भाषालंकार
अर्थालंकार
[ लेखांक ४- अ ]
अर्थालंकारांचा विचार केला असता असे जाणवते की, बहुतेक अलंकारांचा उगम दोन भिन्न वस्तूंतील साम्य, भेद किंवा विरोध या नात्यांतूनच होतो. वस्तूंच्या परस्परसंबंधाची अभिव्यक्ती कशी केली जाते, यावर अलंकाराचे स्वरूप ठरते.
उदाहरणार्थ —
जेव्हा आपण “मुख चंद्रासारखे आहे” असे म्हणतो, तेव्हा साम्य स्पष्टपणे दाखवले जाते; त्यामुळे उपमा निर्माण होते.
परंतु “मुख-चंद्र पाहा” असे म्हटल्यास, दोन्हींचा अभेद सूचित होतो; येथे रूपक साकारते.
“मुख जणू काय चंद्रच आहे” असे म्हणताच, कल्पनारंजनाची छटा येते आणि उत्प्रेक्षा प्रकटते.
“हे मुख की चंद्र?” या स्वरूपात प्रश्न विचारल्यास साम्य इतके गहिरे दाखवले जाते की संदेह निर्माण होतो.
“अहो, मी तर या मुखाला चंद्रच समजलो !” असे म्हटल्याने प्रत्यक्ष भ्रम व्यक्त होतो; येथे भ्रांतिमान अलंकार होतो.
आणि “हे मुख नव्हे, चंद्र आहे” असे प्रत्यक्ष वस्तुस्थिती झाकून दुसरेच रूप लादल्यास अपह्नुति घडते.
यावरून असे दिसते की, अभिव्यक्तीतील सूक्ष्म बदलांमुळे एकाच साम्याधिष्ठित कल्पनेचे विविध अलंकाररूपांत रूपांतर होते. एका बीजकल्पनेपासून अनेक अलंकारांची निर्मिती होते.
म्हणूनच कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी उपमेविषयी अत्यंत मार्मिक निरीक्षण केले आहे — उपमा ही जणू एखादी नटीच; ती निरनिराळी सोंगे धारण करून आपल्या पुढे येते आणि आपण त्या त्या अवताराला वेगवेगळ्या अलंकारांची नावे देतो.
[ 1 ] उपमा
यात दोन भिन्न वस्तूंमध्ये साम्य दर्शवले जाते.
उदा. :-
तो शर गर-वर-धर-सा, पवि-सा रवि-सा स्मरारिसायक सा |
पार्थभुजांतरि शिरला, वल्मिकामाजि नाग-नायक-सा ||
- ( मोरोपंत. )
[ 2 ] उत्प्रेक्षा
उपमेय हे जणू काही उपमानच आहे असे वर्णन जिथे येते तिथे उत्प्रेक्षा हा अलंकार होतो. यात बऱ्याचदा 'की, जणू, गमे, भासे' असे शब्द वापरले जातात.
उदा. :-
१)
वरती बघता इंद्रधनूचा गोफ दुहेरी विणलासे |
मंगल तोरण काय बांधले नभोमंडपी कुणि भासे ||
२)
बलाकमाला उडता उडता भासे कल्पसुमांची माळचि ते|
उतरुनि येती अवनीवरती ग्रहगोलचि की एकमते ||
३)
समरी मत्त मतंगज, की दोघे व्याघ्र की मृगाधिपती |
की वृष, की घन, की ग्रह, की नग, की अंधक स्मराराती ||
(इंद्रजित आणि लक्ष्मण जणू काही वरीलप्रमाणे भासत होते. या वर्णनात उत्प्रेक्षा अलंकार आहे. अंधक = एक राक्षस ; स्मर + अराति = मदनशत्रु = शंकर.)
[ 3 ] रूपक
या अलंकारात उपमेय आणि उपमान यांमध्ये अभेद वर्णिलेला असतो.
उदा.
१)
पहा पाखरे चरोनि होती झाडावर गोळा |
कुठे बुडाला पलीकडील तो सोन्याचा गोळा ||
(म. का. कारखानीस.)
२)
मद्-दुःखसागराचा अगस्त्य तू, काय बा तुझे नाव?
चिंतानदीत बुडता दैवे कोठोनि धाडिली नाव?
- ( मोरोपंत )
[ 4 ] अतिशयोक्ती
वस्तुस्थिती आहे त्यापेक्षा अधिकच फुगवून सांगितली जाते त्यावेळी हा अलंकार होतो.
१)
जो अंबरी उफळता खुर लागलाहे |
तो चंद्रमा निजतनूवरि डाग लाहे ||
जो या यशास्तव कसे धवलत्व नेघे |
शृंगारिला हय तयावरि भूप वेंधे ||
- ( रघुनाथ पंडित )
२)
कदा नेणो वोढी शरधिंतुनि काढी शर कदा |
कदा धन्वी जोडी वरिवरिहि सोडी तरि कदा ||
विपक्षाच्या वक्षावरि विवरलक्षास्तव रणी |
कळे राजेंद्राची त्वरित शरसंधान करणी ||
- ( रघुनाथ पंडित )
३)
प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे |
तृषार्ताची तृष्णा मृगजळ पिऊनही वितळे ||
सशाचेही लाधे विपिन फिरता शृंगही जरी |
परंतु मूर्खाचे हृदय धरवेना क्षणभरी |
[ ५ ] अपह्नुति
एखाद्या वस्तूबद्दल निश्चित माहिती असूनही ही ती नव्हेच, ही दुसरीच कुठलीतरी आहे असं प्रतिपादन केले जाते तिथे अपह्नुति हा अलंकार होतो. अशा प्रकारच्या वर्णनात 'नकार' योजिला जातो. (अपह्नव = लपवणे.)
उदा.
१)
न हे नभोमंडल, वारि-राशी |
न तारका, फेसचि हा तयाशी ||
न चंद्र हा, नावचि चालताहे |
न अंक तो, तीवर शीड आहे ||
ज्यात द्व्यर्थी शब्दांची योजना करून, त्यापैकी एकाचा निषेध व त्यात दुसऱ्याचा आरोप किंवा पुरस्कार केलेला असतो, त्याला छेकापह्नुती असे म्हणतात.
छेकापह्नुती
ऐसे उदा.
राधा-सखि-संवादी छेकापह्नुती ही आयका |
रसिक हो चतुर किती बायका || ध्रु||
अंबरगत परि पयोधराते रगडुनि पळतो दुरी|
काय हा धीट म्हणावा तरी?
तो नंदाचा मूल काय गे सांग कन्हैय्या हरी?
नव्हे गे मारुत मेघोदरी ||१||
[ ६ ] व्याजस्तुती
बाह्यतः स्तुती पण खरोखरची निंदा किंवा बाह्यतः निंदा पण खरोखर स्तुती असे वर्णन करताना व्याजस्तुती हा अलंकार होतो.
उदा.
१)
पितामह वदे तदा प्रबळ तू पृथानंदना|
रमेश रथि सारथी चतुर वागवी स्यंदना ||
स्वये गत-वयस्क मी, सरस वीर तू रे नवा|
भिडे; रणधुरंधरा जय घडो सुखे वा न वा ||
- ( वामन पंडित ).
( इथे पितामह भीष्म अर्जुनाची वरपांगी स्तुती करीत आहेत. पण आतून 'माझ्यापुढे तुझी काय मात्रा' अशीच भावना आहे.)
२)
'सर्वांस सर्व देशी' ही मिथ्या स्तुति महीपाला|
न परस्त्रियां दिधले त्वां वक्ष, न वा पृष्ठ तव विपक्षाला||
(वि. वा. भिडे)
इथे वरवर निंदा दिसत असली तरी गर्भित स्तुतीच आहे.
( तू परस्त्रीला आलिंगन दिले नाहीस किंवा शत्रूला पाठ दाखवली नाहीस. म्हणजे तू तर कोणालाही काहीच दिले नाहीस. 'मग तुला उदार दाता म्हणणे चुकीचेच ' हा वरवर जाणवणारा अर्थ. प्रत्यक्षात तू चारित्र्यसंपन्न आहेस आणि शूरही हा गर्भितार्थ.)
[ 7 ] अन्योक्ति
एखाद्या वस्तूबद्दल किंवा गोष्टीबद्दल सांगताना दुसऱ्याच कोणत्या तरी विषयावर टिप्पणी केली जाते तेव्हा अन्योक्ती अलंकार होतो.
उदा.
१) बकान्योक्ति -
( वृत्त - शिखरिणी )
उभा राहे एके चरणिं धरणीतें धरुनियां
तपश्चर्या वाटे करित जणुं डोळे मिटुनियां,
बका ऐशा ढोंगें तव अमति मासेच ठकती,
परि ज्ञाते तूझें कपट लवलाहीं उमजती.
२) चंदनान्योक्ति - ( वृत्त - पृथ्वी )
वनीं विलसती बहू विविध वृक्ष चोंहींकडे,
तयांत मज चंदनासम न एकही सांपडे;
जयास न दिली फळें न कुसुमेंहि दैवें जरी,
शरीर झिजवूनि जो तरि परोपकारा करी.
४) सूर्यान्योक्ति - (वृत्त - शार्दूलविक्रीडित )
देखोनी उदया तुझ्या द्विजकुळें गाती अती हर्षुनी,
शार्दूलादिक सर्व दुष्ट दडती गिर्यंतरीं जाउनी,
देशी ताप परी जसा वरिवरी येशी नभीं, भास्करा,
अत्युच्चीं पदिं थोरही बिघडतो हा बोल आहे खरा.
(आरंभी उपकारक असलेल्या परंतु नंतर त्रासदायक ठरणाऱ्यांच्या विषयी बोलताना इथे सूर्याला पुढे केले आहे.)
५) गजान्योक्ति
ज्याची स्पर्धा कराया इतर गज कधीं शक्त नाहींच झाले,
सांगावें काय ? ज्याच्या मृगपतिहि भये रान सोडून गेले,
तो पंकामाजि आजी गजवर फसला, युक्ति नाहीं निघाया,
अव्हेरीती, पहा, हे कलकल करुनी क्षुद्र कोल्हे तयाला.
६) कोकिलान्योक्ति -
अ) - ( वृत्त - वसंततिलका )
येथें समस्त बहिरे वसताति लोक,
कां भाषणें मधुर तूं करिशी अनेक.
हे मूर्ख यांस किमपीहि नसे विवेक,
वर्णावरून तुजला गणतील काक. ॥ १ ॥
आ) - ( वृत्त - शार्दूलविक्रीडित )
या माळावरि वृक्ष एकहि नसे, बाळा खुळ्या कोकिला,
येथें मंजुळ शब्द काढुनि गळा कां शोषिशी आपुला ?
जेथें बोल अमोल वाटति तुझे, तो देश, बा, वेगळा;
तेथे आम्र फुलोनि गंध विखरे चोहींकडे आगळा. ॥२॥
इ) - ( वृत्त - पृथ्वी )
वसंतसमयीं फुले, परिमळें दिशा व्यापि जो,
जयास अवलोकुनी सुरतरूहि चित्तीं थिजो,
तया सतत सेविती विहग आम्रवृक्षा किती;
परी पिकचि एकला मधुर वाणि लाधे कृती. ॥ ३॥
ई) - शार्दूलविक्रीडित]
कां, बा, सुस्वर शब्द काढिशि पिका ? राहें उगा; काळ हा
लोटेतों तरुकोटरीं लपुनियां कोठें तरीही रहा.
पानें तीव्र हिमें गळोनि दिसती झाडें जळाल्यापरी,
गर्जे कर्कश शब्द थोर करुनी काकावली त्यांवरी. ॥४॥
७) हरिणान्योक्ति -
( शार्दूलविक्रीडित )
जाळें तोडुनियां बळें हरिण तो टाळोनि दावाग्निला,
व्याधाचे चुकवूनि बाणहि महावेगें पुढें चालिला,
तों घाईंत उडी फसूनि पडला आडामधें बापडा;
होती सर्वहि यत्न निष्फळ, जरी होई विधी वांकडा.
८) शुकान्योक्ति -
अ) वृत्त - पृथ्वी )
फळें मधुर खावया असति, नित्य मेवे तसे,
हिरेजडित सुंदरीं कनकपंजरींही वसे,
अहर्निश तथापि तो शुक मनांत दुःखें झुरे,
स्वतंत्र वनवृत्तिच्या घडिघडी सुखातें स्मरे.
आ) ( वृत्त - स्रग्धरा )
देखोनी नारळीचा तरु, शुक भुलला एक त्याच्या फळाला
साळीचें शेत मोठें झडकरि पिकलें सोडुनी तो निघाला,
त्यानें त्या नारळातें फिरुनि फिरुनियां फोडण्या यत्न केला
आशेचाची न तेणें परि बळकटही चंचुचा भंग झाला.
इ) ( वृत्त - मालिनी )
बळकट पिंजराही तूज नाहीं बसाया,
फिरति बहुत बोके द्वाड भारी घरीं या,
परिसुनि तव वाणी पामरां सौख्य नाहीं,
म्हणुनि दिवस कांहीं मौन सेवून राहीं.
९) सिंहान्योक्ति
अ) ( वृत्त - स्रग्धरा )
भुंगे गुंजारवातें करिति शिरिं असे मत्त हत्तीहि जीतें,
डोळां देखोनि होते पळत भयभरें सोडुनीयां धृतीतें,
जेथे मुक्ताफळांचा खच बहु पडला, त्या गुहेमाजिं आता
सिंहाच्या, क्षुद्र कोल्हे कलकल करिती मृत्युनें त्यास नेतां.
आ) ( वृत्त - शार्दूलविक्रीडित )
खाण्यावांचुनि रोडला जरि, जरायोगें बहू वाळला,
रोगानें अतिपीडिला, जरि मरायातेंहि कीं टेकला,
उन्मत्तद्विपगंडभेदन करायाचीच इच्छा करी,
मानी; क्षुद्र जनावरांपरि तृणा स्पर्शेच ना केसरी.
इ) ( वृत्त - स्रग्धरा )
मेघांच्या गर्जनेनें खवळुनि वरतीं सिंह पाही स्वभावें,
काका, त्वां भीति सारी त्यजुनि तरुवरी मांसखंडास खावें,
जो उन्मत्ता गजांच्या खरतरनखरीं फोडुनी मस्तकांतें
धाला रक्ता पिऊनी; नच मृत पशुच्या इच्छितो तो कणातें.
ई) (वृत्त - शिखरिणी )
कृतीचीं आयाळे जडवुनि गळा पुष्ट करुनी,
बसे श्वा सिंहाच्या पदिं बहुत आवेश धरुनी,
तरी जो ऐकोनी भिउनि पळती मत्तहि करी;
कसा त्या नादातें क्षणभरिहि तो पामर करी ?
१०) समुद्रान्योक्ति
[ आर्या ]
निर्मळ जळांतुनी या दावी खळ जलधि जवळचीं रत्नें,
चित्ती आणु नको परि अल्पें होतील साध्य तीं यत्नें; || १ ||
गाळांत तळीं लोळति रत्ने, धरिशी तृणें शिरीं नित्य,
तुज तारतम्य कुठलें? जडधी हे नांव, रे, तुझें सत्य ||२ ||
११) मयूरान्योक्ति -
अ) ( वृत्त - शार्दूलविक्रीडित )
आहे पेटुनि वाजती कडकडां, त्यांचा ध्वनी होतसे,
ज्वाला राहुनि राहुनी उठति या विद्युल्लता ही नसे,
काळा दूर नभीं बहू पसरला, हा मेघ नोहे खरा,
वर्षाकाळ न हा, दवानल असे, सोरा, पळें, रे, घरा.
आ) ( वृत्त - शार्दूलविक्रीडित )
रत्नांचा जणु ताटवा झळकतो, मोरा, पिसारा तुझा,
हर्षे नाचशि तैं गमे त्रिभुवनीं पक्षी न ऐसा दुजा,
मोठा सुंदर तूं खरा परि दया नाहींच भिल्लांस या,
हे घेतील तुझ्या जिवा, झडकरी सोडीं अरण्यास या.
१२) हंसान्योक्ति -
अ) ( वृत्त - स्रग्धरा )
पानांमाजीं तरूच्या लपुनि बस कुठें, राजहंसा, कसाही,
जाती वर्षर्तुचे हे दिवस तंववरी सर्व कष्टांस साहीं,
येऊनी शारदश्री पुनरपि फुलतां पद्मवृंदें, तयांचा
भोक्ता नाहीं कुणीही तुजविण दुसरा, जाण हा नेम सांचा.
आ) ( वृत्त - स्रग्धरा )
ज्याच्या तीरी समंतान्मधुरफलभरें वांकले वृक्ष भारी,
ज्यामाजी पद्मखंडें फुलुनि विखरती गंध चित्तापहारी,
त्या जेणें मानसातें त्यजुनि वरियलें पंकिला पल्वलातें
त्या हंसाच्या, बकांनीं जरि पद दिधलें मस्तकीं, योग्य त्या तें.
( वरील सर्व अन्योक्ति-रचना कृष्णशास्त्री चिपळूणकर यांच्या आहेत.)
१३) वृश्चिकान्योक्ति
सांबाच्या पिंडीते बससि अधिष्ठून वृश्चिका आज |
परि तो आश्रय सुटता खेटर उतरील रे तुझा माज ||
- ( वि. वा.भिडे )
( एखाद्या श्रेष्ठ व्यक्तीच्या आश्रयाला राहिल्यामुळे माजलेल्या खलपुरुषाबद्दल सांगताना विंचवाचा दाखला दिला आहे.)
१४) आम्रान्योक्ति
ज्याचे पल्लव मंगलप्रद, शिणा छाया जयाची हरी,
गंधे युक्त फुले, फळेहि असती ज्याची सुधेच्या परी,
वाटे जो रमणीय भूषण वनश्री मुखींचे, भला
आम्रा त्या पिक सेविता समसमा संयोग की जाहला
अर्थालंकारांचे हे वैभवशाली दालन अतिशय भव्य आहे. त्यामुळे पुढल्या टप्प्यातील विहारासाठी थोडासा विसावा घेऊ.
- अरुण सौदागर,
9422660621.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा