काव्य-दोष
[ लेखांक ६ ]
काव्य-दोष
काव्याची भाषा शक्यतो शुद्ध, नियमबद्ध आणि सुसंस्कृत असावी अशी अपेक्षा असते. परंतु कधी कधी कवीकडून व्याकरणाच्या नियमांचे पालन होत नाही. अशा प्रकारच्या व्याकरणदोषाला काव्यशास्त्रात च्युतसंस्कृती असे म्हटले जाते.
च्युत’ म्हणजे त्यापासून विचलित होणे. त्यामुळे व्याकरणाच्या नियमांपासून झालेली चूक म्हणजे च्युतसंस्कृती. कवीने लिंग, वचन, विभक्ती, काळ, धातुरूप, संधी इत्यादी व्याकरणनियम पाळले नाहीत तर तो दोष निर्माण होतो.
च्युतसंस्कृतीचे स्वरूप
हा दोष पुढील प्रकारे दिसून येतो—
लिंगदोष – शब्दाचे लिंग चुकीचे वापरणे.
वचनदोष – एकवचन-बहुवचन यांचा अयोग्य वापर.
विभक्तीदोष – योग्य विभक्ती न वापरणे.
धातुरूपदोष – क्रियापदाचे अयोग्य रूप.
संधीदोष – संधीचे नियम मोडणे.
साधे उदाहरण
उदा.
सुंदर चंद्र हसती — येथे चंद्र एकवचनी असून हसती हे बहुवचन क्रियापद आहे; त्यामुळे वचनभंग होतो.
काव्यातील रस, माधुर्य आणि सुसंगती टिकवण्यासाठी भाषेची शुद्धता पूरक ठरते. व्याकरणाचे नियम मोडले गेले तर काव्याची शोभा कमी होते, म्हणून काव्यशास्त्रज्ञांनी च्युतसंस्कृती हा दोष मानला आहे. मात्र कधी कधी लोकभाषेचा प्रभाव, वृत्ताची गरज किंवा स्थानिक बोलीभाषेतील शब्दरचना यांमुळे असे प्रयोग आढळतात.
या काव्यदोषांमध्ये प्रामुख्याने व्याकरण-दोष, शब्द-दोष व छंदोदोष यांचा समावेश होतो.
१ ] च्युतसंस्कृती
१) व्याकरण दोष
क) अप्रयुक्त ऱ्हस्व-दीर्घत्व
१) श्रिकृष्ण वेणु वाजवी | विधी भुगोळ गाजवी ||
२) रामाची बहू अप्रिती मजवरी होईल गे सर्वथा |
३) हलवीत विराची काया |
ख)
१) दिलें बापें भावें त्यजुनि बरवे ते क्षितिपती
(भाऊ शब्दाची अप्रयुक्त तृतीया.)
१) कोशागारमधूनि फार कनका सांगोनिया काढवी
(सामान्य रूपाचा अभाव)
नगां त्यागुनि वैराग्य तुवां घेले
( घेतले ऐवजी घेले हे अप्रयुक्त क्रियापदरूप )
त्वां प्रल्हाद-ध्रुवादि स्वहित कथुनिया नारदा, धन्य केला.
(केले - प्रयोगशैथिल्य )-
धूलिने धुंद दिक् चारी
( वचन-दोष. दिक् - एकवचनी, चारी अनेकवचनी.)
लिंगदोष
१) हे वारितां ध्वनि उठे कर-कंकणाची.
२) सख्या रे जीवघेणी हा सरायाचा कधीं खेळ?
अपसंधी
१) जया कंदनीं तोषलाऽनंग-दाहो
(तोषला + अनंग - अपसंधि)
२) मगैश्वर्या हानी सहजचि घडे भानुसदनी)
( मग + ऐश्वर्या - अपसंधि)
सौदागरांनीं धरिलाऽधमासी
(धरिला +अधमासी - अपसंधि)
नियमबाह्य संधी
१) कवळित पयधारा अंजुळीने वरोनी
(नियमबाह्य संधी - पयोधारा हवे)
२) अर्पूनि चित्तें जग-जीवनांत
( नियमबाह्य संधी - जगज्जीवनात हवे )
३) शक्तिरूपे जगन्माता वर्तते जगदांतरी
( नियमबाह्य संधी - जगदंतरी हवे )
४) पतीत-पावन जगदोद्धारक नाम तुझे राया
( नियमबाह्य संधी जगदुद्धारक हवे)
ग) विसंधी
१) ध्याती रमा-अब्जभवादि ज्याते
२) स्व-अनुरूप परस्पर दंपती
३) लोचन-आनन-अंबुज-कानन-अंबु-रुहें सकळ विमळे.
४) वदे ऐसें ठेवी हरि जननि-अंकीं अणि निघे
घ) अप्रयुक्त समास (मराठी /संस्कृत + अरबी/फारसी भाषा)
१) नको रे मना या जिवा कर्म-बेडी.
२) नसे साधिला युक्तिचा यत्न-किल्ला
३) व्योमासि चुंबित असे द्विज-होम-धर
[ २ ] शब्द-दोष
च) भलत्याच ठिकाणीं अप्रयुक्त अरबी , फारसी, संस्कृत, मराठी शब्द-योजना
१) वीर गच्छले सैन्य घेउनी (संस्कृत क्रियापदाला मराठी प्रत्यय)
२) म्हणे पार्थ आतां करूं फैसला हो ( अरबी शब्द )
३) हळूच मग दटावी ते दरोगीण त्यासी ( अरबी शब्द )
४) प्रभूसम पूज्य मला तो म्हणतां 'तुभ्यं नमो रमाजाने'
- (संस्कृत, मराठी व अरबी शब्दयोजना)
५) न केला मुळीं संग्रहो सद्गुणांचा
अता भोगितो मी विपाकू तयाचा
(संग्रहो = सङ्ग्रहः ~ संस्कृत शब्द)
(- वि. कों. ओक)
छ) निष्कारण/ अनावश्यक अधिक शब्द
१) जरठसा शिशिर तो ध्रुव पदीं वि-रतला
२) सख्या वाचका गीत कवीचे एकुनिया निज-कानीं
३) नव-शिशूवरिल या जननिची सु-ममता
४) बस तू मौनपणे अथवा उगा
.... (वामन पंडित ).
ज) अनावश्यक पादपूरणार्थक शब्द
१)
तत्रापि जे प्रिय बहू स्ववधू चि माजी |
तो स्थापणे तरु तिच्या सदना चि माजी ||
(वामन पंडित )
२)
हे न म्हणे कृपाळू प्राण पै गा |
झ) अश्लील /ओंगळ शब्द योजना
१)
कटकी होते वाजी, वारण जे काय बहु मदें उतले ।
ते त्यांपुढे न तगले, हगले तात्काळ गर्जतां मुतले ।।
२)
बोल बोलतां सोपें वाटे करणी
करितां टीर फाटे
( संत तुकाराम )
ञ) क्लिष्टता
'त' वर्गान्त्योपान्त्यां करुनि उलटें लाहिभर दे
[ त वर्गातील अंत्य व उपांत्य अक्षरे म्हणजे न आणि ध. त्यांच्या उलट म्हणजे 'धन' दे हा अर्थ ]
ट) दूरान्वय /शब्दानुक्रम उलटसुलट)
१)
म्हणे हंस क्षोणी-पतिस तुज कोणी सम नसे
( दूरान्वय - तुज आणि सम)
२)
असे हे गोसावी रहित समजा राम-भजना
३)
लंगोटी भर वीत रुंद मळक्या चिंध्या, शिरीं बांधुनी
४)
मुळे या, अखिल जीवांना नवीशी चेतना येई
५)
जादूनेंच तुझ्या बा रे।
वन नंदन बनलें सारें ||
ठ) अयोग्य वाक्प्रचार
१)
"गाढव शृंगारिलें कोडें ।
कांहीं केल्या नव्हें घोडें ।।
त्याचें भुंकणें न राहे ।
स्वभावाशीं करिल काये ?"
२)
घंटा जड घण घण। वाजताती मण मण ।
मक्षिकांचा खण खण । मध्ये जेव्हां घावला ।
ड) एकाच अर्थाच्या शब्दांची पुनरुक्ती
१)
भयाण अन् भेसूर श्वापदें क्रूर तियेच्या उरीं
२)
मुकुल-कलिकेपरि गाल ते फुगीर
...(ह. स.गोखले)
[ ३ ] छन्दो-दोष
अ) लघु-गुरु कडे दुर्लक्ष
१) तख्ते रक्त प्रवाह वाहवुनिया भूमीवरी स्थापिलीं
२) निराश-प्रद निष्फला तुज कशास आशा जरी ?
३) बळकट पिंजराही तूज नाहीं बसाया
४) होती तामस जीव दे, 'गुंफुन मी घालीन वेणी शिरीं'
आ) यति-भंग
१) उत्कर्षे-स्वामि-निष्ठा होती सा,चार ती
२) ठेविलें दा,रीं न जो पा,ऊल तूझ्या मंजुळे,.
३) प्रभूतें म्हणे हे पहा आग; लीला -
वती मी वरावें मला चांगलीला ॥
इ) यमक-दोष
१) नाम-प्रतापहि यथा-मति याच रीती ।
सीमा न पावति तथापि मनींद्र गाती ।।
२) स्वप्नमय चित्रा । अर्पीन मनोहर कविता ।।
३) नमस्कार तुज पूर्णत्वा । हात जोडिते तुला अतां ।।
एकाच अर्थाच्या शब्दामुळे यमक-दोष
४) पद्में प्रकुल्ल करितों सविता स्वयं हा ।
रात्रीं विकास कुमुदांप्रति फार दे हा ।
५) शुक्र भवनिधि तरले परि योगालावु धरूनिया पोटी ।
एकोबाही तरले, भव-प्रस्तर दृढ धरूनिया पोटीं ।
ई) मिश्रण छंदोदोष (एकाच पद्यात विविध वृत्ते)
त्याचा हेतु पुरे अशीस अपुरें आयुष्य जेणें घडे ।
दोघां एक जडे कळा न विघडे ऐसें करूं रोकडें ।।
पाहूं गंधर्व आतां जगविति वनिता दाउनी विक्रमासी ।
केवी आम्हांपुढे ते सकळहि निरखूं आजि शौर्य-क्रमासी ।।
( वामन पंडित - स्रग्धरा आणि शार्दूलविक्रीडित वृत्त )
काव्याचा अभ्यास करताना काव्यगुणांबरोबरच काव्यदोषांचाही विचार केला जातो. काव्यदोष म्हणजे काव्यातील अशी रचना किंवा शब्दयोजना की ज्यामुळे लय, रचना किंवा अर्थाच्या स्पष्टतेवर काही प्रमाणात परिणाम होतो. तरीही काव्याचा मुख्य उद्देश रसोत्पत्ती आणि सौंदर्यनिर्मिती हा असल्यामुळे एखादा दोष आढळला तरी तो काव्याच्या एकंदर प्रभावाला किती बाधा आणतो, हे महत्त्वाचे ठरते.
छंदोबद्ध काव्यात ठराविक ठिकाणी यति म्हणजे विराम अपेक्षित असतो. तो न पाळल्यास किंवा शब्दांची विभागणी अशी झाली की योग्य ठिकाणी थांबा घेता येत नाही, तेव्हा यतिभंग होतो. त्याचप्रमाणे परस्पर संबंधित शब्द दूरदूर आल्यामुळे अर्थ लगेच लक्षात येत नाही, तेव्हा दूरान्वय हा दोष निर्माण होतो. हे दोष बहुधा रचना व शब्दविन्यासाशी संबंधित असतात.
[ थोडे विषयांतर -
'सत्यमेव जयते' या ब्रीद वाक्यात 'जयते' हे रूप पूर्णपणे चुकीचे आहे. संस्कृत व्याकरणदृष्ट्या वास्तविक इथे क्रियापद 'जयति' असायला हवे किंवा 'सत्यमेव विजयते' अशी तरी वाक्यरचना हवी होती पण 'सत्यमेव जयते' हे विदग्ध वाङ्मयातून आलेले असल्याने ही उक्ती आजही मान्यताप्राप्त ठरली आहे.
(“सत्यमेव जयते” ही ओळ मुण्डकोपनिषद् (३.१.६) मधील आहे.
पूर्ण वाक्य असे आहे :
सत्यमेव जयते नानृतं।
अर्थ : सत्यच जिंकते, असत्य नाही.)
हा प्रयोग प्राचीन ग्रंथात असल्यामुळे “जयते” हे रूप प्रमाण मानले जाते.]
सारांश -
मराठी साहित्यरचनेच्या रम्य बागेत काव्यगुणांची फुले फुलतात; पण कधीमधी दोषांची एखादी काटेरी काडीही दिसते. शब्दांची मांडणी विस्कटली, लयीचा थोडा ताल चुकला किंवा अर्थाचा धागा थोडा दूर गेला, तर तेथे काव्यदोषाचे अस्तित्व जाणवते. पण कवीच्या दिव्य प्रतिभेच्या तेजासमोर अशा दोषांचा मिणमिणता उजेड क्षीणच भासतो. भावप्रवाहाचा ओघ, कल्पनेची उंच भरारी आणि चातुर्यपूर्ण व चपखल शब्द-माधुर्यात हे दोष सहज विरघळून जातात. तेजस्वी सूर्यप्रकाशात लहानुल्या सावल्या हरवून जाव्यात, तसेच गुणांच्या प्रभेपूढे दोष निस्तेज ठरतात. कवीच्या हृदयातून उमटलेला भाव जेव्हा रसिकांच्या मनात स्पंदन निर्माण करतो, तेव्हा अशा सूक्ष्म त्रुटींकडे कुणाचे लक्षही जात नाही. म्हणून काव्यदोष हे काव्याच्या मार्गातील अडथळे नसून, कवीच्या कलेला अधिक सजग करणारे संकेतच ठरतात. काव्याचा खरा सोहळा गुण, रस आणि भाव यांच्या संगमातच उजळून निघतो.
गोऱ्यापान गोंडस बाळाच्या गालावर लावलेली काजळाची हलकीशी तीट दुर्लक्षून आपण त्या बाळाच्या लोभस रूपावरच वात्सल्याचा वर्षाव करतो तसेच आहे हे.
काव्यदोषांचा अभ्यास हा केवळ त्रुटी शोधण्यासाठी केला जात नाही. उलट, काव्याची रचना कशी घडते, शब्दांची मांडणी कशी परिणाम करते आणि छंदाचे नियम कसे कार्य करतात, हे समजून घेण्यासाठी हा अभ्यास उपयुक्त ठरतो. अशा अभ्यासामुळे काव्याच्या सूक्ष्म रचनेची जाणीव वाढते आणि काव्यवाचन अधिक प्रगल्भ व रसपूर्ण होते.
*******************************************
या लेखाद्वारे आपल्या मराठी महान काव्यपरंपरेतील समृद्ध दालनातल्या वैभवाचं, ओझरतं का होईना, दर्शन घडलं असेल तरी मला धन्यता वाटेल.
अरुण सौदागर,
मराठी भाषावैभव
9422660621.
२०/०२/२०२६.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा