शब्दालंकार
भाषालंकार
[ लेखांक क्र. 4 आ]
यापूर्वीच्या लेखांमध्ये आपण यमक (आणि त्याचे 'एकाक्षरी/अनेकाक्षरी यमक, अंत्यादि यमक, दाम-यमक, पुष्प-यमक, अश्वधाटी यमक, युग्मक यमक, समुद्गक यमक इ. उपप्रकार), अनुप्रास, श्लेष हे भाषालंकार आणि 'उपमा, उत्प्रेक्षा, रुपक, अतिशयोक्ती आणि अपह्नुति ' हे शब्दालंकार पाहिले.
आज अर्थांतरन्यास आणि दृष्टांत या शब्दालंकारांबद्दल माहिती घेऊ.
शब्दालंकार
[ ८ ] अर्थान्तरन्यास
एखाद्या सिद्धांताला पूरक म्हणून विशेष उदाहरण दिलं जातं किंवा विशिष्ट गोष्टीच्या समर्थनासाठी एखादं सर्वमान्य सत्य प्रतिपादन केलं जातं तेव्हा अर्थांतरन्यास हा अलंकार होतो.
उदा. १.
आली जरी कष्टदशा अपार |
न टाकिती धैर्य तथापि थोर||
केला जरी पोत बळेचि खाले||
ज्वाला तरी ते वरती उफाळे||
(मोरोपंत)
हातातील मशाल जरी खाली केली तरी तिच्या ज्वाला वरच्या बाजूलाच राहतात, त्याप्रमाणे महापुरुषाचा धीरोदात्तपणा घोर संकटातही कधी कमी होत नाही.
२)
तदितर खग भेणे वेगळाले पळाले |
उपवन-जल-केली जे कराया मिळाले ||
स्वजन गवसला जो त्याजपाशी नसे तो |
कठिण समय येता कोण कामास येतो?
-(नल-दमयंती आख्यान - रघुनाथ पंडित)
नल राजाने राजहंसाला पकडल्यावर बाकीचे हंसपक्षी त्याच्या सुटकेचे प्रयत्न करण्याऐवजी पळून गेले. संकटात सापडलेल्याला आप्तस्वकीय सुद्धा उपयोगी ठरत नाहीत.)
३)
आई म्हणोनि कोणी आईस हाक मारी |
ती हाक येई कानी मज होय शोककारी ||
नोहेच हाक माते, मारी कुणी कुठारी |
आई कुणा म्हणू मी? आई घरी न दारी ||
ही न्यूनता सुखाची, चित्ता सदा विदारी |*
स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी ||
-(यशवंत = यशवंत दिनकर पेंढारकर )
[ 9 ] दृष्टांत
एखाद्या महत्त्वाच्या गोष्टीच्या समर्थनार्थ दुसर्या विशेष गोष्टीचे उदाहरण दिले जाते त्यावेळी दृष्टांत हा अलंकार होतो.
उदा. १)
न कळता पद अग्निवरी पडे|
न करि दाह असे न कधी घडे||
अजित-नाम वदो भलत्या मिषे|
सकल पातक भस्म करीतसे||
- (वामन पंडित)
२)
विद्यासमन्वितहि दुष्ट परी त्यजावा |
त्याशी बुधे न सहवास कधी करावा ||
ज्याच्या असे विमलही मणि उत्तमांगी |
तो सर्प काय न डसे खल अंतरंगी ||
- (वामन पंडित)
[10 ] विरोधाभास
विरोध नसतानाही तो असल्याचा आभास निर्माण केला जातो तेव्हा विरोधाभास हा अलंकार होतो.
उदा
१)
मारी यात बुडी जो तो तरे, यास सकर्दमा |
मानवाधमही पावे पाहता गति उत्तमा ||
-( मुजुमदार = गोपाळ गोविंद मुजुमदार = साधुदास)
इथे वस्तुतः बुडी मारणारा बुडायला हवा, परंतु 'तरेल' असं म्हटल्यामुळे 'बुडणे व तरणे' या परस्परविरोधी गोष्टी एकत्र आलेल्या दिसतात.
२)
वज्रापेक्षाहि कठिणे, पुष्पाहुनि मृदू अशी |
लोकोत्तरांची हृदये कोणा जाणवतील ती?
( लोकोत्तर पुरुषांची मने कठोर असतात तशीच कोमलही! पण हा विरोध एकाच ठिकाणी एकवटलेला दाखवल्यामुळे इथे विरोधाभास अलंकार होतो.)
[ 11 ] यथासंख्य
क्रमवार आलेल्या शब्दांचा संबंध पुढे त्याच क्रमाने जोडला जातो तेथे यथासंख्य हा अलंकार होतो.
उदा.
तृणे मृगाला, सलिले झषाला |
संतोष हे वृत्ति महा-जनांला ||
तयास निष्कारण तीन वैरी |
किरात, कवर्तक, दुष्ट भारी ||
-(वामन पंडित)
उदा. २)
सुविद्यता, शौर्य, विनीतता खरी|
कुमारिकांची अवलोकिल्यावरी ||
कृतार्थता, भीति, मुदा, हृदंतरी |
गुरूस, शत्रूस, पित्यास वाटली ||
-(वि. वा. भिडे).
[12 ] स्वभावोक्ति
एखाद्या वस्तूचे जेव्हा हुबेहूब वर्णन केले जाते तेव्हा स्वभावोक्ति हा अलंकार होतो.
उदा.
अंग वक्र अधरी धरि पावा |
गोपवेष हरि तोचि जपावा ||
वाम-बाहुवरि गालहि डावा |
तो ठसा स्वहृदयात पडावा ||
-(वामन पंडित)
यात श्रीकृष्णाचे वर्णन आहे.
२)
नदीच्या शेजारी, गडाच्या खिंडारी |
झाडांच्या ओळीत, वेळूंच्या जाळीत ||
दिवसा दुपारी, जांभळी अंधारी |
मोडके देऊळ, त्यावरी पिंपळ ||
कोण गे त्या ठायी, राहते गे आई?
-(भा. रा. तांबे).
[ उर्वरित अलंकार पुढच्या भागात]
- (अरुण सौदागर)
9422660621.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा