीरसुखे विसरली ॥ 

पाय ठेवितां धरणीं । कृष्णा आठवी रुक्मिणी ।

सर्वांगी थरथरोनी । रोमांचित होऊनि ठाके ॥ 

लीला कमल घेतां हातीं । कृष्णचरण आठवतीं ।

नयनीं अश्रु लोटती । कृष्णप्राप्तीलागीं पिशी ॥

गोविंदें हरिलें मानस । जाहली विषयभोगीं उदास ।

पाहे द्वारकेची वास । मनीं आस कृष्णाचीं ॥

कां पां न येचि गोविंद । तरी माझेंचि भाग्य मंद ।

नाहीं पूर्वपुण्य शुद्ध । म्हणौनि खेद करीतसे ॥

मग म्हणे गा कटकता । किती करूं गे आहाकटा ।

मरमर विधातया दुष्टा । काय अदृष्टा लिहिलें असे ॥

आजिचेनि हें कपाळ । कृष्णप्राप्तीविण निष्फळ ।

म्हणूनियां भीमकबाळ । उकसाबुकसीं स्फुंदत ॥

मज नलगे विंजणवारा । तेणे अधिक होतसे उबारा ।

प्राण रिघो पाहे पुरा । शार्ङ्गधरावांचोनि ॥ 

आंगी न लावा गे चंदन । तेणें अधिकचि होय दीपन ।

माझे निघों पाहती प्राण । कृष्णचरण न देखतां ॥

साह्य नव्हेचि गे अंबा । विन्मुख जाहली जगदंबा ।

आतां कायसी लग्नशोभा । प्राण उभा सांडीन ॥

शिवा भवानी रुद्राणी । कां पां न पवतीच कोणा ।

कां विसरली कुळस्वामिणी । चक्रपाणी न पवेचि ॥

नेत्रीं अश्रूंचिया धारा । दु:खें कांपतसे थरथरां ।

धरितां न धरवेचि धीरा । विकळ सुंदरा जातसे ॥

                 ( संत एकनाथ - रुक्मिणीस्वयंवर.)

(रुक्मिणीच्या सख्या तिला काही सांगतात, समजावतात; पण तिच्या कानावर काही पडत नाही. शरीरात श्रीकृष्णच भरून राहिले आहेत; शरीराचे सुख-दु:ख तिला जाणवत नाही. भूमीवर पाय टेकला की तिला कृष्णाची आठवण येते. अंग थरथर कापते, रोमांच उभे राहतात. हातात कमळ घेतले की तिला कृष्णाचे चरण आठवतात. डोळ्यांतून अश्रू वाहतात. कृष्णप्राप्तीचे तिला वेड लागले आहे. गोविंदाने तिचे मन हरले आहे. विषयभोगांबद्दल ती उदासीन झाली आहे. तिच्या मनात फक्त द्वारकेचा ध्यास आणि कृष्णाचीच आस आहे. “गोविंद का येत नाही? माझेच भाग्य मंद असावे. पूर्वजन्मी पुण्य नसेल आपले,” असे म्हणत ती खेद व्यक्त करते. ती विधात्यालाच दोष देते—“काय रे दैवा, माझ्या कपाळी काय लिहिले आहे? किती आक्रोश करू?” “आज माझे जीवन कृष्णप्राप्तीशिवाय व्यर्थ आहे,” असे म्हणत ती मोठ्याने रडते. वारा घातला तरी अधिक उष्णता वाटते. कृष्णावाचून प्राण निघून जातील असे वाटते. चंदन लावले तरी अधिक जळजळ होते. कृष्णाचे चरण न दिसल्यामुळे पाहता प्राण कंठाशी येतात. “आई, तूही मदत करीत नाहीस. आता या लग्नसोहळ्याचा काय उपयोग? मी प्राण देईन.” ती देवतांना हाक मारते—“कुळस्वामिनी देवी, तूही मला विसरलीस का? चक्रपाणी (कृष्ण) का येत नाही?” डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहतात. ती दु:खाने थरथर कापते;  कृष्णभेटीसाठी ती अधीर झाली आहे. 

येथे पूर्वानुरागजन्य किंवा अभिलाषात्मक विरह वर्णित असल्याने हा  विप्रलंंभ शृंगार ठरतो. 

[ २] वीर रस -

धीरोदात्त व पराक्रमयुक्त वर्णनाचा यात समावेश होतो.

 उदा.--

१)अर्जुनाचे युद्धकौशल्य-- (भीष्मपर्व).

सूं सणणण सणणणणण, वाजति शर-निकर काय हानि-कर ।

वदले सुर-मुनि "करितो, नर-रूपे रुद्र काय हा निकर " ॥

शरधि शर-जलधि फुटले, की दोवे पाश एकदा तुटले।

ते काळ-व्याळ करटि-घोटक-भट-भेक खावया सुटले॥ ..... (मोरोपंत)


[शर-निकर = बाणांचा प्रचंड समूह. (शर = बाण ; निकर = समूह, राशी );  शरधि / शर-जलधि = बाणांचा समुद्र (रूपक);  पाश = बंध, दोर, बांध (येथे अर्थ — बंधारा (ज्यामुळे पूर रोखला जातो); काळ = मृत्यू, विनाश ; व्याळ = सर्प ; करटि = (विशेषतः रणातील) हत्ती ; घोटक = घोडा ; भट = सैनिक, योद्धा ; भेक = बेडूक (इथे लहान जीवांचा निर्देश; व्यापक विनाश दर्शविण्यासाठी).

यातील काव्यवैशिष्ट्ये - ओजगुण प्रधान, उपमा आणि रूपक अलंकार.]

२)

धर्मासाठी झुंजावे | झुंझोनी अवघ्यासी मारावे ||

मारिता मारिता घ्यावे | राज्य आपुले ||

देशद्रोही तितुके कुत्ते | मारोनी घालावे पराते ||

देवदास पावती फत्ते | यदार्थी संशयो नाही ||

देव मस्तकी धरावा | अवघा हलकल्लोळ करावा ||

मुलुख बडवावा की बुडवावा | धर्म संस्थापनेसाठी ||

- (समर्थ रामदास)


[ ३ ] करुण रस-

हृदयद्रावक अशा गोष्टींच्या वर्णनाच्या योगानें ह्या रसाची उत्पत्ति होते.

उदा.

१)

राजहंस माझा निजला - गोविंदाग्रज. 

जन चार भोवती जमले। मृत बाळा उचलायाला । 

तो काळ नाथनिधनाचा । हतभागि मना आठवला । 

तो प्रसंग पहिला तसला । हा दुसरा आता असला !

ते चित्र दिसे चित्ताला ।

हे चित्र दिसे डोळ्याला । 

निज चित्र चित्तनयनाला, 

मग रडुनि वदे ती सकलां। 'राजहंस माझा निजला !'


जरि दूत यमाचे आले। लाडक्यास या न्यायाला ।

ते निष्ठुर असले तरिही । भुलतील पाहुनी याला ।

हृदयाचे होउनि पाणी । लागतील चुंबायाला ।

मी मुका असा घेताना |

हा पहा - पुन्हा हसला ना !

का अशा फिरवितां माना ?

सुख खुपे काय डोळ्यांला ! "राजहंस माझा निजला !"


जरि होउं नये ते झाले । तरि सोडणार या नाही! 

पाळणाहि रुततो ज्याला । प्रेमे जरि निजवी आई ! 

तो देह खांच दगडात - छेः । नको नको ग बाई !

हृदयाची खणुनी खांच, |

झाकिन मी बाळ असाच ,

दुःखांचे फत्तर साच ! 

जा ! जाउनि सांगा काळा । "राजहंस माझा निजला !"


सांगुनी असे सकलांशी । मृत बाळ उराशी धरुनी। 

तन्मुखी स्वमुख ठेवोनी । चुंबिले एकदा फिरुनी। 

पाहिले नीट निरखोनी । झणि तीही गेली निजुनी !

मग पुन्हा कधी ती उठली,

जाणीव कुणा ही कुठली ? 

परि मति या प्रश्ने हटली-

'बोलेल कोण या बोला' । "राजहंस माझा निजला !"


२)

श्रावणबाळ

शर आला तो, धावुनि आला काळ

विव्हळला श्रावणबाळ.

'हा! आई गे!', दीर्घ फोडुनी हाक ,

तो पडला जाउन झोक.

ये राजाच्या श्रवणी करुणा वाणी,

हृदयाचे झाले पाणी.

त्या ब्राह्मणपुत्रा बघुनी

शोकाकुल झाला नृमणी

आसवे आणुनी नयनी

तो वदला, 'हा हंत ! तुझ्या नाशाला

मी पापी कारण बाळा !'  ....... १

मग कळवळुनी, नृपास बोले बाळ,

'कशि तुम्ही साधिली वेळ !

मम म्हातारे, मायबाप तान्हेले

तरुखाली असती बसले.

कावड त्यांची, घेउन मी काशीला

चाललो तीर्थयात्रेला.

आणाया निर्मळ वारी

मी आलो या कासारी

ही लगबग भरुनी झारी

जो परत फिरे, तो तुमचा शर आला

या उरात रुतुनी बसला.  ...... २

मी एकुलता, पुत्र, कसा हा घाला

मजवरती अवचित आला !

त्यां वृद्धपणीं, मीच एक आधार

सेवेस अता मुकणार.

जा, बघतिल ते, वाट पांखरावाणी

द्या नेउन आधी पाणी.

आहेत अंध ते दोन्ही,

दुर्वार्ता फोडुं नका ही,

ही विनती तुमच्या पायी,

मजमाघारी, करा तुम्ही सांभाळ

होउनियां श्रावणबाळ.   ...... ३

परि झाकुनि हे, सत्य कसे राहील ?

विधिलेख न होई फोल.

काळिज त्यांचें, फाटुन शोकावेगे

ते येतिल माझ्यामागे,

घ्या झारी...मी जातो...' त्याचा बोल

लागला जावया खोल.

सोडिला श्वास शेवटला,

तो जीव-विहग फडफडला,

तनु-पंजर सोडुनि गेला,

दशरथ राजा, रडला धायी धायी

अडखळला ठायी ठायी.   ....... ४

 - (गजानन हरी पाटील)

' केवढे हे क्रौर्य ' नावाची कुसुमाग्रजांची 'क्षणोक्षणी पडे उठे परिबळे ' हीही कविता करुणरसप्रधान काव्याचे उत्तम उदाहरण आहे. 

[ ४ ] अद्भुत रस

यांत आश्चर्यकारक असे वर्णन असते.

उदा. 

१)

अग्नी जाळी तरी न जळती पांडव।

हृदयी माधव म्हणोनियां ॥

अग्नी जाळी तरी न जळती गोपाळ।

हृदयी देवकीबाळ धरियेला ॥ 

अग्नी जाळी तरी न जळे हनुमंत ।

हृदयी सीताकांत म्हणोनिया ॥

अग्नी जाळी तरी न जळे पै सीता।

हृदयी रघुनाथ म्हणोनिया ॥

अग्नी जाळी तरी न जळे प्रल्हाद।

हृदयी गोविंद म्हणोनिया ॥

नामा म्हणे स्वामी स्मरावे गोविंदा।

चुके भवबाधा संसाराची ॥ 

- (संत नामदेव) 

२)

थोर उल्हास श्रीकृष्णासी । मूळें पाठविली रायांसी।

कुरु-संजय-कैकयासी । सोयरियांसी निजलग्ना ||

कृष्णविवाह मनोहर। पाहों आले जी सुरवर। 

शिव शांभव यक्ष किन्नर । नारदादि वैष्णव ||

वऱ्हाड निघालें द्वारकेबाहेरी। गणेश चढिन्नला उंदिरावरी।

अग्रपूजेचा अधिकारी। निर्विघ्न करी लग्नासी ॥

सिंहें पसरिलें जाभाडें। दुर्गा येऊनि त्यावरी चढे ।

मुक्तकेश खांडें उघडें । तेही पुढें निघाली ॥

वेगें आल्या अष्टमातृका । एकी चढिन्नली वृश्चिका ।

वाराही ते सूकरमुखा । वऱ्हाड देखा निघालें ।।

नेणती वऱ्हाडिणी चरबटा । स्थूल उदर दांत थोटा।

उंदिरी चढोनि लुटलुटा । ढेरपोटा का आला ।। 

विक्राळ सिंहाचें जाभाडें। वाइले हातीं खांडे उघडें।  

कोण बोलाविलीं वऱ्हाडें। अवघ्यापुढे निघाली ||

.... (रुक्मिणीस्वयंवर - संत एकनाथ) 

[ श्रीकृष्णाच्या विवाहासाठी मोठा उत्साह आहे. विविध राजे—कुरु, संजय, कैकय इत्यादी—आणि आप्तस्वकीय यांना निमंत्रण पाठवले आहे.

देवतासुद्धा हा विवाह पाहण्यासाठी येत आहेत—शंकर, यक्ष, किन्नर, नारद व इतर वैष्णव. द्वारकेबाहेरून वऱ्हाड निघाले आहे. गणेश उंदरावर आरूढ होऊन अग्रपूजेचा अधिकारी म्हणून पुढे चालले आहेत, जेणेकरून विवाह निर्विघ्न पार पडेल. सिंहाने जाभाडे (कातडे) पसरले आहे; त्यावर दुर्गा आरूढ झाली आहे, केस मोकळे सोडलेले, हातात उघडी तलवार. अष्टमातृका वेगाने येत आहेत; त्यापैकी एक वृश्चिकावर बसलेली आहे; वाराही (वराहमुखी देवी) सूकरमुख धारण करून आली आहे.

हे वऱ्हाड इतके अद्भुत व विलक्षण आहे की सामान्य वऱ्हाडिणींना ते समजत नाही—कोण स्थूल उदराचा, कोण थोट्या दातांचा, कोण उंदरावर बसलेला—हे सगळे दृश्य आश्चर्यकारक आहे.

ही दृश्ये सामान्य मानवी अनुभवापलीकडची आहेत.

लग्नासारख्या मंगल प्रसंगीही विक्राळ, उग्र, अलौकिक रूपांची उपस्थिती—हा विरोधाभास विस्मय वाढवतो.

येथे भयप्रधान रौद्र रस नाही, तर आश्चर्ययुक्त दिव्यता आहे—म्हणून तो अद्भुत रस आहे.

या ओव्यांमध्ये देवसमूहांचे अद्वितीय विलोभनीय आगमन, त्यांच्या विलक्षण रूपवर्णनामुळे आणि सामान्य जगाच्या पलीकडील वातावरणामुळे अद्भुत रस प्रभावीपणे व्यक्त झाला आहे.

काट्याच्या अणीवर वसले तीन गाव.

काट्याच्या अणीवर वसली तीन गावें ।

दोन ओसाड एक वसेचिना ॥१॥

वसेचिना तिथे आले तीन कुंभार ।

दोन थोटे एका घडेचिना ॥२॥

घडेचिना त्याने घडली तीन मडकी ।

दोन कच्ची एक भाजेचिना ॥३॥

भाजेचिना त्यांत रांधले तीन मुग ।

दोन हिरवे एक शिजेचिना ॥४॥

शिजेचिना तेथे आले तीन पाहुणे ।

दोन रुसले एक जेवेचिना ॥५॥

जेवेचिना त्याला दिल्या तीन म्हशी ।

दोन वांझ्या एक फळेचिना ॥६॥

फळेचिना तिला झाले तीन टोणगे ।

दोन मेले एक जगेचिना ॥७॥

जगेचिना त्याचे आले तीन रुपये ।

दोन खोटे एक चालेचिना ॥८॥

ज्ञानदेव म्हणे याचा तो अनुभव ।

सद्गुरूवाचुनि कळेचिना ॥९॥ 

 - (संत ज्ञानेश्वर महाराज) 

वरवर पाहता यात हास्यरस आणि अद्भूत रस दिसतो. अतिशयोक्ती अलंकारही यात ठळकपणे दिसून येतो. परंतु या भारुडात रूपके आहेत. आध्यात्मिक अर्थ लावल्यावर ती प्रतीके समोर येतात. ती अशी : काट्याची अणी म्हणजे अत्यंत सूक्ष्म काळ किंवा जीवात्मा. 

तीन गावे म्हणजे स्थूलदेह, सूक्ष्मदेह आणि कारणदेह. 

कुंभार/मडकी/पाहुणे: शरीरातील त्रिगुण आणि वासना. 

अनुभव: या सर्व मायाजालातून मुक्त होण्यासाठी सद्गुरूची गरज आहे. 


[ ५ ] हास्य रस

असंबद्ध प्रलाप, परचेष्टानुकरण, व्यंगदर्शन, इ० गोष्टीच्या योगाने याची उत्पत्ति होते.

उदा. -

१) एक आत्मप्रतिष्ठित आधुनिक शाहीर कवि-

आनंदतिशये पटापट उड्या मारून तो ओरडे

'या रे या 'मज नाचवा रसिकहो, डोक्यावरी घेउनी

फुंका दुंदुभि वाजवा चहुकडे सत्कीर्तिचे चौघडे

की पृथ्वीवर आज ये मजमुळे सत्काव्य-संजीवनी !

ऐसे बोलूनि हात तो वर करी सर्वांपुढे जो कुठे

आले तेतिस कोटि देव गगनी, ते पाहण्या अद्भुत !

संपे संशय-काल, मूठ उघडे, भाण्डार सारे फुटे !

हाती एक दिसे 'सुनीत' तुटके ! ! झाली मती कुंठित !

 - ( झेंडूची फुले - केशवकुमार )


२) माझा अन्त

मी पाहिली एक सुरम्य बाला,

वर्णू कसा त्या स्मरसंपदेला ?

वृक्षावरी वीज जधी पडावी,

त्याच्या स्थितीतचि तिची महती कळावी.

माझी अवस्था बघुनीच तीचे

सौंदर्य सोपे अजमावयाचे;

वस्ताद जी चीज जगी असावी,

तीचे स्वरूप सगळे परिणाम दावी.

सौंदर्य पुष्पासम वर्णितात,

झाले मला कंटकसे प्रतीत;

सौंदर्य मानोत सुधानिधान,

ते जाहले मज परंतु विषासमान !

नेत्रे क्षणी तारवटून गेली,

अंगे ज्वरीं त्या परतंत्र झाली,

झालो तिला मी बघता भ्रमिष्ट,

शुद्धी सवेचि मग होय अहा विनष्ट.

माझा असा अन्त अहो, जहाला.

'कोठूनिया हा मग येथ आला?'

ऐसा तुम्हा संशय येतसे का?

मी भूत हे मम असे, नच यात शंका !  

( हरपले श्रेय  - केशवसुत) 


[ ६ ] भयानक रस

उदा. १) भीमाचे दुःशासन-रक्त-प्राशन-

मग कंठनाळ चरचर, तो सत्य करावया बिरुद कापी |

मिटव्या देउनि मटमट, घटघट, त्या स्वहितागदका पी.  ||१ ||

ऐसे वदोनि ओष्ठ-प्रांत जिभेने पुनः पुन्हा चाटी 

अवलंबी अत्युग्रा, भीम अतृप्तद्विपारिची घाटी || २ ||

रिपु-शूर दूर तेथुनि ते दारुण-कर्म पाहता पळती !

किति पडती, किति दडती, कितिएकांचीं घृतायुधे गळती || ३ ||

  - ( मोरोपंत )

(अवलंबी – आधार घेणारा / झेप घेणारा. 

अत्युग्रा – अतिशय उग्र, रौद्र. भीम – कौंतेय भीम, तसेच भयावह. द्विप – हत्ती. अतृप्तद्विपारि = अतृप्त हत्तीचा शत्रू म्हणजेच सिंह. घाटी – दरी / मृत्युखाई.) 

(दुःशासनाचा वध करताना भीम अत्यंत उग्र आणि रौद्र रूप धारण करतो.तो असा भासतो की जणू तो स्वतःच एक भयानक दरी आहे, ज्यात कधीही न तृप्त होणाऱ्या, हत्तीसारख्या बलाढ्य शत्रूंनाही पडल्यावर सुटका नाही, आणि ज्यावर पडणे म्हणजे निश्चित विनाश. म्हणजेच  दुःशासनासाठी भीम म्हणजे मृत्यूसारखी अतृप्त, उग्र आणि अपरिहार्य शक्ती आहे. तो केवळ योद्धा नाही, तर शत्रूंना गिळून टाकणारी विनाशकारी दरीच बनलेला आहे.) 

काव्यातील अतिशयोक्ती आणि रूपक वापरून भीमाच्या क्रोध, सामर्थ्य आणि प्रतिशोधाची तीव्रता दाखवली आहे.

२) बलरामाचा पराक्रम 

निजसैन्यासी महामार । दुरोनि देख बळिभद्र। 

कोपें खवळला दुर्धर। रहंवर पेलिला ॥

परसैन्य देखोनि दृष्टीं। वेगें चालिला जगजेठी। 

धडधडिल्या चक्रवाटी। उठाउठीं पातला । 

देखोनि शत्रूचा खटाटोप । बळिभद्रासी न धरवे कोप।

बाहुस्फुरणें आला कंप। वेगें साटोप ऊठिला ॥ 

रथाखाली घातली उडीं। शेष दडपला फडेबुडीं। 

वराहाची दाढ तडतडी । कूर्मे गाढी पाठि केली ॥ 

वीर खिळूनियां बाणीं। गवेषण गर्जे रणीं। 

आला बळिभद्र धांवोनी । निर्वाणबाणीं विंधिला ॥ 

बाण विंधिला सबळ । येरें परजिलें मुसळ । 

साधक बळिभद्र प्रबळ । बाणजाळ तोडिलें ||

नांगर उचलूनियां बळें। न धरत पातला तये वेळे। 

रथ सांडिला तत्काळें। वेगें पळे गवेषण ।। 

सवेंचि परतावया पाहत । पायीं घातला नांगरदांत । 

गवेषण पडिला तेथ। भूमी दांत आदळले ।। 

लाजा उठिला त्वरित । तंव बळिभद्रे दिधली लाथ। 

येरु अशुद्धातें वमित पडिला मूच्छित अचेतन ॥ 

सांडूनियां धनुष्यबाण । सैनिक धांविन्नला आपण । 

रथी घालोनियां गवेषण । घेऊनि प्राण पळाला ||. 

देखोनि बळिभद्राचें बळ । राजे चालिले प्रबळ ।

पुढें करूनियां गजदळ । एक वेळ लोटले ||

आलें देखोनि परदळ । करीत हरुषाचा गोंधळ । 

झेलित नांगर मुसळ । वेगें सबळ उठिला ।।

गज हाणीत मुसळें। विदारीत कुंभस्थळें। 

घायीं किळकिळती एक वेळे। गजकलेवरें पाडिलीं ।। 

नांगर घालूनि रथावरी। शतसहस्रा चूर करी। 

पळत गज पायीं धरी । तेणें किरकिरी करिताती ।। 

चपळ चौताळती घोडीं। नांगर घालोनि त्यांते वोढी। 

घायें मुसळाचेनि पाडीं। वीरझोडी मांडिली ।।

वीर वरुषताती शस्त्रास्त्रां । जैशा मेरूसी पर्जन्यधारा। 

रणीं चालतां बळिभद्रा । वीर थरथरां कांपती ।। 

पायींचे रगडिले पायीं। कारुष राजा पाडिला ठायीं।

रथ रथ मोडिला पाहीं । सन्मुख घायीं कोण राहे ।। 

पृथ्वी तेचि उखळ जाण। नांगरें वीर घाली वैरण ।

मुसळघायें करी चूर्ण। रणकंदन मांडिलें ||

- ( संत एकनाथ - रुक्मिणीस्वयंवर)

वरील उतारा भयानकरसप्रधान आहे

भयानक रसाची लक्षणे

भीती, संहार, रक्तपात, विकृत दृश्ये, रणकंदन, करुण किंकाळ्या — ही येथे स्पष्ट दिसतात:

“गज हाणीत मुसळें, विदारीत कुंभस्थळें” —  

“नांगरें वीर घाली वैरण” — वीरांना वैरणीसारखे पाडणे

“मुसळघायें करी चूर्ण” — चूर्ण होणारी देहयष्टि

“रणकंदन मांडिलें” — रणातील भीषण आक्रोश

या प्रसंगात बळिभद्राचा (बलरामाचा) पराक्रम, उग्रतेतील तेज, शत्रुसैन्याचा पराभव — यामुळे वीर रस हा प्रधान रस ठरतो.

संहाराचे उग्र, रक्तरंजित चित्रण — भयानक रस हा वीर रसाला पूरक (अनुचर) आहे.


[ ७ ] बीभत्स रस

यात किळस उत्पन्न होईल अशा प्रकारचे वर्णन असते.

१)

देह अत्यंत खंगले । सर्वांग वाळोन गेले ।

वातपीत उसळले । कंठ दाटला कफे ।।

वळे जिव्हेची बोबडी | कफे कंठ गडगडी ।

दुर्गंधी सुटली तोंडी । नाकी स्लेष्मा वाहे ||

मान कापे चळचळा । डोळे गळती भळभळा ।

वृद्धपणी अवकळा | ठाकून आली ॥

दंतपाटी उखळली । तेणे बोचरखिंडी पडिली ।

मुखी लाळ गळो लागली । दुर्गंधीची ॥ ३९

रक्ते भिजली धरित्री, मेद-मांसाचा थर ।

छिन्न-विच्छिन्न देह, पडे अंगे इधर-उधर ।।

काक-गृध्र तुटती, लोचन-उर-भुजांसी ।

देखोनि ते दृश्य, किळस उत्पजे चित्तांसी ।। 

- ( युद्धवर्णन - महाभारत  मुक्तेश्वर) 

(कुरुक्षेत्रावरील मृतदेह, विखुरलेली अंगे, त्यांवर तुटून पडलेले कावळे-गिधाडे — घृणा जागवणारे चित्र.)

२) 

वाहती रुधिरधारा, झाले कर्दम भूमी ।

पडली शिर-भुजा-उदरें, विखुरली अवयवी ।।

करिती श्वापदें भक्षण, न उरे काही अवशेष ।

ते घोर दृश्य पाहता, जगे बीभत्स भाव विशेष ।। 

- (रणोत्तर स्थिती - आर्याभारत  - मोरोपंत) 

(रक्ताने माखलेली जमीन, तुटलेली अंगे, त्यांवर ताव मारणारी श्वापदे — बीभत्स रसाची प्रकर्ष अभिव्यक्ती.)


[ ८ ] रौद्र रस.

याचे भयानक रसाशी बहुधा साधर्म्य आढळते.

१)

भृकुटी वक्र, नेत्रां ज्वाळा धगधगती ।

शस्त्राघाती रणभूमी थरथरती ॥

क्रोधाग्नी उसळुनी शत्रुकुळ जळाले ।

काळस्वरूप वीर तांडव नाचविले ॥.....( मोरोपंत)


२) रुद्रास आवाहन 

डमडमत डमरू ये, खणखणत शूल ये,

शंख फुंकत ये, येई रुद्रा !

प्रलयघनभैरवा, करीत कर्कश रवा,

क्रूर विक्राळ घे क्रुद्ध मुद्रा !

कडकडा फोड नभ, उडव उडुमक्षिका,

खडबडवि दिग्गजां, तुडव रविमालिका,

मांड वादळ, उधळ गिरी जशी मृत्तिका,

खवळवीं चहुंकडे या समुद्रां !

डमडमत डमरू ये, खणखणत शूल ये,

शंख फुंकत ये, येई रुद्रा ! ।। १ ।।  .. ( भा. रा. तांबे)

[वीर रस भयानक रस  व रौद्र रस हे सहचरी किंवा पूरक रस असल्यामुळे अनेकदा ते एकमेकांमध्ये मिसळलेले दिसतात. ]


[ ९ ] शांत रस

यांतच भक्ति, उदात्त, वत्सल व प्रेयान् यांचा समावेश केला जातो. 

भक्ति रस

(ईश्वरविषयक प्रेम)

दयाब्द चळशील तू तरि न चातका सेवकां ।

उणे किमपि भाविकां उबगशील तू देव का? ।। अनन्य-गतिको जनां निरखिताचि सोपद्रवा ।

तुझेचि करुणार्णवा, मन धरी उमोष द्रवा ।।१।।.... ( वामन पंडित) 


उदात्त रस 

(गांभीर्यात्मक रचना)

ज्यांचे पात्र पवित्र पाणि-युग हे भिक्षान्न जे भक्षिती | 

ज्यांचे वस्त्र दिशा, जयां भय नसे, शय्या जयांची क्षिती ।।

ज्याला दैन्य नसे, विरक्ति-वनिता जे तीसवें नांदती ।

ज्याला कर्म-कलाप बांधित नसे, ते धन्य येणे रिती ।। 

-  (वामन पंडित) 


वत्सल रस

(पुत्र-कन्या-विषयक प्रेमाचे वर्णन)

देखोनि धन्त-मुकुला अनिमित्त हासे ।

ते बोबडे वच तसे परिसोनि खासे ।।

अंकावरी बसवुनी तनया पहाती ।

त्याच्या रजे मळति ते जगिं धन्य होती ||

 - (परशुरामतात्या गोडबोले)

(बाळाचे दात जणू कळ्यांसारखे उमलत आहेत ते पाहून बाळाचे आईबाप आनंदाने हसतात. बाळाचे बोबडे, अडखळणारे बोल ते मन लावून ऐकतात आणि त्यातच विशेष गोडवा अनुभवतात. मुलाला मांडीवर बसवून ते प्रेमाने त्याच्याकडे पाहतात.त्या बाळाच्या पायांतील धूळ जरी अंगाला लागली, तरी ती स्वतःला धन्य समजतात.) 


श्रेयान् रस (मित्रविषयक प्रेम)

श्रीकृष्ण-सुदामा भेट

श्रीरुक्मिणिच्या मंदिरि तेव्हा होता जगन्निवास |

तेथे कळले की भेटाया आलासे निज-दास ||

झडकरि उठला दयाळु बांधव वस्त्रादिक सावरिता

धावत आला पुढे रमेला सोडुनि दासाकरिता ||

' ये ये बंधो;' ऐसे सद्गद बोलत धावत आला |

कडकडुनि भुज-युग्मे स्व-सखा हृदयी धरिता झाला !

- ( मोरोपंत ) 


*******************************************

या लेखाद्वारे आपल्या मराठी महान काव्यपरंपरेतील समृद्ध दालनातल्या वैभवाचं, ओझरतं का होईना, दर्शन घडलं असेल तरी ते मनोहारी असेल असा माझा विश्वास आहे .

 अरुण सौदागर,

 मराठी भाषावैभव. 

१ मार्च २०२६.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शब्दालंकार

मराठी भाषा वैभव - काव्यगुण

काव्यविचार