भाषालंकार
अर्थालंकार
[ लेखांक ४ ( इ ) ]
[ १३ ] पर्यायोक्ति
एखादी गोष्ट सरळ न सांगता आडवळणाने सूचित करताना या अलंकाराचा वापर केला जातो.
उदा.
केलेचि धन्य दर्शन-दाने, येऊनि कानना माते |
अजि देवेश! निवावे बहु हे कान नामाते ||
यमराज सावित्रीला म्हणतात, "हे माते, या काननात (अरण्यात) येऊन मला तू दर्शन दिलेस आणि मी धन्य झालो. आता तुझे नाव सांगून माझे कान तृप्त करावेस."
स्पष्टपणे नाव विचारण्याचे औधत्य न करता ते आडवळणाने विचारले आहे. ( यातील यमकाची योजनाही चतुराईने केलेली आहे.)
[ १४ ] सार
एकापेक्षा एक अशा सरस किंवा गुणदोषदर्शक गोष्टी चढत्या क्रमाने मांडताना सार हा अलंकार योजिला जातो.
उदा.१)
आधीच मर्कट तशातहि मद्य प्याला |
झाला तशात जरि वृश्चिकदंश त्याला ||
झाली तयास तदनंतर भूतबाधा |
चेष्टा वदू मग किती कपिच्या अगाधा ||
( - वामन पंडित)
२)
वाहे महीते स्वशिरी फणींद्र तो |
पाठीवरी कूर्म तयास वाहतो ||
त्यालाहि घे सागर मांडियेवरी |
थोराचिये थोरिव जाण यापरी ||
- ( वामन पंडित)
पृथ्वीला नागराज शेषाने आपल्या मस्तकी तोलून धरले आहे. शेषाला (पृथ्वीसह) कासवाने पाठीवर धारण केले आहे. आणि अशा या कासवाचा भार जो साहतो त्या सागराची महती ती काय वर्णावी!
[ १५ ] दीपक
एकाच कर्त्याशी संबंधित अनेक क्रिया दर्शवताना दीपक अलंकार वापरतात.
उदा.
पायी भ्रमली, श्रमली, निजली, भिजली निजाश्रु नीरांनी |
धार्मिक न पहिला तो जो जाय अशीच टाकुनी राणी ||
[ १६ ] निदर्शना
दोन वस्तूंमधला असंभाव्य अथवा अशक्यप्राय संबंध दर्शवताना निदर्शना या अलंकाराची योजना केली जाते.
उदा.
सर्पाते बिसतंतुने सुदृढ तो बांधावया इच्छितो |
किंवा वज्रमणी शिरीषकुसुमे छेदावया पाहतो ||
किंवा तो मधुबिंदुने मधुरता क्षाराब्धिला आणितो |
जो मूर्खास सुभाषितें वश करू ऐसे झणी बोलतो ||
( सर्पाला लवचिक कमळतंतूंनी बांधणे, वज्रासारख्या कठीण हिऱ्याला शिरीषाच्या कोमल फुलांनी फोडणे किंवा खारट समुद्राला मधाच्या एका थेंबाने गोड करणे हे तिन्ही प्रयत्न अशक्य व निरर्थक आहेत, तसेच मूर्खाला कितीही उत्तम वचने सांगितली तरी त्याचा काय उपयोग? )
[ १७ ] परिसंख्या
एखाद्या वस्तूची महती अधोरेखित करताना इतर गोष्टींचे विशेषत्व नाकारण्यासाठी परिसंख्या अलंकार उपयुक्त ठरतो.
उदा.
१)
श्रुतेचि की श्रोत्र न कुंडलाने |
दानेचि की पाणि न कंकणाने ||
साजे तसा देहहि हा न आने |
परोपकारेचि न चंदनाने ||
- ( वामन पंडित )
२)
कोणा अंध म्हणावे? न दिसे सन्मार्ग उघडही ज्यास |
कोण बधिर? जो नाही परिसत केल्या हितोपदेशास ||
(- कृष्णशास्त्री चिपळूणकर)
[ १८ ] समुच्चय
एखादी गोष्ट सिद्ध करण्यासाठी एकच कारण पुरेसे असतानाही अन्य काही घटकांची पूरक वर्णने केली जातात तेव्हा समुच्चय हा अलंकार होतो.
उदा.
(१)
चंद्राला दिवसा प्रकाश नसणे, ये कामिनीला जरा |
पद्मावीण जले, निरक्षर मुखी जो साजिरा गोजिरा ||
दात्याला धनलाभ, नित्य असणे दारिद्र्य विद्वज्जनी |
दुष्टाचा पगडा महीपतिगृही ही सात शल्ये मनी ||
(-वामन पंडित)
२)
विपत्काली धैर्य प्रभुपणि सहिष्णुत्व बरवे |
सभे पांडित्याचा प्रसर, समरी शौर्य मिरवे ||
स्वकीर्तीच्या ठायी प्रचुर रति, वीद्या व्यसन जे |
तयांचे हे स्वाभाविक गुण सहा सत्पुरुष जे ||
(- वामन पंडित )
[ १९ ] सम
समान गुण असलेल्या दोन वस्तूंमध्ये असलेले साधर्म्य उचितच आहे हे दर्शविताना सम या अलंकाराचा प्रयोग केला जातो.
उदा.
१)
ज्याचे पल्लव मंगलप्रद शिणा छाया जयाची हरी |
गंधेयुक्त फुले फलेहि असती ज्याची सुधेच्या परी ||
वाटे जो रमणीय भूषण वनश्रीच्या मुखीचे भला |
आम्रा त्या पिक सेविता समसमा संयोग की जाहला ||
(- कृष्णशास्त्री चिपळूणकर )
( ज्या आंब्याच्या वृक्षाची कोवळी पालवी शुभ व कल्याणकारक आहे आणि ज्याची सावली थकवा घालवणारी, शीतल आहे, ज्याची फुले सुगंधित आहेत आणि फळे अमृतासारखी गोड आहेत, जो संपूर्ण वनश्रीच्या मुखावरील सुंदर भूषणासारखा शोभतो, त्याचे मधुर आम्रफलाचा आस्वाद जेव्हा गोड गळ्याची कोकिळा घेते तेव्हा माधुर्याचा तो संयोग किती उत्तम आणि भाग्याचा!)
२)
श्रीकृष्ण रुक्मिणीला, श्रीकृष्णा रुक्मिणी जशी आता |
दमयंती नळ, नळा दमयंती आयको जने गाता ||
(- मोरोपंत )
[ २० ] विरुद्धगुणान्यास
परस्परविरोधी गुणधर्म असूनही तुलना करण्यासाठी विरुद्धगुणान्यास या अलंकाराची योजना केली जाते.
उदा.
(१)
धनपति जरि तू रे; मी असे शास्त्रवेत्ता |
भट समरि जरी तू ; मी महावादिजेता ||
अनुचर जरि तूते; सेविती छात्र माते |
न गणिशी मज ; जातो तुच्छ मानूनि तूते ||
(- वामन पंडित)
२ )
तू राजा जरि, मी श्रुतिस्मृतिमहाविद्याभिमानी असे |
भाग्ये विश्रुत तू, मदीय कवितासत्कीर्ति लोकी वसे ||
आहे अंतर फार तूज मज रे, तू गर्व जै दाविशी|
मीही निःस्पृह भाग्यवंत-गणना नाही मला फारशी||
[ २१ ] प्रश्न
काव्यातल्या प्रश्नातच त्याचे उत्तर दिले जाते तिथे प्रश्न हा अलंकार होतो.
उदा.
१)
अपराध काय घडला? रुसवा केला दयानिधे कां जी?
अमृत प्राशन करवूनि पाजावी काय शेवटी कांजी?
२)
व्रणार्त पशुच्या शिरावरि वनी उभे का कसे |
स्मरादि रिपु मन्मनी अहि न काळ भेका कसे? ||
[ २२ ] श्लेष
एखाद्या विशिष्ट शब्दयोजनेमुळे केवळ त्या शब्दाचेच नव्हेत तर संपूर्ण वाक्याचेच दोन अर्थ होतात तेव्हा श्लेष हा अलंकार होतो.
(शब्दश्लेषात एका शब्दाबद्दल दुसरा पर्यायवाची शब्द घालून चालत नाही ; अर्थश्लेषात ते चालू शकते.)
उदा.
तू मलिन, कुटिल, नीरस, जडहि, पुनर्भवपणेहि, कच साच |
धरिला शिरीहि न स्वप्रकृतिगुण त्यजिसि; नाम कच साच ||
(- मोरोपंत)
(कच = केस ; देवगुरु बृहस्पतिंचा पुत्र कचदेव. या चरणात कच शब्दाला लावलेली तदर्थक विशेषणे बदलून लावली तरी अर्थामध्ये बदल होत नाही.)
[ २३ ] चेतनगुणोक्ति
अचेतन वस्तूंमध्ये चैतन्य असल्याचे वर्णन जिथे केलेले असते तिथे चेतनगुणोक्ति हा अलंकार होतो.
उदा.
(१)
दावी रडोनि झाले, जे गंध उगाळिता स्वहात किणी |
भीम म्हणे, "विधिलेखनि लेखा नच वचकलीस घातकिणी ||
(- मोरोपंत)
(२)
वृक्षा त्वज्जन्मसाफल्य साधूचे व्रत पाळिशी |
स्वता सोसूनिया ताप, छाया पांथास वोपिशी ||
(- वि. वा. भिडे )
*******************************************
शब्दालंकारांच्या झळाळीने आणि अर्थालंकारांच्या तेजस्वितेएने नटलेल्या मायमराठीच्या विविध रूपांचे दिव्य दर्शन ‘भाषालंकार’ या प्रकरणातील चार भागांतून घडले.
आता या अलंकारसौंदर्यानंतर काव्याच्या अंगभूत लयशास्त्राकडे वळू या— ‘वृत्त’ या प्रकरणातून शब्दांना चाल, मात्रा आणि गणयोजना यांचे शास्त्रीय अधिष्ठान कसे लाभते, याबद्दल थोडंफार जाणून घेऊ.
*******************************************
या लेखाद्वारे आपल्या मराठी महान काव्यपरंपरेतील समृद्ध दालनातल्या वैभवाचं, ओझरतं का होईना, दर्शन घडलं असेल तरी मला धन्यता वाटेल.
अरुण सौदागर,
मराठी भाषावैभव
9422660621.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा