छंदशास्त्र
[ लेखांक ७ ]
छन्दशास्त्र
काव्य–वृत्त : प्रस्तावना
मराठी काव्यपरंपरेत शब्दांची माधुरी आणि भावांची समृद्धी जितकी महत्त्वाची आहे, तितकीच त्यांना साजेशी लय देणारी वृत्तेही महत्त्वाची आहेत. जणू काव्यरूपी सुरेल वीणेच्या तारांवर ताल धरणारी ही वृत्ते काव्याला गेयता, संतुलन आणि मोहकता प्रदान करतात.
कवीच्या भावविश्वाला योग्य आकार देत, शब्दांना लयबद्ध चाल देणारे हे वृत्तशास्त्र काव्याच्या सौंदर्याचा एक अविभाज्य भाग आहे. प्राचीन संस्कृत आणि मराठी काव्यपरंपरेत विविध वृत्तांनी कवींना अभिव्यक्तीची सुबक चौकट दिली आहे.
या लेखमालेच्या पुढच्या काही भागात काव्यवृत्तांचे स्वरूप, त्यांची वैशिष्ट्ये आणि कवींच्या रचनांमधील सुंदर उदाहरणे यांचा थोडक्यात परिचय करून घेण्याचा प्रयत्न आहे. काव्याच्या लयीचा हा रम्य प्रवास रसिकांना आनंददायी ठरो, हीच अपेक्षा.
मनोरंजक व कल्पनारम्य अशा प्रकारच्या वाक्यरचनेला काव्य म्हणतात. काव्य गद्यात असते आणि पद्यातही. मात्र पद्यातील रचनेत पाद म्हणजे चरण असतात. गद्यात ते नसतात, एवढाच फरक. शिवाय पद्यात ताल किंवा लयबद्धता असते. पद्याच्या रचनेत ठराविक नियमांचे पालन केले तर ते काव्य अधिक रंजक ठरते.
कोणत्या पद्यात कोणत्या प्रकारचे नियमन आहे, हे ओळखण्यासाठी हस्व-दीर्घ समजून घेणे इष्ट असते.
परशुरामतात्या गोडबोले यांचे वृत्त-दर्पणातील लघु-गुरु-संबंधाचे खालील पद्यसूत्र प्रसिद्ध आहेः
ऱ्हस्व स्वराते लघु बोलताती। दीर्घ स्वराते गुरु नाम देती ||
पुढे अनुस्वार विसर्ग येतो। संयोग ऱ्हस्वास गुरुत्व देतो ||
या नियमांनुसार -
१) वदन, नमन यांतील सर्व अक्षरे लघु आहेत.
२) काका, मामा, आई यांतील सर्व अक्षरे गुरु आहेत.
३) सुंदर, चिंता , घंटा, धंदा, अंगण, उंट, उंबर, इंदिरा यांतील अनुस्वार असलेली अक्षरे हस्व असली तरी वरील नियमांस अनुसरून गुरु आहेत.
४) विद्या, बुद्धि, गर्व, शिक्षा, सत्य यांतील जोडाक्षरापूर्वीची अक्षरे ऱ्हस्व असली तरी वरील नियमाप्रमाणे गुरु आहेत.
५) दुःख, निःसंदेह, निःपात, प्रातःस्नान यांतील विसर्गापूर्वीची अक्षरे ऱ्हस्व असली तरी गुरु आहेत.
६) आ, ई, ऊ, ऋ, ए, ऐ, ओ, औ हे स्वर व हे स्वर असलेली अक्षरे नेहमीच गुरु असतात.
७) अ, इ, उ, ऋ, लृ हे स्वर असलेली अक्षरे लघु असतात.
१. अपवाद - अनुस्वार व जोडाक्षर यांपूर्वीच्या अक्षरांवर ज्यावेळी उच्चारात जोर असतो, त्या वेळीच ती गुरु असतात; जोर नसल्यास त्यांना गुरुत्व येत नाही .
उदा. -"जंव चाले मोठा धंदा, तंव बहीण म्हणे दादा". येथे 'जं,' 'तं,' यांवर अनुस्वार व बहीण यांतील 'ण' च्या पुढे म्हणे, यांतील 'म्ह' हे जोडाक्षर असूनही त्या अक्षरावर उच्चारात जोर नसल्यामुळे ती गुरु नाहीत.
२. अपवाद - केव्हा केव्हा कवी पद्याच्या जुळणीसाठी ऱ्हस्व अक्षराचा उच्चार लांबट करतात, तेव्हा त्याला गुरु अक्षर व दीर्घ अक्षराचा उच्चार आखूड करतात , तेव्हा त्याला लघु अक्षर म्हणतात.
उदा. -" मनी धरिलेसे रूप अमंगळ" येथे शेवटची 'गळ' ही अक्षरे उच्चारणात लांबट असल्यामुळे ती गुरु आहेत; तसेच " गेले तुझ्यावर जडून रामा मन. " यात 'गे' व 'रा' ही अक्षरे मूळची दीर्घ असली तरी उच्चारणात ती आखूड केल्यामुळे लघु आहेत. (पद्यान्तीचे अक्षर मूळचे त्य किया 'अ' कारयुक्त असून त्याचे उच्चारण लांबट असल्यास गुरु असते.
(३) ऱ्हस्व अक्षराच्या उच्चारणाला जो वेळ लागतो. त्याला मात्रा असे म्हणतात. लघु अक्षराची एक मात्रा व गुरु अक्षराच्या दोन मात्रा असे मानतात.
(४) लघु-गुरु भेदानुसार पद्याचे मापन करण्यासाठी तीन तीन अक्षरांचा जो एक गट ठरवला आहे, त्याला गण असे म्हणतात.
हे गण खालीलप्रमाणे आठ आहेत:
य - यमाचा, न- नमन, त - ताराप, र - राधिका,
म - मानावा, स - समरा, ज - जनास, भ - भास्कर.
- (परशुरामतात्या गोडबोले)
याशिवाय चरणांच्या अंती एक किंवा दोन अक्षरे लघु किवा गुरु आहेत किंवा नाहीत हे सांगण्यासाठी ल व ग या संज्ञांचा वरील गणांतच समावेश करतात. म्हणजे य, न, त, र, म, स, भ, ल, ग ह्या गणांच्या एकंदर दहा संज्ञा होतात.
गणांची लघु–गुरू रचना :
य गण = लघु गुरु गुरु ( ⏑ – – )
म गण = गुरु गुरु गुरु ( – – – )
त गण = गुरु गुरु लघु ( – – ⏑ )
र गण = गुरु लघु गुरु ( – ⏑ – )
ज गण = लघु गुरु लघु ( ⏑ – ⏑ )
भ गण = गुरु लघु लघु ( – ⏑ ⏑ )
न गण = लघु लघु लघु ( ⏑ ⏑ ⏑ )
स गण = लघु लघु गुरु ( ⏑ ⏑ – )
छंदशास्त्रातील आठ गण (गण = तीन अक्षरांचा समूह) व त्यांतील लघु (⏑) आणि गुरु (–) क्रम पुढीलप्रमाणे आहेत :
लक्षात ठेवण्याचे सूत्र
“यमाताराजभानसलगा”
या सूत्रातील अक्षरांवरून गण ओळखतात :
य-मा-ता-रा-ज-भा-न-स ( क्रमाने तीन तीन अक्षरे घेतल्यास प्रत्येक गणातील लघु-गुरुत्व कळते. उदा. पहिली तीन अक्षरे : यमाता = लघु व दोन गुरु ; मातारा = तीनही गुरु ; ताराज = दोन गुरु व एक लघु इ. )
[ त्र्यक्षरी गण मानण्याची पद्धत हीच रूढ व परिचित आहे. त्याऐवजी चतुरक्षरी किंवा पंचाक्षरी गण मानण्याचाही काहीजणांनी प्रयत्न केला. मात्र त्याला फारसा प्रतिसाद मिळालेला दिसत नाही.
परंतु जुन्या पद्धतीत त्र्यक्षरी गणामुळे शब्द मध्येच विस्कळीत होऊन तुकडा पडणे (उदा. मना सज्जना भक्तिपंथेचि जावे = मनास ज्जनाभ क्तिपंथे चिजावे) असे दोष आहेत, तर नवीन पद्धतीत सुद्धा असेच किंवा निराळेच दोष आहेत; म्हणून मूळ परिचित पद्धतच लोकप्रिय ठरली आहे. ]
(५) पद्यात चरणाच्या शेवटी थांबावे लागते ; मोठ्या वृत्तातही मध्येच कुठेतरी थांबावे लागते ; अशा स्थानाला विराम किवा यति म्हणतात. (यति = यम् + ति हा मूळचा स्त्रीलिंगी शब्द पण तो पुल्लिंगीच रूढ झाला आहे).
उदा. -
'कारंजे हे, छान आहे मजेचे ।
पाणी चाले, शोभती बाग साचे ।।'
ह्या शालिनी वृत्तात चौथ्या अक्षरापुढे व त्यानंतर चरणान्ती थांबावे लागते म्हणून येथे चौथ्या व अंत्य स्थानी यति आहे.
टीप - यति असेल तेथे शक्यतो शब्द पूर्ण असायला हवा; निदान शब्दांचे दोन सार्थ विभाग पडतील असे तरी हवे. नसल्यास यति-भंग हा दोष होतो.
उदा-
"होउं दे का,रागृहाच्या भिंतिची उं,ची किती ?”
येथे 'का' व 'उं' ह्या अक्षरांच्या ठिकाणी यति-भंग झाला आहे.
(६) मराठीतील पद्य-रचनेत जवळजवळच्या दोन दोन चरणांच्या शेवटचे एक वा अनेक अक्षरे क्रमाने सारखीच असतात, त्यास 'यमक' म्हणतात हे सर्वश्रुत आहे. (पद्य-लक्षणे ठरवताना अन्त्य यमक कोठे असते, त्याचेही भान असावे लागते.)
उदा-
वनी देखता मेघ नीळास मोर
प्रमोदे करी नृत्य-लीला समोर
तयासारखे नाचती तोक सारे
खुणावूनि अन्योन्य की, तो कसा रे ?
-(वामन पंडित )
टीप - यमकाक्षरांपूर्वीचे स्वरही एकच असतील असे यमक असणे आवश्यक आहे.
धीट - नीट, चांग - सांग, घोर - मोर; परंतु धीट - नेट, थोर - कीर, असे नसावे.
उदा. -
"वसती ज्या ठायीं दीनार्त पतित। विराजती तेथ, चरण तुझे."
(७)
मराठी पद्य-रचनेत अक्षर-वृत्ते, छन्द-वृत्ते आणि मात्रा-वृत्ते किंवा जाति-वृत्ते असे तीन प्रकार आढळून येतात, त्यांना अनुक्रमे वृत्त, छंद व जाति अशी संक्षिप्त नांवे आहेत.
ज्यांतील प्रत्येक चरणातील अक्षरे सारखी असून, लघु-गुरु-क्रमही सारखा असतो, त्यास अक्षरगण-वृत्त, श्लोक-वृत्त असे म्हणतात.
( ही वृत्ते प्रामुख्याने संस्कृतातोद्भव आहेत).
ज्यातील प्रत्येक चरणात (शास्त्रदृष्ट्या ) अक्षरांची समानता आहे, परंतु लघु-गुरु-क्रम नाही , त्यांना छंद म्हणतात.
(मराठीतील ओवी, घनाक्षरी, अभंग इ. मूळची वृत्ते व काही आरत्या या प्रकारात येतात).
ज्यामध्ये चरणातील अक्षरे सारखी नसली तरी मात्रा मात्र ठराविकच असतात, त्यांना मात्रावृत्ते किंवा जाति-वृत्ते म्हणतात.
मराठीतील बरीचशी पदे किंवा गीते ही जाति-वृत्तेच होत.
****
या लेखाद्वारे आपल्या मराठी महान काव्यपरंपरेतील समृद्ध दालनातल्या वैभवाचं, ओझरतं का होईना, आपल्याला दर्शन घडलं असेल तरी मला धन्यता वाटेल.
अरुण सौदागर,
मराठी भाषावैभव.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा