अक्षर-वृत्ते

अक्षर-वृत्ते

[ लेखांक ८ ]

संस्कृतात एका अक्षरापासून सव्वीस अक्षरांपर्यंतची अक्षरगण-वृत्ते आहेत. ( श्री - एकाक्षरी;  स्त्री, मही - द्व्यक्षरी;  पांचाल,  मृगेंद्र  - त्र्यक्षरी, इ. ) ही वृत्ते अर्थदृष्ट्या काव्याच्या दृष्टीने निरर्थक वाटतात.

त्यामुळे मराठीतील सहजपणे दिसून येणाऱ्या वृत्तांपैकी आठ अक्षरांपासून तेवीस अक्षरांपर्यंतच्या काही प्रमुख वृत्तांची अधिक माहिती करून घेऊ. 

अक्षरगण-वृत्तांचे सम-वृत्ते, अर्धसम-वृत्ते आणि विषम-वृत्ते असे तीन प्रकार आहेत. 

१) समवृत्त

ज्याच्या चारही चरणांची अक्षरे व लघु-गुरु क्रम समान असतात ते समवृत्त. 

२) अर्धसम-वृत्त

ज्याचा पहिला व तिसरा आणि दुसरा व चौथा हे चरण समानाक्षरी ते अर्धसम-वृत्त. 

३) विषम-वृत्त 

ज्याचे चारही चरण भिन्नाक्षरांचे असतात ते विषम-वृत्त होय. 

(मराठीत तुलनेने विषमवृत्ते फारशी प्रचलित नाहीत).


[ पुढील वृत्तबद्ध पद्यांमध्ये जिथे यती आहेत तिथे स्वल्पविराम दिले आहेत.]

अ) समवृत्त

१. अनुष्टुभ् (अक्षरे ८, यती ५)

गण -  

सूत्र - ( अनुष्टुभ् नेम ना गणी)

तमालपिष्टनीलांनी । मेघांनी नभ लिंपिले

संशक्तशीत-सुरभि । वातांनी उपवीजिले ||

- (परशुरामतात्या गोडबोले)

( नेम = नियम, बंधन, ठराविक लक्षण.

म्हणून “अनुष्टुभ् नेम” म्हणजे अनुष्टुभ् वृत्ताचे ठरलेले छंदनियम : प्रत्येक चरणात ८ अक्षरे ; चौथे अक्षरस्थान, पाचवे, सातवे, आठवे यांवरील विशिष्ट लघु-गुरु बंधने. 

तिसऱ्या पादातील विशिष्ट रचना हे सर्व मिळून अनुष्टुभ् नेम. अनुष्टुभ् वृत्त हे ‘वर्णवृत्त’ असले तरी त्यात गण-गणना लावली जात नाही. 'अनुष्टुभ् नेम — ना गणी '  म्हणजेच अनुष्टुभ् मध्ये इतर वृत्तांसारखी गण-रचना लक्षात घेतली जात नाही. त्यात थेट अक्षरसंख्या व विशिष्ट स्थानांवरील लघु-गुरु नियम पाहतात. गणविभागावर आधारित बंधन नाही.) 


२) इंद्रवज्रा (अक्षरे ११; यती ५,११)

गण - त त ज आणि शेवटी दोन गुरु.

सूत्र - [ ता ता जगा गा गणि इंद्रवज्रा | ]

उदा. 

रामानिमित्त, जननीस टाकी ।

पाणी न पी, राज्यनदीतटाकी ||

लंघुनियाही, गुरुसंगतीते । 

पावे अहो वे, गुरु ज्या गतीते ||

- (वामन पंडित )


३) उपेंद्रवज्रा (अक्षरे ११; यती ५, ११)

गण - ज, त, ज आणि शेवटी दोन गुरु.

सूत्र - [  जताज गागी च उपेंद्रवज्रा | ] 

उदा. 

तया वनी एक तडाग तोये । तुडुंबले ता,मरसानपाये || निरंतरामं,द मरंद वाहे । तपातही या, स्तव रिक्त नोहे ||

- (रघुनाथ पंडित )


४) शालिनी (अक्षरे ११; यती, ४, ११)

गण - म, त, त आणि शेवटी दोन गुरु.

सूत्र  [ मा ता ता गा, आणि गा शालिनीते |.] 

उदा. 

कारंजे हे , छान आहे मजेचे | 

पाणी तेथे, नागमोडीत नाचे ||

त्याच्यामध्ये, चक्र आहे समोर।

पाणी चाले, शोभती बाग फार ||

- (कुंटे)


५) रथोद्धता (अक्षरे ११; यती )

गण - र, न, र आणि शेवटी लघु, गुरु.

सूत्र - [  रा न रा ल गिच हो रथोद्धता | ] 

उदा. 

मोकळा करुनि कंठ तेधवां ।

आठवूनि मनि जानकीधवा ||

ते रडे, भरतही तसा रडे |

जोंवरी नयन होति कोरडे ||

- (वामन) 


६) स्वागता (अक्षरे ११; यती पाच)

गण - र, न, भ आणि शेवटी दोन गुरु.

सूत्र - [  स्वागता र न भ आणिक गा गी | ] 

उदा. 

एक ते सदय लेकुरवाळी ।

पाळतां शिशु तया कुरवाळी ||

धावते हृदयि त्यास धरोनी। 

जाय तो तडफडोनि मरोनी ||

- (निजसुरे) 


७) भुजंगप्रयात (अक्षरे १२; यती ६, १२)

गण - य, य, य, य.

सूत्र - [ भुजंगप्रयाती, य चारीहि येती | ] 

उदा. 

फुटेना तुटेना, कदा देव-राणा ।

चळेना ढळेना, कदा दैन्यवाणा ||

कळेना वळेना, कदा लोचनासी।

असेना दिसेना, जना मीपणासी ||

- (रामदास स्वामी) 


८) द्रुतविलम्बित (अक्षरे १२; यती पाच)

गण - न, भ, भ, र.

सूत्र - [ द्रुतविलम्बित वृत्त न भाभरी |.] 

उदा. 

असुनि काय जिणे जगतीवरी ।

मनुज जो नच देशहिता करी ||

फुकट अन्नचि खाउनि वाढतो ।

फुकट भार धरेवर घालतो || 

-  (ओक) 


९) वंशस्थ (अक्षरें १२; यती पाच)

गण - ज, त, ज, र.

सूत्र - [ असेहि वंशस्थ ज ता जरा गणी |.] 

उदा. 

लतेतळी  रुंद-निरुंद कालवे ।

गळोनि तेथे मकरंद कालवे ||

परागही सांद्र तयात रंगती ।

लासवें मूंग-तती तरंगती ||

-  (रघुनाथ पंडित) 


१०) इंद्रवंश (अक्षरे १२; यती पाच )

गण - त, त, ज, र.

सूत्र - [ असेहि वंशस्थ त ता जरा गणी |.] 

उदा. 

जेव्हांहि भाग्यक्षय-दुर्दशा नरा।

येते अशी कालकृता सुदुर्धरा ||

घेतात मित्रेहि अमित्रता तदा।

कंटाळती लोकहि रक्त जे सदा || 

- (परशुरामतात्या गोडबोले )


१५) वसंततिलका (अक्षरे १४; यती ८, १४)

गण - त, भ, ज, ज आणि शेवटी दोन गुरु.

सूत्र - [ होई वसंततिलका, त भजा जगागी |] 

उदा. 

भागीरथि त्रि-पथ-गे, पद-वंदनाते । 

मी दीन गे करितसे, मति-मंद माते ।। 

हेतू मनात भरला, तव गुण गाया । 

जावो न मागत असे, इतुकेचि वाया ।।

- (नरहरी) 


१२) मालिनी (अक्षरे १५; यती ८, १५)

गण - न, न, म, य. य.

सूत्र - [ न न म य य गणांनी, मालिनी वृत्त होते | ] 

उदा. 

तरुवर सुफलांच्या, आगमी नम्र होती |

जलदहि जलभारे, खालती फार येती ||

सुपुरुष विनयाते, भाग्यशाली धरीती |

उपकृति करित्यांची, जाणिजे हीच रीती ||

- (परशुरामतात्या गोडबोले )


१३) चामर (अक्षरे  १५; य पाच)

गण - र, ज, र, ज, र.

सूत्र - [ जेथ येति रा ज रा ज रा तदा च चामर | ] 

उदा. 

अश्व देखितांचि बाळकांसि चोज वाटलें |

रुक्म-रत्न-भूषणी म्हणे कसें सुशोभलें ! 

ते क्षणींच देखिले शिरीं सुवर्ण-पत्रिका |

पाहि बाळ वाचुनी बहूत अर्थ नेटका ||

- (आनंदतनय) 


१४) पंचचामर (अक्षरे १६; यती पाच )

गण -  ज, र, ज, र, ज आणि शेवटी एक गुरु.

सूत्र - [ यदा ज रा ज रा ज गा तदा हि पंचचामर | ] 

उदा. 

असें ऋषी वदे मुखें अचिंत तूं बसे सुखें |

कुमार पैल पातला दुरूनि कूश कौतुकें ||

कुशास देखुनी सिता रडोनि आळवी शुरा |

कुमार होय घाबरा पुसे नमूनि सुंदरा ||

-  (आनंदतनय) 


१५) शिखरिणी (अक्षरे १७; यती ६ व १७)

गण - य, म, न, स, भ आणि शेवटी लघु, गुरु.

सूत्र - [ जयामध्ये येती, य म न स भ लागा शिखरिणी | ] 

उदा. 

न रंजे कारंजें, निरखुनि फणीतें फणफणी । 

मुदेनें मोदेना, नल-गुण--गणीं जे गुणगुणी ।।

न बैसे जे सेजे, बरि नपरिसे जे शुक- गिरा।

न नाहे माना हे सगळे , न धरि ललना हेतु दुसरा ॥

- ( रघुनाथपंडित )


१६. पृथ्वी (अक्षरे १७, यती ८, १७)

गण - ज, स, ज, स, य व शेवटी लघु, गुरु.

सूत्र - [ अधी ज स ज त्यांपुढे, स य लगी च पृथ्वी वसे | ] 

उदा. 

तुझ्या बहुत शोधिले, अघनिधी पदाच्या रजें |

न तें अनृत वर्णिती, बुध-जनीं सदाचार जे ||

असे सतत ऐकते, सतत बोलते मीच तें |

प्रमाण न म्हणों जरी, उचित माझिया नीचते ||

- ( मोरोपंत)


१७) हरिणी (अक्षरे १७; यती ६, १०, १७)

गण - न, स, म, र, स आणि शेवटी लघु, गुरु.

सूत्र - [ न स म र स त्यां, पाठी येती ल गा, हरिणीच ती | ] 

उदा. 

गृहकलह हा, राज्ये लावीं, लयास अनेक तीं |

अहित घडवी, मोठें देशा, असे बुध सांगती ||

कलह बुडवी, राज्या भाग्या, असा परिणाम हा |

म्हणुनि कथितों, त्यातें टाका, यशा मिळवा महा ||

- (ओक) 


१८) मन्दाक्रान्ता (अक्षरे १७; यती ४, १०, १७)

गण - म, भ, न, त, त आणि शेवटी दोन गुरु.

सूत्र - [ मन्दाक्रान्ता, म भ न त त गा गीच ते वृत्त जाणा | ]

उदा. 

मोठ्या खोट्या, छलक कुमती, बोलती दुष्ट वाचा |

बोभाटा हा, अजवरि जगीं, गाजतो सासवांचा ||

ऐशा खोटया, विपरित मिषे, तू न चित्ता विटाळीं|

एक्या हातें, कधिं तरि मुली, वाजते काय टाळी ?- (आठल्ये)


१९) शार्दूलविक्रीडित (अक्षरे १९, यती १२, १९)

गण - म, स, ज, स, त, त आणि शेवटी गुरु.

सूत्र - [ मा सा जा स त ता ग येति गण हे शार्दूलविक्रीडिती | ] 

उदा. 

आकाशांत फुलें, धरेवर फुलें, वाऱ्यावरीही फुलें |

माझ्या गेहिं फुलें, मनांतहि फुलें, भूगर्भिं सारी फुलें ||

माझें चित्त भुलें, सुगंधित भलें, हें विश्व हो जाहले |

कोणाला कळलें, ? किती पसरले, ? उद्यान हे शोभले ||

- (टिळक)

टीप - येथे पुष्पयमकामुळे सहाव्या अक्षरापुढेहि स्वाभाविकपणे यति आला आहे. 


२०) स्रग्धरा (अक्षरें २१; यती ७, १४, २१)

गण - म, र, भ, न, य, य, य.

सूत्र - [ ज्याच्या प्रत्येक पादी, म र भ न य य या, हे गण स्रग्धरा ती | ] 

उदा. 

मी भक्ताधीन भक्त, प्रिय मज न तसें, आवडे अन्य काय ?

श्री येथें सान वाटे, तदधिक मजला, आपुला धन्य काय ?

माझी सेवाचि मोक्षा,-हुनिहि बहु मला, त्यासि जे अंतराय |

ध्यानी होऊं न देती, क्षणहि बहु मला,मान्य ते सन्त-राय ||

- (मोरोपंत )


२१) अमृतध्वनि (अक्षरें २२; यती ४, ११, १८, २२)

गण - त, भ, य, ज, स, र, न आणि शेवटी गुरु.

सूत्र -  [ तभयजसरन ग अमृतध्वनि जाणावा ॥ ] 

उदा. 

झाला सको,प पर जाला मुठाळुनि भुजालागिं थाप,टि करें |

घाला द्विजा, वरिच घालावया, यम निघाला स-वे,ग निकरें ||

पाला समर्पित कृपाला म्हणू, नि तव पालाणुनि, निज-हला |

आला मुनी, जवळिं आलापितां, चि जळि आलांबुसा, उसळला ||

- (आनंद तनय)


२२) मन्दारमाला (अक्षरे २२; यती ४, १०, १६, २२)

गण - सात त-गण आणि शेवटी गुरु.

सूत्र - [ साता त-का, रीच सन्दारमा,ला गुरू एक त्या, च्याहि अंती वसे | ] 

उदा. 

सृष्टी तुला, बाहुनी धन्य मा, तें अशी रूपसं,पन्न तू निस्तुला |

तूं कामधे,नू खरी कल्पव,ल्ली सदा लोभला, लोक सारा तुला |

त्या वैभवा,ला तुझ्या पाहुनी, या मला स्फूर्ति नृत्यार्थ होते जरी ||

सामर्थ्य ना, मीं तुझ्या आर्यभू,मी तसें पाहिलें, मी न कोठें तरी !

- (टिळक)


२३) सु-मन्दारमाला (अक्षरे २३; यती ५, ११, १७, २३)

[ मन्दारमालेत आरंभी एक लघु अक्षर वाढवून, २३ अक्षरांचें सु-मन्दारमाला वृत्त तयार होते ]

सूत्र - [ सुमन्दारमा,लेत मन्दारमा,लेहुनी एक ये आदि लघ्वक्षर | ] 

उदा. 

मराठी असे, आमची माय बोली जरी आज ती, राजभाषा नसे |

तसें बाह्य ऐ,श्वर्य या माउली,ला यशाची पुढे, थोर आशा असे ।।

न मातब्बरी, पञ्चखण्डान्तरीं, ती जरी मान्यता, पावली इङ्ग्रजी |

भिकारीण आ,ई जहाली म्हणू,नी कुशींचा तिच्या, तीस केवीं त्यजी !

- (मा. त्रिं. पटवर्धन)


२४) मदिरा [हेमकला] (अक्षरे २३; यती ६, १२, १८, २३)

गण - सात भ-गण आणि शेवटी दोन गुरु.

सूत्र - [  सात भ शेवटि दोन गुरूहि जरी असती मदि, राच म्हणा ती | ] 

उदा. 

नम्रपणेच स,भेंत महोन्नत, जे गुण वर्णुनि, या परक्यांचे |

सांगितल्याविण, दाविति कोशल, सर्वजनांप्रति, जे स्वगुणाचें ||

स्वार्थपरार्थहि, साधिति जिंकिति, शान्तिबळे मुख,रत्व खलांचें |

संत महागुण, भाजन यापरि, सेवन कोण करी न तयांचें ?

- (वामन पंडित )

टीप - मदिरेलाच सवाई या नावानेही ओळखले जाते.   एखाद्या अक्षराच्या लघु-गुरु-भेदाने तिचे आणखी काही प्रकार पडतात.


[ समान अक्षरांच्या वृत्तांच्या चरणांचे मिश्रण करून,  जी रचना होते., त्या वृत्तास उपजाति असे म्हणतात. इंद्रवज्रा व उपेंद्रवज्रा, वंशस्थ व इंद्रवंशा, स्वागता व रथोद्धता, यांच्या मिश्रणाने अशी वृत्ते होतात ].


***


वृत्तातील अक्षरांची संख्या, गण व यती लक्षात ठेवण्यासाठी लक्षणांची सूत्रे :


१) अनुष्टुभ् नेम ना गणी |

२) मा मा गा गी विद्युन्माला |

३) जरा लगी प्रमाणिका |

४) भामस गानी चंपकमाला |

५) स स सा गण मेघवितानी |

६) राय जाग हे येति कामदी |

७) नर र लाग त्या शुद्धकामदी |

८) ता ता जगा गा गणि इंद्रवज्रा |

९) जताज गागी च उपेंद्रवज्रा |

१०) मा ता ता गा, आणि गा शालिनीते |

११) दोधक तीन 'भ' गा गिच होते |

१२) रा न रा ल गिच हो रथोद्धता |

१३) स्वागता र न भ आणिक गा गी |

१४) मौक्तिकमाला, भ न त ग गा-नी |

१५) भुजंगप्रयाती, य चारीहि येती |

१६) द्रुतविलम्बित वृत्त न भाभरी |

१७) असेहि वंशस्थ ज ता जरा गणी |

१८) ती इंद्रवंशा त त जार या गणी |

१९) बघ चार स, या गणि तोटक ते |

२०) मानावे, म नजर गी प्रषिणीते |

२१) होई वसंततिलका, त भजा जगागी |

२२) न न म य य गणांनी, मालिनी वृत्त होते |

२३) जेथ येति रा ज रा ज रा तदा च चामर |

२४) यदा ज रा ज रा ज गा तदा हि पंचचामर |

२५) जयामध्ये येती, य म न स भ लागा शिखरिणी |

२६) अधी ज स ज त्यांपुढे, स य लगी च पृथ्वी वसे |

२७) न स म र स त्यां, पाठी येती ल गा, हरिणीच ती |

२८) मन्दाक्रान्ता, म भ न त त गा गीच ते वृत्त जाणा |

२९) मा सा जा स त ता ग येति गण हे शार्दूलविक्रीडिती |

३०) ज्याच्या प्रत्येक पादी, म र भ न य य या, हे गण स्रग्धरा ती |

३१) साता त-का, रीच सन्दारमा,ला गुरू एक त्या, च्याहि अंती वसे |

३२) सुमन्दारमा, लेत मन्दारमा, लेहुनी एक ये आदि लघ्वक्षर |

३३) सात भ' शेवटि दोन गुरूहि जरी असती मदि, राच म्हणा ती |


अर्धसम-वृत्ते


१) वियोगिनी (अक्षरे १० व ११)

विषमचरणी - अक्षरे १०. 

गण - स, स ज आणि शेवटी गुरु.

समचरणी - अक्षरे ११. 

गण - स, भ, र आणि शेवटी लघु, गुरु.

उदा. 

प्रभु राम सखा निकेतनीं । मज त्यागुनि जातसे वनी |

गमतें जग शून्य मन्मनीं । धरुं मी प्राण कसे वियोगिनी ||

.... ( परशुरामतात्या गोडबोले. )


२) माल्यभारा (अक्षरे ११ व १२)

विषमचरणी -अक्षरे ११. 

गण - स, स, ज आणि गुरु, गुरु.

समचरणी - अक्षरे १२.

गण - स, भ, र, य.

उदा. 

नळराज-कथा सुधाचि साजे ।

दमयंती वरवर्णिनि विराजे ||

मिळणी उभयांशि होय जेथें ।

अधिकारी अधिकानुराग तेथे || 

- ( रघुनाथ पंडित )


३) पुष्पिताग्रा (अक्षरे १२ व १३)

विषमचरणी - अक्षरे १२.

गण - न, न, र, य.

समचरणी - अक्षरे १३.

गण - न, ज, ज, र आणि गुरु.

उदा. 

मरडुनि नरडी करें दुजानें। 

धरुनि असें धरिलेंच पुच्छ ज्यानें | 

रगडुनि फणि-कंठ कंठभारी।

उपरि चढे करि नाट्यनीट मारी || 

- (वामन पंडित )

विशेष ध्यानाकर्षण  :  वृत्ताचं सूत्र विशिष्ट चालीवर म्हटलं की आपोआपच त्या वृत्ताचं उदाहरण आठवतं. शालेय जीवनात याचा फार उपयोग झाला होता. 

*******

(अरुण सौदागर)

२३/०२/२०२६.


या लेखाद्वारे आपल्या मराठी महान काव्यपरंपरेतील समृद्ध दालनातल्या वैभवाचं, ओझरतं का होईना, दर्शन घडलं असेल तरी मला धन्यता वाटेल.


 अरुण सौदागर,


 मराठी भाषावैभव

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शब्दालंकार

मराठी भाषा वैभव - काव्यगुण

काव्यविचार