कला-विलास

 

[ लेखांक ५ ] 

भाषा कला-विलास

काव्यगुण, काव्यरस व काव्याला शोभा देणारे अलंकार यांच्याशिवायही भाषेचे वैभव दर्शविणाऱ्या आणखीही काही गोष्टी असतात, ज्यांच्यामुळे मायमराठी भोवतीच्या वेलबुट्टीदार नक्षीकामाच्या महिरपी अधिक शोभून दिसतात. 

[ १ ] सुभाषिते :

अर्थातून सहज प्रकट होणाऱ्या रम्यतेमुळे भाषा अधिक सुंदर वाटते. तिच्यात अलंकारांप्रमाणे मुद्दाम सौंदर्य आणावे लागत नाही अशा रचना म्हणजे 'सुभाषित' होय. 

सु-भाषित ह्या शब्दाचा चांगले भाषण किंवा चांगले वाक्य एवढाच अर्थ आहे; मात्र ते मनोहर, स्वयंपूर्ण, वैश्विक सत्य, उपदेशात्मक किंवा हितकारक असावे.

१) 

गुळ-खोबरे विलोकुनि, भलत्याहि जनास बालक वळावा ।

सत्य प्रेमचि दावुनि, सुज्ञ तो विश्वपाळ कवळावा ।।

बह्वर्थ, जन-मनोहर, स्वल्पाक्षर, मधुर, सत्य, बोलावे ।

की या वाक्य-श्रवणे श्रोत्यांचे चित्त, शिरहि डोलावे ||

  ...... (मोरोपंत )


 २)

नरदेहाचे उचित | काही करावे आत्महित |

यथानुशक्त्या चित्तवित्त | सर्वोत्तमी लावावे ||

 -  ( समर्थ रामदास स्वामी.) 


३)

नम्र झाला भूतां | तेणें कोंडिलें अनंता ||

हेंचि शूरत्वाचें अंग | हारी आणिला श्रीरंग ||

  - ( संत तुकाराम.) 


४ )

देहे त्यागिता कीर्ति मागे उरावी |

मना सज्जना हेंचि क्रिया धरावी ||

मना चंदनाचेपरी त्वां झिजावे |

परी अंतरी सज्जना नीववावे ||

 - ( समर्थ रामदास स्वामी.) 


५)

लाभीं हर्ष नको, विषादहि नको निंदा-प्रशंसा नको | 

हानीचा मनिं शोक तूं धरूं नको, देहीं अहंता नको । 

कोणाचे इतिकृत्य तें स्मरूं नको, माझें तुझें हें नको |

आप्तांसी ममता नको, गुरूपरब्रह्मासि सोडूं नको ॥  

६) 

सुसंगती सदा घडो, 

सुजनवाक्य कानी पडो ।

कलंक मतिचा झडो, 

विषय सर्वथा नावडो ॥

सदंघ्रिकमळी दडो, 

मुरडितां हटाने अडो ।

वियोग घडतां रडो, 

मन भवच्चरित्रीं जडो ॥


( केकावली - मोरोपंत) 

[ २ ] कोटी

जेव्हा एखाद्या श्लेषात्मक शब्दाच्या योगे ध्यानी मनी  नसता अचानक व्यंग्यार्थ उत्पन्न होऊन आपल्याला आश्चर्य वाटते व हसू येते, तेव्हा तेथे "कोटी " झाली असे म्हणतात.

१)"त्याला डोके आहे" असे कोणी म्हटल्यास एकदम तो नुसताच 'डोके-हीन प्राणी आहे. असा व्यंग्यार्थ उत्पन्न झाल्यास तेथे डोके या शब्दावर कोटी झाली असं म्हणता येईल. 

२)

"सिमला येथे लांब पल्ल्याच्या गावी जायचे असले तर 'चौघांच्या खांद्यावरून' जावे लागते." ह्या ठिकाणी 'चौघांच्या 'खांद्यावरून जाणे' या वाक्प्रचारावर कोटि आहे.

३)

एक दिवस गंधर्व मंडळीत गेलेल्या नटांचे सामान किर्लोस्कर नाटकगृहातून बाहेर आणले जात होते आणि रस्त्यावर गाड्या भरल्या जात होत्या. त्या वेळी गडकरी आगगाडीच्या एंजिनसारखे; संतापाच्या धुराचे भपकारे टाकीत दारात उभे होते. गाड्या निघाल्या. इतक्यात बोडस बाहेरून धावत नाटकगृहाकडे परत आले. गडकऱ्यांनी क्रुद्ध आवाजात विचारले, "काय हो, काय राहिले ?" बोडस म्हणाले, " माझे जोडे मी विसरलो !" गडकरी त्याच स्वरात म्हणाले, "आता बाहेर पुष्कळ मिळतील की तुम्हांला !" 

४)

पत्नीच्या सततच्या सूचना व उपदेश ऐकून पु. ल. देशपांडे तिला म्हणाले " या घरात मीच एकटा देशपांडे आहे आणि तू उपदेशपांडे!"

५)

काही वेळा एखाद्या कोटीतून कारुण्यही डोकावते. 

उदा. 

' बाकी चितळे मास्तरांच्या घरात बायकोच्या गळ्यात काही मोत्ये पडली नाहीत; पण डोळ्यांत पडली.'

मास्तरांच्या पत्नीच्या गळ्यात सोन्याचे दागिने (मोती) नाहीत, परंतु डोळ्यांना मोतीबिंदू (मोती) झाला आहे, जे गरिबी आणि आजारपण यांचे भीषण चित्रण आहे। 

डोळ्याच्या मोतीबिंदू च्या उल्लेखाने मनात करुण भाव उमटतो. 


[ ३ ] विनोद 

विचारांत असंबद्ध विकृत किवा अद्भुत स्वरूप प्राप्त होऊन एकंदरीत अर्थ हास्यकारक होतो, तेव्हा त्या वाक्यरचनेला "विनोद"  म्हणतात. यात शेवट हास्यकारक असतो.

१)

" चिंतोपंत नावाप्रमाणेच भ्रमिष्टे असत. त्यांना जेव्हा खाण्यास मी तिसऱ्यांदा सांगितले तेव्हा ते कोठे भानावर आले. परंतु आश्चर्य, त्यांनी हातातील सुपारी नदीत फेकली व दुसऱ्या हातातील वाळू सुपारीच समजून चटकन् तोंडात टाकली."

भ्रमिष्ट माणसाचे हे असंबद्ध व थोडेसे अतिरंजित वर्णन मजेशीर आहे.


२)

एकदा आचार्य अत्र्यांच्या घराजवळ एक गाढव मरुन पडले होते. ते तिथून हटवण्यासाठी त्यांनी म्युनिसिपालिटीला फोन केला व सांगितले," इथे जवळच एक गाढव मरुन पडले आहे. दुर्गंधी सुटलीय. घाणीचे साम्राज्य पसरले आहे. तुम्हीच काहीतरी करा."

पलिकडून उत्तर आले, "मग त्याच्या नातेवाईकांना कळवा आधी. "

अत्रे म्हणाले, "अहो, म्हणून तर मी प्रथम तुम्हांलाच फोन करतोय." 


[ ४ ]  विडंबन :

कधी कधी विनोदनिर्मितीसाठी लेखनात परानुकरण व त्याबरोबरच परकृतीचा काहीसा उपहास केला जातो तेव्हा त्याला "विडंबन " असे म्हणतात. उदा०- 

(१) ना. वा. टिळक यांच्या "पाखरा, येशिल का परतून?" या कृतीचे "परिटा येशिल का परतून?" हे विडंबन आहे. 

(२) केशवसुतांच्या 'आम्ही कोण?' ह्या कवितेचे "आम्ही कोण काय पुसतां दांताड वेंगाडुनी ? " हे विडंबन आहे. 

ही दोन्ही विडंबन-पदे केशवकुमारांची (आचार्य अत्रे) आहेत.

आम्ही कोण (विडंबन) 

आम्ही कोण?' म्हणून काय पुसता दाताड वेंगाडुनी?

'फोटो' मासिक पुस्तकात न तुम्ही का अमुचा पाहिला?

किंवा 'गुच्छ' 'तरंग' 'अंजली' कसा अद्यापि न वाचला?

चाले ज्यावरती अखंड स्तुतिचा वर्षाव पत्रांतुनी?

ते आम्ही - परवाङ्मयातील करू चोरुन भाषांतरे,

ते आम्ही - न कुणास देऊ अगदी याचा सुगावा परी!

डोळ्यांदेखत घालुनी दरवडा आम्ही कुबेराघरी!

त्याचे वाग्धन वापरून लपवू ही आमुची लक्तरे!

काव्याची भरगच्च घेउनि सदा काखोटिला पोतडी,

दावू गाउनी आमुच्याच कविता आम्हीच रस्त्यामधे,

दोस्तांचे घट बैसवून करु या आम्ही तयांचा 'उदे'

दुष्मानावर एकजात तुटुनी की लोंबवू चामडी!

आम्हाला वगळा-गतप्रभ झणी होतील साप्ताहिके!

आम्हाला वगळा-खलास सगळी होतील ना मासिके!

 - ( केशवकुमार ).

(कवी केशवसुत यांची मूळ कविता याच लेखमालेतील पुढच्या भागात ( भाग क्रमांक १४ मध्ये) ओघाने येईलच). 

[ ५ ] वाक्प्रचार

एखाद्या शब्दसमूहाचा सरलार्थ न घेता  विशिष्ट अशा वेगळ्या रूढ अर्थाने घेतला जातो, अशा शब्दसमूहाला वाक्प्रचार म्हणतात.

वाक्प्रचार हा काही शब्दांचा ठराविक समूह असतो.

त्याचा अर्थ शब्दशः न घेता रूढ अर्थाने घ्यावा लागतो. भाषेला रंगत, प्रभाव आणि ठसठशीतपणा आणण्यासाठी वाक्प्रचारांचा उपयोग केला जातो.

उदा. 

१. हातभार लावणे  = मदत करणे

२. तोंड भरून कौतुक करणे =  मनापासून स्तुती करणे

३. डोळ्यांत तेल घालून पाहणे = अत्यंत सावधपणे लक्ष ठेवणे

४. खांद्याला खांदा लावून उभे राहणे = एकजुटीने साथ देणे

५. नाव कमावणे  = कीर्ती मिळवणे.

तोंड द्यावे लागणे – संकटाचा सामना करावा लागणे

६. हात टेकणे – हार मानणे

७. डोळे उघडणे – जाणीव होणे

८. कान देऊन ऐकणे – लक्षपूर्वक ऐकणे

९. पाय रोवणे – ठामपणे उभे राहणे / स्थिर होणे

१०. श्रीगणेशा करणे = आरंभ करणे. 


[ ६ ] म्हणी

लोकांच्या दीर्घ अनुभवातून निर्माण झालेला आणि जीवनातील एखादा नियम, मान्यता किंवा उपदेश ध्वनित करणारे संक्षिप्त वाक्य म्हणजे म्हण. म्हणी या लोकपरंपरेतून तयार झालेल्या असतात. त्यात सामान्यपणे जीवनानुभव, शिकवण किंवा सत्य सूचित केलेले असते.

मोजक्या शब्दांत मोठा अर्थ सांगण्याचे सामर्थ्य म्हणींमध्ये असते.

उदा. 

१. जशी करणी तशी भरणी.

२. थेंबे थेंबे तळे साचे.

३. अति तिथे माती.

४. अंथरूण पाहून पाय पसरावेत. 

५. पेरावे तसे उगवते. 

६. नाचता येईना अंगण वाकडे.

७. आयत्या बिळात नागोबा.

८. नळी फुंकिली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे.

९. भरवशाच्या म्हशीला टोणगा.

१०. कोल्हा काकडीला राजी. 


वाक्प्रचार व म्हणी यांतील फरक. 

१) वाक्प्रचार हा एक केवळ शब्दसमूह असतो, पूर्ण वाक्य नसतो. तर म्हण ही पूर्ण वाक्याच्या स्वरूपात असते.

२) वाक्प्रचारातील शब्दांचा अर्थ शब्दशः न घेता रूढ किंवा लाक्षणिक अर्थाने घ्यायचा असतो. म्हण ही  जीवनानुभव, उपदेश किंवा सार्वत्रिक सत्य व्यक्त करते.

३) वाक्प्रचार हा वाक्यातील एक भाग म्हणून वापरला जातो. म्हण मात्र स्वतंत्रपणे पूर्ण वाक्य म्हणूनही वापरता येते.

४) वाक्प्रचार हा भाषेला रंगत व प्रभाव देतो.

म्हण ही एखादी शिकवण, वैश्विक सत्य किंवा अनुभव सांगते.

मराठीला भाषेला भूषणावह असलेल्या या उक्ती काव्यातही आढळतात. परंतु, विश्वासार्ह स्रोताच्या अभावी त्या इथे उद्धृत करणे इष्ट नाही. 

******************************************

या लेखाद्वारे आपल्या मराठी महान काव्यपरंपरेतील समृद्ध दालनातल्या वैभवाचं, ओझरतं का होईना, दर्शन घडलं असेल तरी मला धन्यता वाटेल.

 अरुण सौदागर,

 मराठी भाषावैभव. 

9422660621. 

२०/०२/२०२६.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शब्दालंकार

मराठी भाषा वैभव - काव्यगुण

काव्यविचार